आम्ही प्रेम केलं... तुमचं काय गेलं! : दिशा शेख; राईट टू लव्ह ग्रुपचा पुण्यात वर्धापनदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:40 AM2018-02-13T11:40:44+5:302018-02-13T11:46:24+5:30

व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने राईट टू लव्ह ग्रुपच्या वतीने आयोजित तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात तरुण-तरुणींनी प्रेमाचा जागर केला.

We loved... What happened to you! : Disha Shaikh; Anniversary of Right to Love Group in Pune | आम्ही प्रेम केलं... तुमचं काय गेलं! : दिशा शेख; राईट टू लव्ह ग्रुपचा पुण्यात वर्धापनदिन

आम्ही प्रेम केलं... तुमचं काय गेलं! : दिशा शेख; राईट टू लव्ह ग्रुपचा पुण्यात वर्धापनदिन

ठळक मुद्देपुण्यासह राज्याच्या विविध भागांतून प्रतिनिधीस्वरूपात तरुण-तरुणी उपस्थितराईट टू लव्ह ही समाजात परिवर्तन घडवणारी चळवळ : निखिल वागळे

पुणे : ‘‘लग्न म्हणजे प्रेमाचा शेवट नाही. ते वरचे आकाश आहे...तरीही लग्न या मध्यावर येऊन आपण थांबलो आहोत... एकीकडे बहुसंख्यांक लैंगिकतेला लग्नासाठी अडचणींचा सामना करावा  लागत असताना मग आम्ही अल्पसंख्यांकांनी  लैंगिकतेच्या सहजीवनाची स्वप्ने कधी पाहायची?’’ हे प्रसिद्ध कवयित्री दिशा शेख यांचे अस्वस्थ करणारे बोल प्रत्येकालाच अंतर्मुख करून गेले. माझ्या ब्रेकअप्सचे खापर मी समाजावर फोडले... आम्ही प्रेम केलं... त्यात समाजाच काय गेलं! प्रेमात मी आणि तो पडलो. पण नकळतपणे समाजही त्यात सहभागी होता... त्यामुळेही तोही तितकाच दोषी होता, असे सांगून तिने समाजव्यवस्थेलाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. 
प्रेम कर भिल्लासारखं... बाणावरती खोचलेलं... मातीमध्ये उगवूनसुद्धा मेघापर्यंत पोचलेलंं... असं म्हणत व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने राईट टू लव्ह ग्रुपच्या वतीने आयोजित तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात तरुण-तरुणींनी प्रेमाचा जागर केला. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार आणि प्रेमाची अभिव्यक्ती असा जड वाटणारा व्याख्यानाचा विषय. तरीही वक्त्यांनी दोन्ही बाजूंनी संवाद साधत सभागृहातील प्रत्येकाला सहभागी करून घेतलं. टाळ्या अन् शिट्यांनी सभागृहालाही गुलाबी रंग आला होता. प्रेम हा माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. मात्र, प्रेम करताना जबाबदारीचेही भान ठेवा, जातीधर्माच्या पल्याडचं प्रेम करा असा संदेश या स्नेहमेळाव्याने दिला. गाणी, गप्पा, कविता आणि प्रबोधन व्याख्यानाने रंगत आली. या स्नेहमेळाव्यात पुण्यासह राज्याच्या विविध भागांतून प्रतिनिधीस्वरूपात तरुण-तरुणी उपस्थित होते. आम्ही प्रेम केलं, तर तुमचं काय गेलं...असे फलक लक्ष वेधून घेत होते.  कुटुंबांचा विरोध पत्करून प्रेमालाच आयुष्यात सर्वोच्च स्थान देत जोडीदाराबरोबर पळून जाऊन लग्नाची गाठ बांधणाऱ्या जोडप्यांच्या प्रेमकथाही अनेकांना हुरूप देऊन गेल्या... पण यामध्ये दिशा शेख यांच्या अनुभवसंपन्न अशा बोलातून उपस्थितांना वास्तवाचेही भान दिले. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, प्रियांका भाट, राईट टू लव्हचे अभिजित कांबळे आणि सारंग आशा उपस्थित होते. 
प्रियकरांची डोकी फोडून व्हँलेटाईन साजरे करणारे मोठे असतात अशी उपरोधिक टिप्पणी दिशा शेख यांनी संस्कृतिरक्षकांना उद्देशून केली. प्रत्येक प्रेमाला एक राजकीय रंग असतो. विशिष्ट वर्गावर नियंत्रण ठेवून सामाजिक, आर्थिक हेतू साध्य करणे हेच विरोधाचे कारण असते. या परिस्थितीत आंतरजातीय विवाह करणे हे मुलापेक्षा मुलींसाठी खूप मोठे आव्हान असते. त्या विवाहाचे श्रेय खरेतर मुलींनाच मिळायला हवे. माणसाच्या जीवनात प्रेमाची साखळी जपली तर नातं पूर्ण होतं. पण ती नाती जपण्यामागे एक स्वार्थ दडलेला असतो. आम्हाला समाजात ना किंमत ना आमच्याकडून कोणता राजकीय फायदा, हा स्वार्थ न जपता जो जगतो तो आमचा समाज आहे. आम्हाला फक्त प्रेमाचं हस्तांतरण करायचं आहे... अशा शब्दातं त्यांनी तृतीयपंथीयांचे भावविश्व मांडले. 
निखिल वागळे म्हणाले, राईट टू लव्ह ही समाजात परिवर्तन घडवणारी चळवळ आहे. या चळवळीच्या पाठीमागे खांद्याला खांदा लावून उभे राहणार आहे. कोणतेही प्रेम कायद्याच्या दडपणाखाली किंवा पोलिसांच्या दंडुक्यांनी दडपू नये. 
कार्यक्रमाचा समारोप वयाने ज्येष्ठ असलेल्या पण मनाने तरुण असलेल्या आजोबांनी सादर केलेल्या ‘आ चल के तुझे, मै ले के चलू...एक ऐसे गगन के तले...जहाँ गम भी ना हो...आँसू भी ना हो...बस प्यार ही प्यार पले... या गीताने झाला.

