The bridge on the Mahisadhar river on the highway is dilapidated | महामार्गावरील महिसदरा नदीवरील पूल जीर्ण
महामार्गावरील महिसदरा नदीवरील पूल जीर्ण

धाटाव : मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग १७ वरील कोलाड पुई येथील महिसदरा नदीवरील पुलाचे कठडे तुटले असून हा पूल पूर्णपणे जीर्ण अवस्थेत असल्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या जड अवजड वाहन चालकांसह प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

या महामार्गावरील कोलाड पुई येथील महिसदरा नदीचा पूल हा ब्रिटिश काळात बांधण्यात आला असुन तो अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. पुलाचे दोन्ही बाजूचे कठडे तुटलेले आहेत. यावरून अवजड वाहन गेले तर हा पूल पूर्णपणे हादरला जातो. त्यामुळे या पुलावरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे. गेल्या सहा ते सात वर्षापासून मुंबई- गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून त्यात म्हणावी तशी प्रगती नाही. तसेच महिसदरा नदीवरील नवीन पुलाच्या बांधकामालाही अद्याप सुरुवात नाही.

पनवेल ते इंदापूर दरम्यानचे चौपदरीकरणाच्या कामात किमान वर्षातून फक्त २० किलोमीटर अंतराचा रस्ता केला असता तर या रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झाले असते. कामाच्या नियोजनाच्या अभावाने व एकंदरीत कामाच्या वेगावरून या रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागेल हे सांगता येत नाही.

यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून अशा दुर्लक्षामुळे सावित्री नदी पुलासारख्या दुर्घटना घडतात व नंतर कोट्यवधी रु पये खर्च केले जातात, परंतु अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात त्यानंतर शासनाला जाग येते. अशा घटना न घडण्याअगोदर शासनाने उपाययोजना कराव्यात यासाठी लोकप्रतिनिधी व संबंधित व्यक्ती यांनी लक्ष देण्याची गरज आहे, असे नागरिकांचे म्हणणे असून दुरुस्तीची मागणी जोर धरत आहे.

अपघाताची शक्यता
मुंबई-गोवा मार्गावर अनेक पर्यटन स्थळे व कारखाने आहेत यामुळे येथे नेहमी वाहनांची सतत वर्दळ सुरू असते त्यामुळे सतत मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत असते. यातून घाईघाईने मार्ग काढताना तुटलेले कठडे लक्षात न आल्यास मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.


Web Title: The bridge on the Mahisadhar river on the highway is dilapidated
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.