वायुगळती प्रकरण: महाड एमआयडीसीमुळे नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 11:59 PM2019-03-14T23:59:12+5:302019-03-14T23:59:25+5:30

वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे जिते गावातील ग्रामस्थ संतप्त; काही काळ तणाव

Airgate Case: Mahad MIDC Civilians suffer | वायुगळती प्रकरण: महाड एमआयडीसीमुळे नागरिक त्रस्त

वायुगळती प्रकरण: महाड एमआयडीसीमुळे नागरिक त्रस्त

- सिकंदर अनवारे 

दासगाव : महाड औद्योगिक क्षेत्रातील सी झोनमध्ये बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास बिन भिंतीच्या पॅनोरमा केमिकल या कंपनीत ईडीसी केमिकलवर प्रोसेस करताना अचानक वायुगळती होवून संपूर्ण परिसरात धूर पसरला. त्यामुळे परिसरात अंधार निर्माण झाला होता. जवळच असलेल्या जिते गावातील ग्रामस्थांना याचा त्रास सहन करावा लागला. महाड औद्योगिक क्षेत्रातील रिस्पॉन्स एड ग्रुप आणि अग्निशमन दलाने याठिकाणी धाव घेत साडेतीन तासाने अथक प्रयत्न करून गळती नियंत्रणात आणली. झालेल्या त्रासाने मात्र परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

बुधवारी रात्री महाड एमआयडीसीमधील पॅनोरमा केमिकल या डीस्टीलेशनचे काम करत असलेल्या कारखान्यातून वायुगळती झाली. यामुळे परिसरात दाट धुके सदृश परिस्थिती निर्माण झाली. दाट धुरामुळे डोळ्यांना देखील याचा त्रास जाणवत असल्याची तक्र ार जिते गावातील ग्रामस्थांनी पोलिसांकडे के ली. त्यानंतर याठिकाणी महाड औद्योगिक वसाहतीमधील तज्ज्ञ पथक आणि औद्योगिक अग्निशमन पथक दाखल झाले. वायुगळती झाल्याने कंपनीतील रात्रपाळीवर असलेले केवळ दोन कामगार पळून गेले. यामुळे कंपनीतील प्रक्रि या समजणे कठीण होते. अखेर ज्या टाकीतून वायुगळती होत होती त्यावर पाण्याचा फवारा मारून कुलिंग प्रोसेस करण्यात आली. यामुळे जवळपास दोन तासाने परिसरातील धूर कमी झाला आणि ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

स्थानिक तज्ज्ञ पथकाने दिलेल्या माहितीनुसार हा लहान प्लांट असून यामधून ईडीसी डीस्टीलेशनसह स्वच्छ करून पाठवून देण्याचे काम केले जाते. बुधवारी हे काम करत असताना रिअ‍ॅक्टरची व्हेपर लाइन लिकेज झाली. यातून ही वाफ मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागली. ही वाफ मानवी आरोग्यास धोकादायक नसली तरी ज्वलनशील असल्याने काळजी घेण्याचे स्थानिक ग्रामस्थांना सुचवले. घटनास्थळी दोन अग्निशमनच्या गाड्या दाखल झाल्या होत्या. या कारखान्यात जेमतेम दोन कामगार काम करत होते ते देखील स्थानिक ग्रामस्थांच्या भीतीने पळून गेले. महाड स्पॅम पथकाने ही वायुगळती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. वायुगळतीमुळे अंगाला खाज सुटणे, डोळे जळजळणे, घसा खवखवणे असा त्रास जाणवू लागला. अधिक प्रमाणात जर हा वायू शरीरात गेला तर हृदयविकाराने मृत्यू होण्याची संभावना रिस्पॉन्स एड ग्रुप महाडचे सी.डी.देशमुख यांनी व्यक्त केली.

