ग्रामीण ‘अर्थसत्ते’साठी राजकीय प्रतिष्ठा पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 03:40 AM2019-02-18T03:40:28+5:302019-02-18T03:40:44+5:30

ग्रामपंचायत निवडणुका : आजी-माजी लोकप्रतिनिधी उतरले मैदानात

The achievement of political prestige for rural 'economics' | ग्रामीण ‘अर्थसत्ते’साठी राजकीय प्रतिष्ठा पणाला

ग्रामीण ‘अर्थसत्ते’साठी राजकीय प्रतिष्ठा पणाला

googlenewsNext

अलिबाग : केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी वितरीत केला जातो, त्याचप्रमाणे संबंधित ग्रामपंचायतींना विविध कररूपातूनही मोठ्या संख्येने निधी प्राप्त होत असल्याने ग्रामीण स्तरावरील अर्थकारणावर गेली काही वर्षे सर्वांचेच लक्ष केंद्रित झाले आहे. रायगड जिल्ह्यातील ९० ग्रामपंचायतींच्या निवडणुका २४ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहेत. ग्रामीण भागातील ‘अर्थसत्ते’वर आपलेच वर्चस्व राहावे, यासाठी सर्वच राजकीय पक्षप्रमुखांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. आपापल्या उमेदवारांच्या प्रचारामध्ये कोणतीच कसर राहू नये, यासाठी आजी-माजी आमदार आणि आजी-माजी जिल्हा परिषद सदस्यही मैदानात उतरल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येते.

९० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी प्रत्यक्षात २२६ उमेदवार रिंगणात आहेत, तर ८४५ सदस्यपदांच्या जागेसाठी एक हजार ६३१ असे एकूण एक हजार ८५७ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. या निवडणुकीमध्ये सोयीस्कर आघाड्या आणि युत्या केल्याचे दिसत असले, तरी प्रामुख्याने शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विरोधात शिवसेना भाजपा उभी ठाकली आहे. काही ठिकाणी तर काँग्रेसनेही शिवसेना-भाजपासोबत हातमिळवणी केल्याचे दिसून येते. त्यामुळे एके काळी पक्षनिष्ठेसाठी डोक्यावर, अंगावर दगड-काट्या घेणारे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज कट्टर राजकीय दुष्मनी असलेल्या राजकीय पक्षाच्या उमेदावारांना निवडून आणण्यासाठी आपल्या बाह्या सरसावून पुढे उभे ठाकल्याचे चित्र आहे.
आपापसातील मतभेद विसरून ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन करून तेथील अर्थकारणात भागीदारी मिळवण्याचीच ही धडपड असल्याचे त्यांच्या कृतीतून अधोरेखित होत आहे. त्यामुळे मतदारही संभ्रमात असला, तरी त्यांचा संभ्रम मतदानाच्या आदल्या दिवशी कसा दूर करावा, याची व्यूहरचना गेली काही वर्षे भारतीय राजकारणात रुजल्याचे सर्वांनाच माहिती आहे. मतदानापूर्वी मतदार राजाला खूश करण्यासाठी विविध प्रलोभनासाठी दाबून खर्च करायचा आणि निवडून आल्यावर तोच खर्च विकासकामांच्या नावाखाली वसूल करायचा ही लोकशाहीला घातक असलेली पद्धत सर्वच निवडणुकांमध्ये कमालीची रूढ झाल्याचे दिसून येते.

प्रचाराला जोरदार सुरुवात
च्निवडणुकीची तारीख जशी जवळ येत आहे तसा प्रचाराचा धुरळा उडत आहे. आपल्या पक्षातील अथवा आघाडी, युतीतील उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे आमदार, जिल्हा परिषद सदस्य निवडणुकीच्या रणांगणात शड्डू ठोकून उभे आहेत. उमेदवारांच्या गावबैठका, मतदार भेटी, कॉर्नर सभांवर याच नेत्यांनी भर दिला आहे. काही उमेदवारांच्या सोबत ते स्वत: हजेरी लावत आहेत. काही राजकीय नेते प्रत्यक्षात मैदानात उतरलेले नसले, तरी राजकीय रणनीती आखून ते पडद्यामागून सूत्र हलवत आहेत. त्यामुळे सर्वांचेच राजकीय डावपेच पणाला लागले आहेत.

राजकीय मंडळी सज्ज
च्अलिबाग, पेण, कर्जत, पनवेल, उरण, श्रीवर्धन, रोहे, तळा, माणगाव, मुरुड, म्हसळा, महाड या प्रमुख तालुक्यांमध्ये निवडणुका होत असल्याने आमदार, माजी आमदार, आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी कंबर कसली आहे. पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणता यावे, यासाठी जास्त वेळ मतदार संघातच घालवण्याला त्यांच्याकडून पसंती दिली जात आहे. त्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या कालावधीत मतदार संघाच्या बाहेर जाणे तूर्तास टाळल्याचे बोलले जाते.
 

Web Title: The achievement of political prestige for rural 'economics'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.