राजकीय नेत्यांची जीभ घसरते तेव्हा...!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 03:57 PM2019-03-26T15:57:42+5:302019-03-26T15:58:53+5:30

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राजकीय पक्षांचा प्रचाराचा झपाटाही सुरु झाला आहे. प्रचारसभांतून एकमेकांवर टीकास्त्र सोडताना नेतेमंडळी बेभान होत असतात. आपण काही तरी भलतेच बोलून जातोय का याचे भानही त्यांना राहत नाही.

When political leaders slip of tongue ...! | राजकीय नेत्यांची जीभ घसरते तेव्हा...!

राजकीय नेत्यांची जीभ घसरते तेव्हा...!

googlenewsNext

विकास चाटी  
पुणे : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राजकीय पक्षांचा प्रचाराचा झपाटाही सुरु झाला आहे. प्रचारसभांतून एकमेकांवर टीकास्त्र सोडताना नेतेमंडळी बेभान होत असतात. आपण काही तरी भलतेच बोलून जातोय का याचे भानही त्यांना राहत नाही. परिणामी ते जनतेमध्ये व विरोधकांकडून चांगलेच ट्रोल होतात. आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे मराठवाड्यातील एका प्रचारसभेत बोलले की, ‘ पाकिस्तानने भारताचे ४० अतिरेकी मारले’ वास्तविकत: त्यांना जवान म्हणायचे होते पण बेभानपणे ते अतिरेकी म्हणून गेले ; आणि पुन्हा एकदा या विषयाला उजाळा मिळाला.
 
चुकून भलतेच बोलून गेले की त्याला पॉलिटिकल स्लिप ऑफ टंग असे म्हणून सारवासारव केली जाते. मात्र त्यातून जनतेची चांगलीच करमणुक होत असते. सर्वच पक्षांच्या मोठमोठ्या नेत्यांकडून अशा ‘पॉलिटिकल स्लिप ऑफ टंग ’ घडल्या आहेत. राजकारणात काम करणाऱ्या प्रत्येकाची काहीना काही महत्वाकांक्षा असते. कोणाला आमदार, खासदार तर कोणाला मुख्यमंत्री, पंतप्रधान व्हावे असे वाटत असते. अशा महत्त्त्वाकांक्षी नेत्यांची  प्रचंड मेहनत करायचीही तयारी असते. ध्येयाच्या आड येणाऱ्या स्पर्धक नेत्यावर टीका करुन त्याचे काम कसे वाईट व आपण कसे सक्षम हे सांगण्याची अहमहमिका सुरु होते. त्यामध्ये भान सुटून असे पॉलिटिकल स्लिप ऑफ टंगचे अपघात होतात. पॉलिटिकल स्लिप ऑफ टंगच्या रावसाहेब दानवे, कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळ आदी नेते अग्रेसर आहेत. 

काही गाजलेल्या पॉलिटिकल स्लिप ऑफ टंग 
- नुकतेच दिल्लीतील पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष  राहुल गांधी यांच्याकडून दहशतवादी मौलाना मसूद अझर याचा उल्लेख ‘मसुदजी ’ असा झाला. वास्तविकत: त्यांना तसे म्हणायचे नव्हते पण गडबडीत तसा उल्लेख झाला. मात्र त्यामुळे चांगलेच ट्रोल व्हावे लागले.  
- गुजरातच्या निवडणुकीत भाषण करताना राहुल गांधी यांनी ‘ इस सवाल का जवाब हमे धुंडना होगा’ असे म्हणण्याऐवजी ‘इस जवाब का सवाल हमे धुंडना पडेगा’ असे म्हणून हसे करुन घेतले होते. 
-  एका ठिकाणी बोलताना महात्मा गांधी यांच्याबद्दल गौरवोद्गार काढताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडूनही पॉलिटिकल स्लिप ऑफ टंग झाली होती. चलेजाव आंदोलनात महात्मा गांधी यांनी जनतेला प्रेरित करुन मोठी लोकचळवळ उभी केली असे म्हणण्याऐवजी महात्त्मा फुले यांनी लोकचळवळ उभी केली असा उल्लेख करुन हसे करुन घेतले.  
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील मेडिसन स्क्वेअर गार्डन येथे अनिवासी भारतीयांना संबोधित करताना महात्मा गांधी यांचे पुर्ण नाव घेताना मोहनदास करमचंद गांधी याऐवजी मोहनलाल करमचंद गांधी असा उल्लेख केला होता. पुढील वर्षी राजस्थानमधील एका कार्यक्रमातही त्यांच्याकडून असाच उल्लेख झाला होता. 
- संसदेत मनरेगाच्या यश-अपयशाबद्दल केंद्रसरकारवर टीका करताना राहुल गांधी यांनी योजनेचा उल्लेख ‘नरेगा ’ असा करुन त्यातील म हा शब्द गाळून टाकला. त्यामुळे सत्ताधारी पक्षाकडून काँग्रेसला महात्त्मा गांधींचा उल्लेखही आता करावासा वाटत नाही असा टोला हाणण्यात आला. त्यावेळी लगेच ‘ भुल गया भुल गया ’ असे म्हणत राहुल गांधी यांना सावरासावर करावी लागली होती.

 -  तामिळनाडूत माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी सुरु केलेल्या अम्मा कॅन्टीन उपक्रमाला जनतेला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर तत्कालिन कर्नाटक कॉंग्रेस सरकारने त्याचे अनुकरण करीत ‘इन्दिरा कॅन्टीन’ सुरु करण्याची घोषणा केली. त्याचे उद्घाटन करताना राहुल गांधी यांनी कॅन्टीनचा उल्लेख ‘इन्दिरा कॅन्टीन’ असा करण्याऐवजी ‘अम्मा कॅन्टीन’ असा केला होता.
-  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना तत्कालिन काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर आतापर्यंतचे सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री असल्याचा आरोप करायचा होता ; मात्र त्यांनी सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री यदियुराप्पा असे म्हणून स्वत:चे हसे करुन घेतले. शेजारी बसलेले यदियुराप्पा रागाने चांगलेच लालबुंद झाले होते. स्वपक्षाचेच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार यदियुराप्पा यांची फजिती झाल्याने शाह चांगलेच ट्रोल झाले होते. 
- त्यानंतर एका सभेत अमित शाह यांच्या भाषणाचे कन्नडमध्ये भाषांतर करणाऱ्या प्रल्हाद जोशी यांनी गडबडीत भाषांतर करताना सिद्धरामय्या गरीबांसाठी काहीच काम करीत नसल्याचे म्हणण्याऐवजी नरेंद्र मोदी गरीबांसाठी काहीच काम करीत नसल्याचे म्हणून पक्षाचे हसे करुन घेतले होते. 

Web Title: When political leaders slip of tongue ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.