सिडको गृहप्रकल्पामुळे दलालांची चांदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 04:00 AM2018-08-19T04:00:46+5:302018-08-19T04:01:43+5:30

घरे मिळवून देण्याचे आमिष; अल्प आणि दुर्बल घटकांतील अर्जदारांच्या अडचणी

Brokers' Silver due to CIDCO Home Impact | सिडको गृहप्रकल्पामुळे दलालांची चांदी

सिडको गृहप्रकल्पामुळे दलालांची चांदी

Next

नवी मुंबई : सिडकोने जाहीर केलेली १४८३८ घरांची योजना दलालांच्या चांगलीच पथ्यावर पडली आहे. अर्ज भरण्यापासून ते थेट घर मिळवून देण्यापर्यंतचे आमिष दाखवून गरजूंना लुबाडण्याचा धंदा तेजीत आला आहे. यात सर्वसामान्यांचीच फसवणूक होण्याची शक्यता आहे.
अल्प आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सिडकोने गृहयोजना जाहीर केली आहे. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन करण्यात आले. तर प्रत्यक्ष आॅनलाइन नोंदणीला स्वातंत्र्यदिनापासून सुरुवात करण्यात आली आहे. सिडकोचा आतापर्यंतचा हा सर्वात मोठा गृहप्रकल्प आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ही घरे उभारली जात आहेत. त्यामुळे अल्प आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील ग्राहकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे, असे असले तरी सिडकोने प्रथमच अर्ज भरण्याची प्रक्रिया आॅनलाइन केली आहे. ही प्रक्रिया अल्प आणि दुर्बल घटकांतील अर्जदारांना अडचणीची ठरू लागली आहे. पोर्टलवर जाऊन नावनोंदणी करणे, त्यानंतर प्रत्यक्ष अर्ज दाखल करणे, पेमेंट भरणे, या सर्व प्रक्रियांबाबत हा घटक काहीसा अनभिज्ञ असल्याने याचा नेमका फायदा दलाल मंडळींनी घेतला आहे. विशेष म्हणजे, या योजनेत नंबर लागला नाही तरी डिसेंबर महिन्यात येऊ घातलेल्या २५ हजार घरांच्या दुसऱ्या प्रकल्पात नक्की घर मिळेल, अशी हमीही दिली जात आहे.
सिडकोच्या घरांसाठी आॅनलाइन अर्ज भरायचे आहेत. सर्वसामान्यांच्या दृष्टीने ही प्रक्रिया किचकट असल्याने शहरातील सायबर कॅफे आणि डीटीपी सेंटर्सची चांदी झाली आहे. काहींनी तर छापील अर्ज काढले आहेत. हे अर्ज १०० ते २०० रुपयांना विकले जात आहेत. सिडकोच्या पोर्टलवर नोंदणी करण्याबरोबरच अर्ज भरून दिले जात आहेत, त्यामुळे ग्राहकांची अडचण काही प्रमाणात दूर झाली आहे.

सिडकोचे आवाहन
नोंदणीसह अर्ज व लॉटरी प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे होणार असल्याने यात कोणताही बाह्य हस्तक्षेप शक्य नाही, त्यामुळे नागरिकांनी कोणाच्याही आमिषाला बळी पडू नये. काही शंका असल्यास सिडकोच्या संबंधित विभागाशी संपर्क साधून माहिती घ्यावी, असे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Brokers' Silver due to CIDCO Home Impact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.