एमआयडीसीत आगीचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 06:12 AM2018-04-27T06:12:37+5:302018-04-27T06:12:37+5:30

जवळपास ३५ कारखानदारांनी आग आटोक्यात येईपर्यंत आपले उत्पादन बंद करून कामगारांना बाहेर काढले होते.

Fire time in MIDC | एमआयडीसीत आगीचे सत्र सुरूच

एमआयडीसीत आगीचे सत्र सुरूच

Next

सिकंदर अनवारे/संदिप जाधव ।
महाड : रायगड जिल्ह्यातील रोहा आणि ठाणे-बेलापूर एमआयडीसीनंतर गुरुवारी महाड औद्योगिक वसाहतीमधील प्रीव्ही आॅर्गनिक्स या कारखान्याला गुरुवारी दुपारी १.३०च्या सुमारास अचानक स्फोट होऊन आग लागली आणि एमआयडीसी क्षेत्रांतील आगीचे सत्र सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रीव्ही आॅर्गनिक्समधील ही आग कारखान्याच्या आयनॉन प्लँटमध्ये लागूनच शेजारी असलेल्या हायड्रोजनेशन या प्लँटमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटाने निर्माण झालेल्या आगीने संपूर्ण परिसर हादरून गेला. बघता बघता ही आग भडका उडवत शेजारी असलेल्या देव्हॉड्रिल कारखान्यालादेखील आगीच्या लपेट्यात घेतले, संध्याकाळपर्यंत अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली.
या घटनेमध्ये प्रीव्ही कारखान्याचे तीन कामगार ओंकार मांडे (१९), नथुराम मांडे (४८), रमेश मांडे (४५) हे जखमी झाले तर मदतीसाठी धावलेला नागेश देशमुख असे चार जण जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या सर्वांवर एमएमए हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. सुदैवाने जीवितहानी नाही. सुरक्षिततेच्या कारणास्तव आसनपोई, खैरे, जिते, धामणे, नागलवाडी, शेलटोली या सहा गावांतील ग्रामस्थांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते.
महाड औद्योगिक वसाहतीतील प्रीव्ही आॅर्गनिक्स या कारखान्यामधील आयनॉन प्लँटमध्ये प्रथम आग लागली. हायड्रोजनेशन प्लँटमध्ये या आगीमुळे स्फोट झाला. स्फोटानंतर आगीने क्षणातच भीषण रौद्ररूप धारण करून संपूर्ण कारखान्याला वेढा घातला. कारखान्यातील कामगार स्फोटाच्या आवाजाने तत्काळ बाहेर पडले. नंतर कारखान्यातील इतर प्लँट, रिअक्टर आदी क्षेत्रात आग लागली. यामुळे झालेल्या स्फोटाने परिसर हादरून गेला. आग इतकी प्रचंड होती की, आगीचे उठणारे लोट १५ ते २० कि.मी. अंतरापर्यंत दिसून येत होते. यामुळे औद्योगिक परिसरावर काळ्या धुक्याचे सावटच निर्माण झाले.
महाड औद्योगिक विकास महामंडळाचे आणि नगरपालिकेचे दोनच फायर फायटर उपलब्ध असल्याने ते घटनास्थळी दाखल झाले. आगीचे रूप पाहता ही यंत्रणा अपुरी वाटू लागल्याने खासगी पाण्याचे टँकर मातीच्या गाड्या मागविण्यात आल्या, तर रत्नाागिरी, खेड, चिपळूण, माणगाव, रोहा, म्हसळा, नागोठणे या ठिकाणाहून देखील फायर फायटर या ठिकाण मागविण्यात आले होते. संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
या आगीमध्ये दोन्ही कारखान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीमध्ये जेवण करत असलेल्या कामगारांना काही काळ कळलेच नाही. मात्र, स्फोट आग पाहून सैरावैरा धावू लागले. एका कामगाराने दुसऱ्या मजल्यावरून उडीच टाकल्याने तो जखमी झाला. प्रीव्ही आर्गनिक्स कारखाना हा महाड औद्योगिक वसाहतीमधला मोठा कारखाना असून त्यांचे एकूण तीन युनिट आहेत. ही तीन युनिट मिळून जवळपास ५०० ते ६०० कामगार काम करतात. ज्या युनिटला आग लागली ते सर्वात महत्त्वाचे दोन नंबरचे आणि मुख्य युनिट आहे. जीवितहानी आणि वित्तहानीची संपूर्ण माहिती आग आटोक्यात आल्यानंतरच स्पष्ट होईल. मात्र, या कारखान्याच्या आगीमुळे पुन्हा एकदा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
प्रीव्ही कारखान्याच्या आग व स्फोटामुळे परिसर हादरून गेला. काही काळ विभागात सर्वच लोक सैरावैरा धावू लागले. नंतर समजले प्रीव्हीमध्ये स्फोट झालाय. बघता बघता काळा धूर आणि आगीचे लोट जवळपास १०-१५ कि.मी.वरून दिसत होते. यामुळे परिसरातील आसनपोई, खैरे, जिते, धामणे, नागलवाडी, शेलटोली या सहा गावांतील ग्रामस्थांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. महाड औद्योगिक वसाहतीतील सर्वच कारखान्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.