नववधूला ‘माल’ समजले जाते...
एकविसाव्या शतकाकडे वाटचाल सुरू असतानाही अजूनदेखील समाजातून  क्रूर प्रथा हद्दपार झालेल्या नाहीत. राजस्थानमधल्या कंजार भाट समाजातल्या मुलींना विवाहाच्या वेळी अजूनही  ‘कौमार्य चाचणी’ला सामोरे जावे लागते. 
लग्न झाल्यानंतर नवरा-बायकोला एका रूममध्ये पाठविले जाते. मुलीसाठी  ‘माल’ हा शब्द वापरला जातो. दिलेला माल खरा की खोटा आहे? घोणी दिलेली फाटलेली आहे की तू फाडलीस असे बाहेरून मुलाला विचारले जाते... या समाजाची प्रियांका भाट हे सांगत होती तेव्हा सर्वजण सुन्न झाले. 
या क्रूर प्रथेविरोधात आवाज उठविण्याचे धाडस मी केले आहे. ही प्रथा बंदच झाली पाहिजे असे ती म्हणाली. 
प्रत्येकाला प्रेमाचा अधिकार आहे, पण तो घेताना नकारही पचवता आला पाहिजे. कुणी कुणावर प्रेम करावे याचे प्रत्येकाला वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. पण जातपंचायती प्रेमाच्या मुळावरच उठल्या आहेत, असे सांगून विकास शिंदे म्हणाले, प्रेमीयुगलांसाठी उद्यान असले पाहिजे अशी आमची मागणी आहे. ते झाले नाहीतर १0 हजार सह्यांची आम्ही राबविणार आहोत. तसेच ज्या व्यक्तीवर एकतर्फी प्रेमातून लैंगिक अत्याचार झाले आहेत त्यांना मोफत कायदेशीर मदत दिली जाणार आहे. 

Web Title: We loved... What happened to you! : Disha Shaikh; Anniversary of Right to Love Group in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.