जयंत धुळप।
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : जिल्ह्यात एकूण ४८८ स्कूलबसेस आहेत. त्यापैकी २२३ स्कूलबसेसची शाळा सुरू होण्यापूर्वी बसमालकांनी तपासणी करून घेतली आहे. मात्र, उर्वरित २६५ स्कूलबसेसची तपासणी त्यांच्या मालकांनी करून घेतलेली नाही. या २६५ स्कूलबसमालकांना ‘आपले स्कूलबस परवाने रद्द का करण्यात येऊ नयेत’ अशा नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती पेण उपप्रादेशिक परिवहन सहायक अधिकारी राजेंद्र सरक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन जाणे व आणणे या कारणास्तव वाहतूकदारांना विद्यार्थी सुरक्षितता डोळ््यासमोर ठेवून ‘स्कूलबस’ विशेष परवाने परिवहन विभागाकडून देण्यात येतात. विद्यार्थी सुरक्षितता या स्कूलबसच्या माध्यमातून घेण्यात येते. यावर विश्वास ठेवून पालक मुलांना अशा स्कूलबसमधूनच शाळेत पाठवत असतात; परंतु प्रत्यक्षात स्कूलबसमालक बसची शाळा सुरू होण्यापूर्वी परिवहन विभागाकडून तपासणी करून घेत नसल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. तब्बल २६५ स्कूलबसची परिवहन विभागाकडून तपासणी झालेली नाही. मात्र, या २६५ बसेसमधून विद्यार्थ्यांची ने-आण मात्र सुरू असल्याचे दिसून येत आहे.
विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व स्कूलबसची तपासणी करून घेण्याच्या सूचना पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून स्कूलबसमालकांना देण्यात आल्या होत्या. शाळा सुरू होण्यापूर्वी ही तपासणी करून घेणे अनिवार्य होते. ज्या स्कूलबसमालकांनी आपल्या वाहनाची तपासणी अद्याप केलेली नाही, त्यांना त्याबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यानंतरही या वाहनमालकांनी आपल्या स्कूलबसची तपासणी करून घेतली नाही, तर त्यांच्या वाहनाचा स्कूलबस परवाना निलंबित केला जाणार आहे.

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचे अपघात घडू नये, याकरिता त्यांची योग्य ती तपासणी करण्यात यावी, या उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार गतवर्षापासून आरटीओकडून स्कूलबसची तपासणी करण्याचे आदेश दिले गेले आहेत. स्कूलबसच्या सतत होणाऱ्या अपघाताच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. शाळांकडून नेमलेल्या अथवा खासगी स्कूलबसमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची पुुरेशी काळजी घेतली जात नव्हती. चालकांच्या बेशिस्तीमुळेही अनेकदा अपघात घडत होते. अनेकदा नादुरुस्त अवस्थेतील वाहनेही शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी वापरली जात होती. यासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर गतवर्षी झालेल्या सुनावणीत स्कूलबससाठी तपासणी आवश्यक करण्यात आली होती. प्रतिवर्षी शाळा सुरू होण्यापूर्वी स्कूलबसमालकांनी आरटीओकडून ही तपासणी करून घ्यायची असल्याचे उपप्रादेशिक परिवहन सहायक अधिकारी राजेंद्र सरक यांनी स्पष्ट केले आहे.