अहवाल मागविला
रोहा औद्योगिक वसाहतीमधील आगीच्या वेळी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भेट दिली, त्या वेळी कारखान्यांनी सेफ्टीआॅडिट करून औद्योगिक सुरक्षा विभागास सादर करण्याचे आदेश दिले होते.
हे अहवाल सादर होत आहेत दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील सर्व औद्योगिक वसाहतीतील कारखानदार, कारखानदारांच्या संघटना पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली होती.
त्या बैठकीत दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात आल्याबाबत देखील अहवाल मागविला असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
आपत्ती निवारण यंत्रणा, अपघातप्रवण क्षेत्रातील काळजीची उपाययोजना आदी बाबतच्या सूचना यामध्ये देण्यात आल्याचे त्यांनी पुढे सांगितले.

पालकमंत्र्यांची भेट
रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. प्रीव्ही कारखान्याचे व्हा. चेअरमन संभाजी पठारे यांनी घटनेबाबत पालकमंत्री चव्हाण यांना माहिती दिली.

३५ कारखान्यांचे प्रॉडक्शन थांबले
काल अचानक लागलेल्या आगीमुळे संपूर्ण औद्योगिक क्षेत्र हादरून गेले होते. महाड औद्योगिक क्षेत्रावर संपूर्ण काळोख झाला होता. याचा परिणाम आपल्या कारखान्यावर देखील होण्याची शक्यता असल्याने जवळपास ३५ कारखानदारांनी आग आटोक्यात येईपर्यंत आपले उत्पादन बंद करून कामगारांना बाहेर काढले होते.

जिल्ह्यातील आगीच्या महत्त्वाच्या घटना
आॅक्टोबर २००६
२८ आॅक्टोबरला येथील डॉर्फ केटल कंपनीला भीषण आग लागली. कंपनीमध्ये केमिकलचा मोठ्या प्रमाणात साठा होता. कंपनीत स्फोटही झाला होता. मुुंबई, ठाणे, नवी मुंबईमधील अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविली.
जानेवारी २०११
येथील इंडियन आॅइल कंपनीमध्ये १८ जानेवारी २०११मध्ये आग लागली होती. ३० बंब व अग्निशमन दलाच्या जवानांनी सहा तासांच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणली होती.
फेब्रुवारी २०११
तळोजामधील बुनेशा केमिकल कंपनीमध्ये ३ फेब्रुवारी २०११मध्ये भीषण आग लागली. ही आग पसरल्यामुळे शेजारी असलेल्या रचना अ‍ॅग्रोचेही नुकसान झाले होते. अग्निशमन दलाच्या दक्षतेमुळे परिसरातील मोदी फार्मा, तळोजा पेट्रोकेमिकल कंपनीचे आगीपासून रक्षण केले होते. आग विझविण्यासाठी दहा बंब घटनास्थळी दाखल झाले होते.
एप्रिल २०१३
भूखंड क्रमांक तीन वरील चेम्सिक केमिकल कंपनीमध्ये आग लागली. रात्री ८.३० वाजता लागलेली आग पहाटे ६.३० वाजता विझली. आग विझविण्यासाठी दहा तास अथक परिश्रम करावे लागले होते.
डिसेंबर २०१३
तळोजामधील केमिकल कंपनीला ३ डिसेंबर २०१३ रोजी भीषण आग लागली. केमिकलचा स्फोट झाल्याने पूर्ण परिसर हादरून गेला होता. अग्निशमन जवानांनी कौशल्याने आग नियंत्रणात आणली होती.
मार्च २०१६
तळोजा एमआयडीसीतील टिकिटार कंपनीमध्ये २१ मार्चला भीषण आग लागली. या आगीमध्ये ८ कामगार गंभीर जखमी झाले होते. यापैकी अखिलेश गुप्ता, टुनटुन सिंग, संजीव सिंग व संजय वासू म्हात्रे या चार जणांचा मृत्यू झाला होता.
३० नोव्हेंबर २०१६
येथील निडिलॅक्स केमिकल कंपनीला भीषण आग लागली. दीपक फर्टिलायझर कंपनीला लागून असलेल्या निडिलॅक्समध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली. दीपक फर्टिलायझरमधील बंबाच्या साहाय्याने येथील आग विझविण्यात आली. लाखो रुपयांचे नुकसान झाले असले, तरी कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नाही.
डिसेंबर २०१६
येथील मेंबा कंपनीला १९ डिसेंबरला अचानक आग लागली. आगीमध्ये लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. आगीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Web Title: Fire time in MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग