- जयंत धुळप

अलिबाग : पृथ्वीवरील सात खंडांपैकी एक आणि ९८ टक्के पृष्ठभाग बर्फाच्छादित असणा-या ‘अंटार्क्टिका’ खंडावरील ३७व्या भारतीय वैज्ञानिक मोहिमेस नुकताच प्रारंभ झाला आहे. २१ भारतीय संशोधकांचा समावेश असणा-या या मोहिमेचे उपनेते आणि अलिबाग येथील जागतिक कीर्तीच्या भूचुंबकीय वेधशाळेचे प्रमुख व भूचुंबकीय शास्त्र संशोधक बागती सुदर्शन पात्रो हे या मोहिमेत तिस-यांदा सहभागी झाले आहेत.
या मोहिमेदरम्यान बर्फाच्छादित ‘अंटार्क्टिका’ खंडावरील ‘मैत्री स्टेशन’ या भारतीय संशोधन प्रयोगशाळेचे प्रमुख म्हणून भारतीय हवामान विभागाचे संशोधक सुन्नी चूग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याच खंडावरील भारत सरकारच्या ‘भारती स्टेशन’या संशोधन केंद्राचे प्रमुख म्हणून नॅशनल सेंटर फॉर अंटार्क्टिका अ‍ॅण्ड ओशन रीसर्च संस्थेचे संशोधक डॉ. शैलेश पेडणेकर यांची तर उपप्रमुख म्हणून अलिबाग भूचुंबकीय वेधशाळेचे प्रमुख व भूचुंबकीय शास्त्र संशोधक बागती सुदर्शन पात्रो यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ३७व्या भारतीय वैज्ञानिक मोहिमेच्या सागरी जलप्रवासाचे (व्हॉयेज) प्रमुख म्हणून नॅशनल सेंटर फॉर अंटार्क्टिका अ‍ॅण्ड ओशन रीसर्च संस्थेचे डॉ. योगेश राय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ३७व्या भारतीय वैज्ञानिक मोहिमेच्या उर्वरित १७ संशोधकांच्या चमूमध्ये डॉ. नरेंद्र सिंग रावत (भाभा अ‍ॅटोमिक रीसर्च सेंटर), डॉ. सुकुमार भक्ता (बॉटेनिकल सर्व्हे आॅफ इंडिया), अमित रावुतेला (डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅप्लिकेशन लॅबोरेटर), इलेक्टॉनिक्स कॉर्पोरेशन आॅफ इंडियाचे एम. श्रीधर, अब्दुल हाय नोमान, ईश्वर राव, जी. नागाराजू, जी. लक्ष्मी नारायण रेड्डी, एस. राजू बाबू, राजेश कुमार तित्ला, सोमा राजू सोंगा, एस. सुधाकर, जिआॅलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडियाचे प्रदीप कुमार, मोहमद सादिक, दीपक युवराज गजभिये, झाहीद हाबीब आणि नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ हाय सिक्युरिटी अ‍ॅनिमल डिसिजेसचे संशोधक डॉ. अश्विन अशोक राऊत यांचा समावेश आहे.
अंटार्क्टिका खंडावरील भारतीय वैज्ञानिक मोहिमांचे आयोजन गोवास्थित नॅशनल सेंटर फॉर अंटार्क्टिक अ‍ॅण्ड ओशन रीसर्च या संस्थेच्या माध्यमातून करण्यात येते.या ३७ व्या भारतीय वैज्ञानिक मोहिमेत भूचुंबकीय शास्त्र, अणू व अणुशक्ती, वनस्पतीशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, प्राणी व प्राणिजन्य व्याधीविषयक संशोधन होणार आहे.