परिसरातील ग्रामस्थ भयभीत
महाड औद्योगिक क्षेत्राला लागूनच अनेक गावे आहेत. औद्योगिक क्षेत्रात होणाऱ्या वारंवार घटनेचा त्रास मात्र या गावांना सहन करावा लागतो. बुधवारी झालेल्या या घटनेने जिते गावावर संपूर्ण वायू पसरल्याने अंधाराचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे एकच खळबळ माजली. जिते ग्रामस्थांनी आपल्या दरवाजाला कड्या लावून एकमेकांना फोन लावत घटना काय घडली याची माहिती घेत होते. मात्र दीड ते दोन तास या लोकांना काहीच माहिती समजली नाही. घटनेवर नियंत्रण आणल्यानंतर धुके कमी झाले, त्यानंतर लोक कंपनीच्या दिशेने धावले आणि संतापाची लाट उसळली. मात्र पोलीस प्रशासनाने याठिकाणी वेळीच हस्तक्षेप करून नागरिकांना शांत केले. कितीवेळा अशा घटनांना सामोरे जायचे असा संतप्त प्रश्न नागरिकांमधून केला जात होता तर संबंधित जे अधिकारी अशा कारखान्यांना सूट देत असल्याने त्यांचाही निषेध करण्यात येत होता.

कामगार सुरक्षा आणि आरोग्य विभागाचे दुर्लक्ष
महाडमध्ये असे अपघात कायम होत असतात. याकडे शासनाच्या कामगार सुरक्षा आणि आरोग्य विभागाचे देखील लक्ष नाही. कायम होत असलेल्या अपघातांना हे अधिकारी पाठबळ देत असल्याचे दिसून येत आहे. कंपनी उभी करताना असलेले नियम धाब्यावर बसवून कंपनी उभी केली जात आहे. अनेक कारखान्यांच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. अनेकांनी जीर्ण प्लांट तसेच सुरु ठेवले आहेत, मात्र तरी देखील कोणतीच कारवाई होत नसल्याने कामगार सुरक्षा आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची देखील सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

वायुगळतीबाबत या कंपनीत दोन वेळा भेट दिली, मात्र माहिती देण्यासाठी कंपनीत एकही कामगार अगर अधिकारी उपस्थित नव्हता. वायुगळती आटोक्यात आली आहे.
- जयदीप कुंभार, क्षेत्र अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ महाड

रात्री या कंपनीच्या परिसरात दाट धूर निर्माण झाल्याने ग्रामस्थ भयभीत झाले, या कंपनीत माहिती देण्यासाठी कोणीही थांबले नाही. कंपनीच्या हलगर्जीपणाबाबत कंपनी प्रशासनावर कारवाई केली जाईल.
- आबासाहेब पाटील,
पोलीस निरीक्षक,
एमआयडीसी पोलीस ठाणे

अशा वारंवार होत असलेल्या घटना रोखल्या जात नाहीत. गावाला हानी झाल्यानंतर नियंत्रण आणले जाते. रात्रीची जी घटना घडली त्यात संपूर्ण गावातील ग्रामस्थ गाव सोडून पळ काढण्याच्या मार्गावर होते. मात्र या संबंधित अधिकारी अशा घटनांना जबाबदार असून त्यांच्यावर कठोर कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अशा घटनांना आळा बसणार नाही.
- अमीर काझी, ग्रामस्थ, जिते

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कारखाना नियम धाब्यावर
ही कंपनी लघु क्षेत्रातील असली तरी कारखाना नियम धाब्यावर बसवून सुरू आहे. जेमतेम तीन ते चार कामगार याठिकाणी काम करत असून कंपनीच्या दरवाजावर कुठेही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम पाळले गेलेले दिसून येत नाहीत. या कंपनीची इमारत देखील अर्धवट अवस्थेत असून कंपनी सुरु करण्यास परवानगी कशी दिली असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी रात्री आक्र मक पवित्रा घेवून एमआयडीसी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली.

Web Title: Airgate Case: Mahad MIDC Civilians suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.