मगरींच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी 'सिस्केप' सरसावले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 02:58 PM2019-03-24T14:58:12+5:302019-03-24T15:22:38+5:30

सावित्री नदीच्या पात्रातील मगरींच्या वास्तव्याने महाड परीसराची एक नवी ओळख झाली असली तरी त्यांची वाढती संख्या आणि नदीपात्राबाहेरील त्यांचा वाढता वावर यामुळे येथील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे.

crocodiles in savitri river mahad | मगरींच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी 'सिस्केप' सरसावले

मगरींच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी 'सिस्केप' सरसावले

googlenewsNext
ठळक मुद्देसावित्री नदीच्या पात्रातील मगरींच्या वास्तव्याने महाड परीसराची एक नवी ओळख झाली असली तरी त्यांची वाढती संख्या आणि नदीपात्राबाहेरील त्यांचा वाढता वावर यामुळे येथील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे. मगरींचे सुरक्षित स्थलांतर करण्याच्या कामात महाड परिसरातील ग्रामसाथांची खूप मोलाची मदत झाली आहे. सावित्री नदीच्या पात्रातील पाण्यात कार्बन व इतर विषारी घटक वाढल्याने पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण अत्यल्प झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

जयंत धुळप

अलिबाग - सावित्री नदीच्या पात्रातील मगरींच्या वास्तव्याने महाड परीसराची एक नवी ओळख झाली असली तरी त्यांची वाढती संख्या आणि नदीपात्राबाहेरील त्यांचा वाढता वावर यामुळे येथील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे. गेल्या वर्षातील या मगरींच्या होणाऱ्या मृत्यूनेही पर्यावरण प्रेमींकडून चिंता व्यक्त होत असताना महाडच्या सिस्केप संस्थेने या मगरींच्या मृत्यूचे कारण शोधण्यास सुरुवात केली आहे. याकरीता सिस्केपच्या सदस्यांनी सावित्री नदीच्या पात्रातील दूषित पाण्याचे नमुने परिक्षणाकरीता पाठविले आहे. 

2005 सालच्या महापुरानंतर सावित्री व गांधारी नदीच्या पात्रातील मगरींचे वास्तव्य उजेडात आले. गोड्या पाण्यातील मगर असे या मगरींचे नाव असून त्यांना मार्श क्रोकोडाईल (Marsh Crocodile) असेही म्हणतात तर त्याचे शास्त्रीय नाव क्रोकोडायलस पालूस्ट्रीस (Crocodylus palustris) असे आहे. या जातीच्या मगरींचे वास्तव्य देशभरातील सर्वच पाणथळ व नदींच्या पात्रात दिसून येतो व त्या माणसांवर स्वत: हून हल्ला करीत नसल्याचे तज्ञ म्हणतात. महाडच्या आसपास सन 2005 नंतर गेल्या 12 ते 13 वर्षात मगरींची संख्याही वाढत गेल्याने सावित्री नदीच्या पात्रातून डोकं वर काढून तरंगणाऱ्या व जबडा उघडून पाण्याबाहेर किनाऱ्यावर बसणाऱ्या मोठ्या मगरी दिसू लागल्या. अनेकवेळा सावित्रीनदीचे पात्र सोडून आसपासच्या पाण्याच्या जागांमध्ये काही मगरी स्थलांतरीत होऊ लागल्याचे अनेक नागरिकांना दिसून आले. त्याप्रमाणे त्यांचे योग्य स्थलांतर सिस्केप संस्थेच्या सदस्यांकडून आजपर्यंत होत आहे. 2013 पासून सिस्केप संस्थेने अशा वाट चुकलेल्या 39 मगरींचे सुरक्षित स्थलांतर केले. या उपक्रमात महाडच्या वनविभागाचे सहकार्य लाभले. गेल्या वर्षभरात चार मगरी वेगवेगळ्या ठिकाणी मृतावस्थेत आढळल्या. 6 ते 8 वर्ष वयोमान असलेल्या या मृत मगरी महाड येथील भोई घाट, मिलीटरी होस्टेल, वडवली व एक शेडाव नाक्याच्या आसपास सापडल्याने त्यांचा मृत्यू कशामुळे होत आहे हे शोधून त्यावर काही उपाययोजना करता येतील काय असा विषय सध्या सिस्केप संस्थेने हाती घेतली असल्याची माहिती संस्थेचे सदस्य प्रणव कुलकर्णी व योगेश गुरव यांनी दिली आहे. 

