भाजपाच्या यशाचे ओझे पेलणार कोण; काँग्रेस कशी मारेल मुसंडी?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 12:58 AM2019-03-23T00:58:39+5:302019-03-23T00:58:54+5:30

सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतल्या मतदानावर मोदी लाटेचा प्रचंड प्रभाव असल्याचे निकालानंतरच स्पष्ट झाले होते. त्यामुळेच पुण्याच्या इतिहासात यापूर्वी कधी नव्हे इतक्या मताधिक्याने भाजपाचा विजय झाला.

Who will bear the burden of BJP's success? How can Congress win? | भाजपाच्या यशाचे ओझे पेलणार कोण; काँग्रेस कशी मारेल मुसंडी?

भाजपाच्या यशाचे ओझे पेलणार कोण; काँग्रेस कशी मारेल मुसंडी?

Next

- सुकृत करंदीकर

पुणे - सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतल्या मतदानावर मोदी लाटेचा प्रचंड प्रभाव असल्याचे निकालानंतरच स्पष्ट झाले होते. त्यामुळेच पुण्याच्या इतिहासात यापूर्वी कधी नव्हे इतक्या मताधिक्याने भाजपाचा विजय झाला. शहरातल्या सहाही विधानसभा मतदारसंघात भाजपाने निर्णायक मतदान मिळवले होते. मात्र, गेल्या पाच वर्षांत मुठेवरल्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. गेल्या पाच वर्षांत पुण्यात मिळवलेल्या दैदीप्यमान यशाची पुनरावृत्ती करण्याचे ओझे भाजपापुढे असणार आहे. काँग्रेस आघाडीला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.

युती आणि आघाडीने इतर मतदारसंघांमधल्या उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात केली असली तरी या दोन्ही बाजुंना पुण्यातला उमेदवार अद्याप ठरवता आलेला नाही. ‘समोरून कोण येणार,’ याचाच अंदाज दोन्ही बाजूंनी घेतला जात असल्याचे सांगितले जात आहे. उमेदवारी शहराच्या कोणत्या भागाला द्यायची, कोणत्या समाजाला उमेदवारी द्यायचे याचाही विचार उमेदवार निश्चित करताना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश पुणे लोकसभा मतदारसंघात होतो. यातल्या सहाही मतदारसंघांमध्ये २०१४ मध्ये भाजपाने आघाडी घेतली होती. विशेष म्हणजे त्यावेळी वडगावशेरी (बापू पठारे), कॅन्टोन्मेंट (रमेश बागवे) आणि शिवाजीनगर (विनायक निम्हण) या सहापैकी तीन मतदारसंघांमध्ये काँग्रेस आघाडीचे आमदार होते. कसबा (गिरीश बापट), कोथरूड (चंद्रकांत मोकाटे) आणि पर्वती (माधुरी मिसाळ) या तीन विधानसभा मतदारसंघ भाजपा-शिवसेना युतीकडे होते. लोकसभा निवडणुकीत मात्र या सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस आघाडीची प्रचंड पिछेहाट झाली. त्यामुळेच भाजपाला पुण्यात ‘न भुतो’ असे ३ लाख १५ हजारांचे मताधिक्य मिळवता आले. गमतीचा भाग असा, की २०१४ पूर्वीच्या निवडणुकांमध्ये भाजपाच्या उमेदवाराला मिळालेली एकूण मतेदेखील एवढी नव्हती.

कोथरूड, कसबा आणि शिवाजीनगर हे पुण्यातले युतीचे पारंपरिक मतदारसंघ मानले जातात. त्यातही कोथरूडने भाजपाला सर्वाधिक म्हणजे थेट ९१ हजार ८९८ इतक्या विक्रमी मतांची आघाडी मिळवून दिली होती. कोथरूडमध्ये भाजपाला मिळालेली एकूण मते १ लाख २२ हजार ७२१ होती. काँग्रेसला ३० हजार ८२३ तर तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या मनसेला १६ हजार ३५३ मतांवर समाधान मानावे लागले होते. शिवाजीनगरमध्ये भाजपाने काँग्रेसपेक्षा ३९ हजार १३१ जास्त मते मिळवली. पर्वतीमध्येही ६९ हजार ६७८ मतांनी काँग्रेसला मागे टाकले होते. कसबा या कमी मतदारसंख्येच्या मतदारसंघातही भाजपाने काँग्रेसपेक्षा ५८ हजार ५३० मते जास्तीची मिळवली. काँग्रेस आघाडीला खरा धक्का बसला होता तो त्यांच्या दृष्टीने पारंपरिक मतदार असलेल्या वडगाव शेरी आणि पुणे कॅन्टोन्मेंट या दोन मतदारसंघांमध्ये. या दोन्ही ठिकाणी भाजपाने अनुक्रमे ४२ हजार ४०८ आणि ३ हजार ९३१ मतांनी काँग्रेसला मागे टाकले. पुण्यातल्या सहाही मतदारसंघांमधली लोकसभा निवडणुकीतली भाजपाची यशाची कमान त्या नंतरच्या विधानसभा आणि महापालिका निवडणुकीतही चढती राहिली. लोकसभेनंतर अवघ्या काही महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढली. काँग्रेस आघाडीनेही ती निवडणूक स्वतंत्रपणे लढवली. या चौरंगी लढतींमध्ये पुण्यातल्या सहाही जागा भाजपाने काबीज केल्या. दोन वर्षांपूर्वीच्या महापालिका निवडणुकीत भाजपाच्या नगरसेवकांची संख्या नव्वदच्या पुढे गेली. या यशाने पुणे लोकसभा मतदारसंघापुरती भाजपाची स्थिती ‘गल्ली ते दिल्ली फक्त भाजपा’ अशी झाली आहे. सन २०१४ पासून एका पाठोपाठ मिळवलेल्या तिहेरी यशामुळे पुण्यात भाजपाची संघटनात्मक ताकद कधी नव्हे इतकी मजबूत दिसते आहे. दुसरीकडे पुणे लोकसभा मतदारसंघातली काँग्रेस आघाडी यापूर्वी कधी नव्हे इतकी कमकुवत आहे. अर्थात हे चित्र कागदावरचे आहे. कारण, निकाल शेवटी पुणेकर घेणार आहेत; आणि क्रिकेटच्या मैदानात किंवा निवडणुकीच्या रिंगणात इतिहासाला फारशी किंमत नसते.
 

Web Title: Who will bear the burden of BJP's success? How can Congress win?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.