When we go abroad, we know the value of our men; Feelings of 'Shodh Marathi Mancha' Seminar | परदेशात गेल्यावर आपल्या माणसांची किंमत कळते; ‘शोध मराठी मनाचा’ परिसंवादात भावना

ठळक मुद्दे‘शोध मराठी मनाचा’ या १५व्या जागतिक संमेलनात ‘समुद्रापलीकडे’ परिसंवादमान्यवरांनी परदेशातील स्थानिक भाषा आत्मसात करण्यावर दिला भर

पुणे : कोणत्याही प्रसंगात आपल्या हाकेवर धावून येणारे नातलग-मित्रमंडळी आपल्या आजूबाजूला असतात. पण परदेशात गेल्यावर आपल्या माणसांची किंमत अधिक कळते. परदेशात सुरुवातीच्या काळात आपल्या लोकांची उणीव खूप भासते. त्यामुळे आपले विचार, आपली आवड, आपले छंद याच्याशी मिळते जुळते असणाऱ्या लोकांबरोबर आपण मैत्री करून  निश्चितपणे ही उणीव भरून काढू शकतो. एकदा चांगल्या प्रकारे मैत्री झाली, की भाषा, धर्म, व्यवसाय,लिंग यापैकी कोणताच अडसर राहत नाही आणि आपणही मग त्यांच्यातलेच होऊन जातो, अशा शब्दांत परदेशात स्थिरावलेल्या मराठी बांधवांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.
निमित्त होते, जागतिक मराठी अकादमीतर्फे बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ या १५व्या जागतिक संमेलनात आयोजित ‘समुद्रापलीकडे’या परिसंवादाचे. अमित केवल (फ्रान्स), बॉबी जाधव (अमेरिका), मंदार जोगळेकर (अमेरिका), योगेश दशरथ (नेदरलँड), सिद्धार्थ मुकणे (लंडन), आर्या तावरे (लंडन), डॉ. मकरंद जावडेकर (अमेरिका), डॉ. महेश लच्चनकर (अमेरिका), बाळ महाले (अमेरिका), पुष्कर मोरे (फ्रान्स), शरद मराठे, एलिझाबेथ डेव्हिड (इस्त्राईल), अविवा मिलर (इस्त्राईल) हे मान्यवर सहभागी झाले होते.केतन गाडगीळ आणि स्नेहल दामले यांनी त्यांच्याशी संवाद साधला. 
उद्योग-व्यवसायाची आपली म्हणून काही तत्वे असतात आणि या तत्वांना मुरड घालून काम करणे म्हणजे आपल्या उद्योग-व्यवसायाशी आणि पयार्याने स्वत: शी प्रतारणा करण्यासारखे आहे, असे परदेशी लोक मानतात. आपल्याकडे काही प्रमाणात पळवाटा शोधण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, आपल्या उद्योग-व्यवसायाच्या तत्वांबद्दल आपण आग्रही राहिलो, तर परदेशी लोक त्याला निश्चितच दाद देतात,जागतिक व्यासपीठावर काम करणे हा आपल्यासाठी देखील संपन्न करणारा अनुभव असतो, याकडेही मान्यवरांनी लक्ष वेधले. 
परदेशातील काही गमती जमती सांगताना मान्यवरांनी परदेशातील स्थानिक भाषा आत्मसात करण्यावर भर दिला. इंग्रजीबरोबरच त्या ठिकाणची स्थानिक भाषा आपल्याला अवगत असेल, तर आपले काम अधिक सोपे होते. त्यासाठी सुरुवातीच्या काळात निदान रोजच्या व्यवहारातील शब्द माहिती करुन घेणे, त्यांचे उच्चार-अर्थ याविषयी जागरुकता बाळगणे आवश्यक असते. इंग्रजी ही जगाची भाषा असली तरी त्या ठिकाणची स्थानिक भाषा आपल्याला थोडी  येत असली तरी स्थानिक लोकांशी आपण पटकन जोडले जातो. अन्यथा खाणाखुणा करून बोलताना आपली चांगलीच तारांबळ उडते अशी काहीशी मिश्किल टिपण्णीही करण्यात आली. 


Web Title: When we go abroad, we know the value of our men; Feelings of 'Shodh Marathi Mancha' Seminar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.