मगरींचे सुरक्षित स्थलांतर करण्याच्या कामात महाड परिसरातील ग्रामसाथांची खूप मोलाची मदत झाली आहे. नदीचे पात्र सोडून मगर कुठेही आल्याचे दिसताच नागरीक ताबडतोब वनखात्याकडे किंवा थेट सिस्केप संस्थेशी संपर्क साधतात याबाबत सिस्केप संस्थेचे गेल्या अनेक वर्षातील वन्य प्राण्यांबाबतचे प्रबोधन कामी येत असल्याचे सांगितले. गेल्या 18 वर्षात सिस्केप संस्थेकडून म्हसळा व महाड परिसरातील गिधाडांच्या नैसर्गिक संवर्धनाचा उपक्रम संपूर्ण जगात एकमेव ठरत असतानाच समुद्र गरूड, बगळे, धनेश सारखे इतर पक्षांचा वावर, विविध फुलपाखरांच्या प्रजातीचे छायाचित्रांचे संग्रह, जैवविविधता आणि वन्य प्राण्यांचे संवर्धनासाठी जनजागरण यासह आता मगरींच्या संवर्धनाचा व संरक्षणाचा विषयही सिस्केप संस्थेने हाती घेतला आहे. गेल्या वर्षभरात महाड परिसरातील मगरींच्या वास्तव्याच्या ठिकाणांची पाहणी सिस्केप संस्थेने केली असून त्यांच्या अधिवासाचा नकाशा देखील तयार करण्याचे काम सुरू आहे. 

सिस्केप संस्थेकडून मगर बचाव मोहिमेत गेल्या आठवड्यात सावित्री नदीतील मगरींच्या वास्तव्याच्या जागेतील पाण्याचे 14 ठिकाणाचे नमुने अलिबाग येथील जे.एस.एम महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. त्याचा अहवाल आल्यावर मगरींचा मृत्यू विषारी पाण्यामुळे झाला आहे किंवा कसे याबाबत अभ्यास करता येईल. सावित्री नदीच्या पात्रातील पाण्यात कार्बन व इतर विषारी घटक वाढल्याने पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण अत्यल्प झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळेच याच सावित्री नदीच्या पात्रात काही दिवसापूर्वी मासे देखील मोठ्या प्रमाणात मृत झाल्याचे दिसून आले होेते. महाड औद्योगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाणी वहूर शहरातील गटाराचे सांडपाणी थेट नदीच्या पात्रात जात असल्याने तर सावित्रीचे पाणी प्रदूषित झाले आहेच शिवाय मासेमारी करताना काहीजण स्फोटके व  विषारी द्रव्यांचा वापर करतात अशीही माहीती पुढे आली आहे. त्याचा परिणाम मगरींच्या मृत्यूमध्ये होतो किंवा कसे याबाबतही उलगडा होईल. या कार्बनयुक्त पाण्यामुळे मगरींच्या डोळ्यांवर परीणाम होत असून त्यांच्या दृष्टीवर परीणाम झाल्याने नदीच्या किनाऱ्यावरुन त्या भरकटत दूर जातात. आजपर्यंत स्थलांतरीत केलेल्या मगरी या पाण्यापासून किमान 100 ते 700 मीटर अंतरावर सापडल्या आहेत.

सिस्केपच्या या नव्या प्रयत्नातून काय हाती लागेल हे येणारा काळच सांगेल. तोपर्यंत नागरीकांमध्ये होणारी अशा वन्य प्राण्यांसंबंधी जागरूकता व एकूणच पर्यावरणाच्या संरक्षणाची जाणीव वाढतेय याचे पक्षी व वन्यप्राणीप्रेमींमध्ये समाधान व्यक्त होत आहे.  

या आठवड्यात दोन मगरींना जीवदान

या आठवड्यात महाड जवळील दासगाव येथे मगरीचे पिल्लू व वहूर  येथे सहा फूट मगरीचे स्थलांतर सावित्री नदीत सिस्केप संस्थेकडून करण्यात आले.

महाडजवळील दासगाव येथील पंचशील नगर मधील बौद्ध वाडीत अक्षय हाटे याचे घराजवळील एका पडीक इलेक्ट्रीक पोलच्या आडोशाला साडेतीन फुट मगर निदर्शनास आली. थोडीशी घबराट झाली पण तेथील अनिस कासेकर या निसर्गमित्राने स्थानिक युवकांच्या मदतीने तिला सुरक्षित पकडण्यात आले. वनखात्याकडे संपर्क साधल्यानंतर महाड वनखात्याचे बी. टी. पवार व पी. व्ही. गायकर व सिस्केप संस्थेच्या योगेश गुरव, चिंतन वैष्णव, चिराग मेहता व प्रणव कुलकर्णी यांनी त्या मगरीच्या पिल्लास सावित्री नदीच्या पात्रात सुरक्षित सोडून दिले.  यावेळी अक्षय हाटे, अनीस कासेकर यांनीही या स्थलांतर मोहिमेत मदत केली. तर वहूर येथे आलेली सहा फूट मगर पकडून तिचेही सुरक्षित स्थलांतर सिस्केपकडून करण्यात आले.
 

Web Title: crocodiles in savitri river mahad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.