धोकादायक गावांतील नागरिकांना स्थलांतर करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 02:55 AM2018-06-21T02:55:03+5:302018-06-21T02:55:03+5:30

महाड तालुक्यात दरडग्रस्त गावांमध्ये वाढ झाली असून यावर्षी ४९ गावे दरडग्रस्त गावे म्हणून तर पूररेषेखाली ५० गावे जाहीर झाली आहेत.

Commuters to move dangerous villages | धोकादायक गावांतील नागरिकांना स्थलांतर करण्याचे आदेश

धोकादायक गावांतील नागरिकांना स्थलांतर करण्याचे आदेश

Next

- सिकंदर अनवारे 
दासगाव : महाड तालुक्यात दरडग्रस्त गावांमध्ये वाढ झाली असून यावर्षी ४९ गावे दरडग्रस्त गावे म्हणून तर पूररेषेखाली ५० गावे जाहीर झाली आहेत. या धोकादायक गावांमध्ये असलेल्या ग्रामस्थांना स्थानिक प्रशासन खबरदारीचा उपाय म्हणून ऐन पावसाळ्यात स्थलांतर करण्याचा सूचना दिल्या जातात. मात्र केवळ स्थलांतर करण्याच्या सूचना देत बसण्यापेक्षा ठोस कारवाई करत नसल्याने प्रश्नाच्या कार्यवाहीवर ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
महाड तालुका हा दऱ्याडोंगरात वसलेला तालुका आहे. या भौगोलिक स्थितीमुळे आणि मोठ्या पर्जन्यमानामुळे याठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रमाण अधिक आहे. सन २००५ मध्ये महाड तालुक्यात दासगाव, जुई, कोंडीवते या गावात दरडी कोसळून मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाली होती. यानंतर महाड तालुक्यात दरडींचा विषय गंभीरपणे घेतला जात असला तरी प्रतिवर्षी धोकादायक गावांची यादी जाहीर करून या गावातील ग्रामस्थांना ऐन पावसाळ्यात आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना नोटिशीद्वारे केली जाते. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार ही गावे दरडग्रस्त जाहीर झाली आहेत. यामध्ये कमी, मध्यम व अतिधोकादायक अशी वर्गवारी करण्यात आलेली आहे. दरड कोसळणे,जमिनीला भेगा पडणे अशा घटना येथे घडल्या असल्यामुळे अतिवृष्टी होऊ लागली की येथील नागरिक भयभीत होतात. दरडग्रस्त व पुराचा धोका संभवणारी अनेक गावे तालुक्यात असल्याने या गावातील ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. तालुक्यातील बहुतांशी गावे दुर्गम असून शेती व इतर उपजीविकेची साधने गावातच असल्याने गाव सोडून जाण्यास ग्रामस्थ राजी नाहीत. पावसाळ्यात या ग्रामस्थांना स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या जातात. परंतु स्थलांतरित ठिकाणी निवारा, भोजन व इतर व्यवस्था या अडचणीमुळे बहुतांशी ठिकाणी स्थलांतरित होण्यास ग्रामस्थांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने प्रशासनही हतबल झालेले आहे. २००५च्या आपत्तीनंतर सलग आठ वर्षे या भागातील धोकादायक गावांचा अभ्यास करण्यात आला. पाण्याचा वेग, पर्जन्यमान, पाण्याचे मार्ग, डोंगर व भूर्गभातील हालचाली अशा विविध प्रमाणानुसार काही निष्कर्ष काढण्यात आले. यामध्ये अतिवृष्टी हे प्रमुख कारण आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने या भागात भेटी दिल्या व त्यानंतर ही गावे दरडग्रस्त जाहीर करण्यात आली. पावसाळ्यात गाव तसेच घर सोडून देणे सहज शक्य नाही. शिवाय प्रशासन अन्य ठिकाणी कोणतीच सुविधा उपलब्ध करून देत नसल्याने याच धोकादायक गावात ग्रामस्थ आपला जीव मुठीत घेवून राहत आहेत.
>नोटीस देवून स्थलांतर करण्याचे सांगणे म्हणजे प्रशासन कातडी वाचवण्याचे काम करीत आहे. आपली जबाबदारी झटकण्याचे काम प्रशासन करत असून ठोस कार्यवाही करण्याची गरज आहे.
- दिलीप उकिर्डे, सरपंच दासगाव
महाडमधील धोकादायक गावांची संख्या ही भूगर्भशास्त्रज्ञ विभागाकडून ठरवण्यात आली आहेत. या गावातील लोकांनी आपली सुरक्षा म्हणून तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर करावे आणि शासकीय पातळीवर ठोस कार्यवाही करण्याचे काम सुरु आहे.
- चंद्रसेन पवार, तहसीलदार महाड
>दरड कोसळलेली गावे व मृत : सन १९९४ - पारमाची (१२),
सन २00५ - जुई - ९४, दासगाव-४८, कोंडीवते ३३ व रोहन-१५

Web Title: Commuters to move dangerous villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.