वळके गावात व्यावसायिक गाळ्यावर घरांचे बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 03:04 AM2018-03-16T03:04:27+5:302018-03-16T03:04:27+5:30

रायगड जिल्हा परिषदेमधील एकामागून एक घोटाळे समोर येत आहेत. मुरुड तालुक्यातील वळके ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचार आता उघड झाला आहे.

Construction of houses on a commercial road in the village | वळके गावात व्यावसायिक गाळ्यावर घरांचे बांधकाम

वळके गावात व्यावसायिक गाळ्यावर घरांचे बांधकाम

Next

अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेमधील एकामागून एक घोटाळे समोर येत आहेत. मुरुड तालुक्यातील वळके ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचार आता उघड झाला आहे. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आणि ग्रामसेविका यांना विस्तार अधिकारी यांनी दोषी ठरवले आहे. घोटाळेबाजांच्या विरोधात अहवाल असतानाही उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांनी अद्यापही कोणतीच ठोस कारवाई होत नसल्याने परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
प्रशासनाने दोषींवर कडक कारवाई न केल्यास ग्रामस्थांसह जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या राजश्री मिसाळ यांनी दिला आहे.
वळके ग्रामपंचायतीने १९९४-९५, १९९५-९६ या कालावधीत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत मंजूर करुन ग्रामपंचायतीच्या मालकीच्या येसदे येथील जागेवर व्यावसायिक गाळ््यांचे बांधकाम केले होते. दारिद्र्य रेषेखाली तसेच बेरोजगार असलेल्या तरुणांना हे गाळे भाड्याने देऊन त्यामार्फत ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढावे या हेतूने गाळ््यांचे बांधकाम करण्यात आले होते. सदरचे चार गाळे ग्रामपंचायत सदस्य किशोर काजारे यांना ग्रामपंचायतीने भाडेतत्त्वावर दिले होते. त्यानंतर २०१३ रोजी किशोर यांनी आपल्या ग्रामपंचायत सदस्य पदाचा गैरवापर करुन गाळ््यांच्या जागेवर पक्क्या घरांचे बांधकाम केले. तसेच ग्राम निधी विकासासाठी न वापरता स्वत:च्या फायद्यासाठी वापरला गेला. दोन्ही प्रकरणात किशोर यांनी ग्रामसेवक राहुल पोरे आणि ग्रामसेविका आशा बिरवाडकर, स्वप्नाली नाईक यांना हाताशी धरुन ग्रामपंचायतीची मिळकत लाटण्याचा प्रयत्न केला. त्या विरोधात ग्रामस्थांनी पंचायत समिती यांच्याकडे २०१५ रोजी तक्रार केली होती, अशी माहिती पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मोहिते यांनी दिली. या गैरव्यवहाराबाबत पंचायत समितीने डोळेझाक केली होती, असेही त्यांनी स्पष्ट
केले.
ग्रामस्थांनी लावलेल्या सातत्याच्या रेट्यामुळे अखेर पंचायत समितीने विस्तार अधिकारी चव्हाण यांना याबाबतचा तपास करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार विस्तार अधिकारी चव्हाण आणि गटविकास अधिकारी वाणी यांनी याबाबतचा अहवाल तयार केला. त्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य किशोर काजारे, ग्रामसेवक राहुल पोरे, ग्रामसेविका आशा बिरवाडकर यांच्यासह अन्य काही जण दोषी असल्याचा अहवाल पंचायत समितीसह जिल्हा परिषदेला दोन महिन्यांपूर्वीच पाठवला
आहे. दरम्यान, रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
>अहवाल ग्रामपंचायतीकडे धूळखात
गेल्या दोन महिन्यांपासून रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे अहवाल धूळखात पडलेला आहे. उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर यांनी या अहवालावर अद्याप कारवाई का केली नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
प्रकाश खोपकर हे कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण होऊन ते त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्या राजश्री मिसाळ यांनी केला आहे.

Web Title: Construction of houses on a commercial road in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.