दासगाव आरोग्य केंद्र वाऱ्यावर, नागरिकांमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 12:07 AM2019-07-18T00:07:26+5:302019-07-18T00:07:33+5:30

प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या महिनाभरापासून डॉक्टर उपलब्ध नसल्याने येथील आरोग्य सेवा कोलमडली आहे.

Dasgun health center, angry at the people | दासगाव आरोग्य केंद्र वाऱ्यावर, नागरिकांमध्ये नाराजी

दासगाव आरोग्य केंद्र वाऱ्यावर, नागरिकांमध्ये नाराजी

Next

- सिकंदर अनवारे 
दासगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या महिनाभरापासून डॉक्टर उपलब्ध नसल्याने येथील आरोग्य सेवा कोलमडली आहे. प्रशिक्षणासाठी असलेल्या डॉक्टरांचा कार्यकाळ संपल्याने येथील पद रिक्त राहिले आहे. याठिकाणी कायम डॉक्टर देण्याची मागणी केली जात आहे.
महाड तालुक्यातील दासगाव येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची सुविधा कोलमडली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर गोरेगाव ते महाड दरम्यान महामार्गावर असलेले हे प्राथमिक आरोग्य केंद्र प्रमुख आधार आहे. या परिसरातील जवळपास २२ गावांसाठी याचा उपयोग होतो. शिवाय महामार्गावर अपघात झाल्यास देखील हेच आरोग्य केंद्र उपयोगात येते. मात्र गेली काही वर्षे याठिकाणी केवळ प्रशिक्षित डॉक्टर नेमले जात असल्याने येथील आरोग्य सेवा कोलमडली
आहे. नेमण्यात आलेल्या प्रशिक्षित डॉक्टरचा कार्यकाळ जून महिन्यात संपल्यानंतर आजतागायत याठिकाणी कोणीच डॉक्टर उपलब्ध झालेले
नाही.
या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांची दोन पदे मंजूर आहेत. मात्र गेली काही महिने केवळ प्रशिक्षित डॉक्टर नेमले जात आहेत. गरज पडेल तेव्हा याठिकाणी डॉक्टर उपलब्ध केले जात आहेत. तालुक्यातील इतर केंद्रातील डॉक्टर याठिकाणी आणले जातात. यामुळे सद्यस्थितीत या आरोग्य केंद्राची सेवा वाºयावर आहे.
दासगाव परिसरातील कोकरे, दाभोळ, सापे, टोल, वीर, आडी, दासगाव, वहूर, केंबुर्ली, गांधारपाले, करंजखोल, चांभारखिंड, नाडगाव, देशमुख कांबळे, शेल भोगाव, राजेवाडी, कोंडीवते, वडवली, इसाने कांबळे, चांढवे अशा २२ गावांचा समावेश आहे. यातील सर्वाधिक गावे ही दुर्गम भागातील आहेत. या गावांना याच प्राथमिक आरोग्य केंद्राचा आधार आहे. ऐन पावसाळ्यात साथीचे आजार, डेंग्यू, मलेरिया, ताप, आणि सर्प आणि विंचू दंश अशा आजारांना सामोरे जावे लागते. मात्र याठिकाणी डॉक्टरच उपलब्ध नसल्याने आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीमुळे ही अवस्था निर्माण झाली आहे.
>रायगड जिल्हा परिषदेचे या गणातील सदस्य जितेंद्र सावंत हे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य समितीवर अध्यक्ष म्हणून काम करतात. दरदिवशी याच मार्गावरून ते ये -जा करतात. मात्र आपल्या कार्यकक्षेतील कामाबाबत ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. तर महाड पंचायत समितीचे सदस्य सदानंद मांडवकर हे देखील येथील आरोग्य समितीवर सदस्य म्हणून काम करत आहेत. मांडवकर हे देखील याकडे दुर्लक्ष करत आहेत. याबाबत जितेंद्र सावंत आणि सदानंद मांडवकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
>गोरगरिबांच्या खिशाला कात्री
या प्राथमिक आरोग्य केंद्रात वर्षभरात जवळपास तेरा हजार रुग्णांनी लाभ घेतला आहे. सध्या याठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसल्याने निराश होऊन परत जावे लागत आहे. नाईलाजाने या रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे लागत आहे. यामुळे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी स्वत:चे पैसे मोजावे लागतात. या केंद्रांत दोन डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. गैरसोय होऊ नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपात डॉक्टर उपलब्ध केले जात आहेत.
- डॉ. एजाज बिरादार,
तालुका आरोग्य अधिकारी

Web Title: Dasgun health center, angry at the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.