आमदारकीसाठी महिलांकडूनही मोर्चेबांधणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 01:46 AM2019-01-23T01:46:07+5:302019-01-23T01:46:13+5:30

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

For Women | आमदारकीसाठी महिलांकडूनही मोर्चेबांधणी

आमदारकीसाठी महिलांकडूनही मोर्चेबांधणी

Next

- सुषमा नेहरकर-शिंदे 

पुणे : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यामध्ये महिलादेखील आघाडीवर असून, शहरातील अनेक मतदारसंघांत महापालिकेतील आजी-माजी पदाधिकारी, नगरसेविकांनी आमदारकीसाठी तयारी सुरू केली आहे.
लोकसभेनंतर राज्यात २०१९ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आताच सुरू झाली आहे. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिल्याने राजकारणातील महिलांचा राजकारणात वावर चांगला वाढला आहे. आरक्षणामुळे अनेक महत्त्वाच्या पदांवर महिलांना संधी मिळू लागली आहे. यामुळे प्रथमच आमदारकीसाठी महिला इच्छुक उमेदवारांची संख्या देखील वाढली आहे.
पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार निवडून आले आहेत. यामध्ये कसबा मतदारसंघातील आमदार व पालकमंत्री गिरीश बापट यांचे नाव सध्या खासदारकीसाठी चर्चेत आहे. बापट यांना खासदारकीची उमेदवारी मिळाल्यास कसबा मतदारसंघातून उमेदवारीसाठी टिळक प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत.
सध्या कसबा मतदारसंघ अन्य सर्व मतदारसंघापेक्षा भाजपाला अत्यंत सोपा असल्याची चर्चा आहे. यामुळे भाजपामधून येथे इच्छुकांची संख्यादेखील मोठी आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत टिळक शहरामध्ये सर्वाधिक मतांनी निवडूून आल्या आहेत. त्यामुळे बापटांनंतर कसब्यात मुक्ता टिळकांचे नाव आघाडीवर आहे. तसेच याच मतदारसंघातून काँगे्रसच्या वतीने माजी महापौर कमल व्यवहारे यांनीदेखील जोरदार तयारी सुरु केली आहे. मनसेकडून माजी नगरसेवक रूपाली पाटील रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केली आहे.
>अनेकांनी केली जय्यत तयारी
पर्वती मतदारसंघात सध्या भाजपाच्या माधुरी मिसाळ आमदार असून, येथेदेखील इच्छुकांची संख्या वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी कदम यांनी गेल्या काही महिन्यांपासूनच पर्वतीवर लक्ष केंद्रित केले आहे. कदम सलग तीन वेळा महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. स्थायी समितीसारख्या महत्त्वाच्या समितीचे पद त्यांनी भूषविले आहे. भाजपाने या मतदारसंघात पुन्हा महिला उमेदवार दिल्यास कदम राष्ट्रवादी काँगे्रसकडून पर्वतीसाठी हक्क सांगू शकतात. दरम्यान, येथे भाजपाच्या मंजूषा नागपुरे यादेखील इच्छुक असल्याची चर्चा आहे. खडकवासला मतदार संघात राष्ट्रवादी काँगे्रसकडून पक्षाच्या महिला शहर अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात विविध कार्यक्रम, आंदोलने त्यांनी केली आहेत. भाजपाच्या मंजूषा नागपुरे खडकवासला मतदारसंघात देखील दावा सांगू शकतात. हडपसर मतदारसंघात देखील महिलांकडून मोर्चेबांधणी सुरू असून, येथे राष्ट्रवादीच्या माजी महापौर वैशाली बनकर आणि नगरसेवक नंदा लोणकर यांनीदेखील पक्षाच्या अन्य इच्छुकांमध्ये आपली छाप उमटवली आहे. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका सुजाता शेट्टी व शिवसेनेच्या पल्लवी जावळे यादेखील इच्छुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Web Title: For Women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.