आंबेत, टोल, दादली पूल धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 03:31 AM2018-08-14T03:31:12+5:302018-08-14T03:31:24+5:30

शेकडो खेड्यापाड्यांसह रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांना जोडण्यासाठी महाड तालुक्यातील टोल, दादली आणि म्हसळा तालुक्यातील आंबेत या तीन पुलांची उभारणी करण्यात आली.

Ambet, toll, and dadali bridge are dangerous | आंबेत, टोल, दादली पूल धोकादायक

आंबेत, टोल, दादली पूल धोकादायक

googlenewsNext

- सिकंदर अनवारे
दासगाव  - शेकडो खेड्यापाड्यांसह रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांना जोडण्यासाठी महाड तालुक्यातील टोल, दादली आणि म्हसळा तालुक्यातील आंबेत या तीन पुलांची उभारणी करण्यात आली. दरम्यान, प्रशासनाकडून स्ट्रक्चरल आॅडिट किंवा अंडरवॉटर सर्वेक्षण न करता, फक्त मलमपट्टीसाठी लाखो रुपयांची उधळण करण्यात आली.
अधीक्षक अभियंता पूल विभाग यांच्या सर्वेक्षणानंतर हे तिन्ही पूल धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर महाड सार्वजनिक बांधकाम विभागाने पूल कमकुवत झाल्याचा सूचनाफलक लावण्याने प्रवासी व वाहनधारकांमध्ये एकच खळबळ माजली आहे.
बॅ. ए. आर. अंतुले यांनी ३४ वर्षांपूर्वी मुख्यमंत्री असताना, महाड शहरानजीक दादली, टोल पूल आणि म्हसळा तालुक्यातील आंबेत पूल या तीन पुलांची उभारणी केली. त्यामुळे खाडीपट्ट्यातील अनेक गावे महाड शहराला जोडली गेली आणि या परिसरातील होडी मार्ग बंद होऊन एक वाहन मार्ग तयार झाला. परिणामी, दळणवळणाला चालना मिळून मुंबई-गोवा राष्टÑीय महामार्गाला जोडण्यासाठी हे पूल महत्त्वाचे ठरले.
गेल्या ३४ वर्षांत प्रशासनाकडून पुलावरील खड्डे भरणे, रेलिंगची कामे करणे, छोटी-मोठी डागडुजी यावर लाखो रुपयांची उधळण करण्यात आली. मात्र, एकदाही पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याकडे लक्ष दिले नाही.
सध्या या तिन्ही पुलांचा महाड सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत अधीक्षक अभियंता पूल विभाग यांच्याकडून सर्व्हे करण्यात आला. सर्व्हेमध्ये तिन्ही पूल कमकुवत असून वाहतुकीस धोकादायक असल्याचे समोर आले आहे. मात्र, अशा प्रकारचा अहवाल महाड सा. बां. खात्याकडूनही वरिष्ठ कार्यालयास देण्यात आला आहे. तिन्ही पूल धोकादायक असून अवजड वाहतुकीमुळे कधीही कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तरीही वाहतूक सुरूच
दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या तीन पुलांच्या सा. बां. खात्याने स्ट्रक्चरल आॅडिटनंतर धोकादायक स्थितीचा अहवाल शासनाला दिला आहे. तसा सूचनाफलकही पुलावर लावण्यात आला आहे.
तिन्ही पुलांवरून दररोज शेकडो वाहने ये-जा करत आहेत. पैकी दादली पूल हा महाडनजीक असल्याने वर्दळ जास्त असते. हजारो नागरिक पायी ये-जा करतात.
सा. बां. खात्याच्या बोर्डनुसार एखादी अपघाती घटना घडली तर याला जबाबदार कोण? तसेच क्षमतेपेक्षा जादा वाहतुकीवर कोण निर्बंध घालणार? नुसता फलक लावून जबाबदारी झटकण्याचे काम बांधकाम विभागाने केले आहे.

चाकरमान्यांना मनस्ताप
कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असून टोल, आंबेत मार्गे चाकरमानी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये येतात. मात्र, कमकुवत पुलाच्या भीतीने यंदा चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. सध्या रात्रीच्या वेळी स्थानिक नागरिक पुलावरून प्रवास टाळत आहेत. गणेशोत्सवातही चाकरमान्यांनी या मार्गे प्रवास टाळला तर त्यांना खेड मार्गे यावे लागेल.
अधीक्षक अभियंता पूल विभाग यांनी स्वतंत्रपणे पुलांची पाहणी करून स्ट्रक्चरल आॅडिटचाही अभ्यास केला. त्यानंतर हे पूल कमकुवत असल्याचे निदर्शनास आल्याने येथे सूचनाफलक लावले आहेत. २० टन क्षमतेची वाहने व २० वेगमर्यादा केली गेली आहे. पुलांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहेत.
- बी. एन. वहिर, कार्यकारी अभियंता,
सा. बां. विभाग, महाड

Web Title: Ambet, toll, and dadali bridge are dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.