दासबोधाचे हस्तलिखित तरुणांसाठी दिशादर्शक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 02:43 PM2018-05-22T14:43:29+5:302018-05-22T14:43:29+5:30

दासबोध ग्रंथ आपण लिहावा , अशी मनापासून इच्छा होती. नव्या पिढीसाठी हस्तलिखित दिशादर्शक ठरु शकेल, अशी आशा मोहन फडणीस यांनी व्यक्त केली.  

youth Directions by Dassbodh's handwritten | दासबोधाचे हस्तलिखित तरुणांसाठी दिशादर्शक 

दासबोधाचे हस्तलिखित तरुणांसाठी दिशादर्शक 

googlenewsNext
ठळक मुद्देहस्तलिखितासाठी एकूण ७३ दिवसांचा कालावधी दासबोध, ज्ञानेश्वरीसह १० धार्मिक ग्रंथ लिहिण्याचे स्वप्ने

पुणे : ‘भक्तांचेनि साभिमाने। कृपा केली दाशरथीनें। समर्थकृपेचीं वचनें। तो हा दासबोध।’असे समर्थ रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथाचे वर्णन केले आहे. दासबोधातील दशके आणि समासांमधून प्रेरणा घेऊन ६५ वर्षीय मोहन फडणीस यांनी हस्तलिखित लिहिले आहे. वाचनाची आवड, आध्यात्मिक बैैठक, शिवथरघळ याठिकाणावरील श्रध्दा यातून हस्तलिखितांची प्रेरणा त्यांना मिळाली. नव्या पिढीसाठी हस्तलिखित दिशादर्शक ठरु शकेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. 
याबाबत ‘लोकमत’शी बोलताना मोहन फडणीस म्हणाले, ‘दासबोध ग्रंथ आपण लिहावा , अशी मनापासून इच्छा होती. १८ जानेवारी रोजी हस्तलिखित लिहिण्यास सुरुवात केली. ३१ मार्च २०१८ रोजी दासबोध लिहून पूर्ण झाले. हस्तलिखितासाठी एकूण ७३ दिवसांचा कालावधी लागला. यामध्ये ७७५१ ओव्या असून, ११६४ लिखित पाने असून, ९१० पानांवर भावार्थ लिहिण्यात आला आहे.’
दासबोधाबरोबरच ग्रंथात असलेली स्वामी समर्थ रामदासांची करुणाष्टके, मनाचे श्लोक, आरत्या या सर्वांचा समावेश करण्यात आला आहे. हस्तलिखितामध्ये जेथे जागा शिल्लक असेल तेथे समर्थांची चित्रे, श्रीराम जय राम जय जय राम असा जपही लिहिण्यात आला आहे. त्यामुळे हस्तलिखित दर्शनीय आणि वाचनीय बनले आहे. योग्य वेळी हा ग्रंथ शिवथरघळ येथे घळीत घेऊन जाण्याचा त्यांचा मानस आहे. 
फडणीस म्हणाले, ‘हस्तलिखित लिहिताना मानसिक समाधान मिळाले. मी नेहमी शिवथरघळला जातो. तेथूनच हस्तलिखितांची प्रेरणा मिळाली. एकाने इंग्रजी भाषेमध्ये हस्तलिखित लिहिल्याचे समजले. तेव्हापासून मराठी हस्तलिखित लिहिण्याची इच्छा आणखी प्रबळ झाली.’ 
फडणीस यांचा पूर्वी ट्रॅव्हल्सचा व्यवसाय होता. लहानपणापासून आईला वाचनाची सवय असल्याने फडणीस यांच्यावरही ते संस्कार झाले. अजूनही त्यांच्या घरी दासबोधाची प्रवचने होतात. त्यातून कमालीचे आत्मिक समाधान आणि शांती मिळते. आध्यात्मिक लिखाण करण्यावर त्यांचा भर आहे. शिवथरघळ येथे जाऊन किमान एक समास लिहिण्याची इच्छा आहे. दासबोधानंतर आता ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात करण्याचा मानसही फडणीस यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. दासबोध, ज्ञानेश्वरीसह १० धार्मिक ग्रंथ लिहिण्याचे त्यांनी ठरवले आहे. 

Web Title: youth Directions by Dassbodh's handwritten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे