पाणीबचतीसाठी प्रत्येक गावात नेमणार जलदूत, प्रशासकीय यंत्रणेबरोबरच नागरिकांचा पुढाकार आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 02:56 AM2018-03-17T02:56:22+5:302018-03-17T02:56:22+5:30

पाणी हे जीवन असून अमूल्य आहे. पाणीबचतीचा संदेश सर्वदूर पोहचावा यासाठी प्रशासकीय यंत्रणेबरोबरच प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेतला पाहिजे.

Citizen initiatives to be set up in each of the villages for water conservation; | पाणीबचतीसाठी प्रत्येक गावात नेमणार जलदूत, प्रशासकीय यंत्रणेबरोबरच नागरिकांचा पुढाकार आवश्यक

पाणीबचतीसाठी प्रत्येक गावात नेमणार जलदूत, प्रशासकीय यंत्रणेबरोबरच नागरिकांचा पुढाकार आवश्यक

Next

- जयंत धुळप
अलिबाग : पाणी हे जीवन असून अमूल्य आहे. पाणीबचतीचा संदेश सर्वदूर पोहचावा यासाठी प्रशासकीय यंत्रणेबरोबरच प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेतला पाहिजे. जलजागृती सप्ताहात पाण्याचे महत्त्व जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येक गावात जलदूत तयार करून जनजागृती करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत जिल्ह्यात १६ ते २२ मार्चदरम्यान जलसंपदा विभागाच्या माध्यमातून आयोजित जलजागृती सप्ताहाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. त्यावेळी डॉ.सूर्यवंशी बोलत होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी उत्तर कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रकाश मिसाळ होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके, रायगड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे, रायगड जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी.एन.साळुंखे, हेटवणे मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एस.डी.गाढे, पर्यावरण समितीच्या सचिव संगीता जोशी, प्रा. हेमंत सामंत आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सूर्यवंशी म्हणाले, जगण्यासाठी जसा श्वास महत्त्वाचा तसेच पाणी महत्त्वाचे आहे. पाण्याचे यथायोग्य नियोजन करणे काळाची गरज आहे. प्रत्येकाने पाणीबचतीचा अवलंब करावा. या सप्ताहात जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयात पथनाट्याद्वारेही जनजागृती करावी असे निर्देशही त्यांनी दिले.
जिल्ह्यात पाणी अडवा, पाणी जिरवा या संकल्पनेतून जलयुक्त शिवार योजनाही फलदायी ठरली आहे. पाण्याचा अपव्यय होणार नाही याकरिता सर्वांनी दक्षता घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी अखेरीस सांगितले.
पर्यावरण समितीच्या सचिव संगीता जोशी व प्रा. हेमंत सामंत यांनी पाणीबचत व जलजागृती सप्ताहाचे महत्त्व विशद करून उपस्थितांना सांगितले. जिल्ह्यातील अंबा, कुंडलिका, सावित्री, पाताळगंगा, उल्हास या नद्यांतील पाणी एकत्र करून जलकलशाचे पूजनही यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जलसाक्षरता अभियानाबाबत स्वामी कला मंच संस्थेच्या कलाकारांनी जलबचतीवर नाट्य सादर केले. तर उत्तर कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ ठाणे व पाटबंधारे मंडळ रायगड आणि सरिता कला मंच अहमदनगर यांनी जलजागृतीपर गीत सादर केले. जलप्रतिज्ञेचे सामूहिक वाचन करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील विविध पाटबंधारे प्रकल्पांची माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली. रायगड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे यांनी प्रास्ताविकात सप्ताहादरम्यान राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली तर आभार हेटवणे मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एस.डी.गाढे यांनी मानले.
>जलव्यवस्थापनातून बचत शक्य
पाणी हा विषय जीवनाशी निगडित असून त्याचा वापर करताना प्रत्येकाने काळजीपूर्वक केल्यास पाण्याची बचत होऊ शकते. जिल्ह्यातील नद्या, तलाव, पाझर, झरे आदी सर्व जलस्रोतांचे जलव्यवस्थापन शाश्वत पध्दतीने केल्यास पाण्याची बचत होऊन आपले जीवनमान उंचाविण्यासाठी त्याची मदत होईल, असे मत यावेळी
उत्तर कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रकाश मिसाळ यांनी व्यक्त केले.
कोकणामध्ये पाऊस चांगल्याप्रकारे होत असल्यामुळे त्याचे जलव्यवस्थापन होणेही गरजेचे आहे. नागरिकांनी पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेच्या माध्यमातून आपल्या शेतामध्ये भाजीपाल्याची लागवड करून उत्पन्नाचे स्रोत निर्माण करावे,असेही त्यांनी अखेरीस सांगितले.

Web Title: Citizen initiatives to be set up in each of the villages for water conservation;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.