Vijayadhambas salute millions, Vijayadin peacefully in peace; Samta Sainik Dal's Disciplined Practice | विजयस्तंभास लाखोंची मानवंदना, चोख बंदोबस्तात शांततेत विजयदिन; समता सैनिक दलाची शिस्तबद्ध कवायत

लोणीकंद - पुणे-नगर रस्त्यावरील पेरणे फाटा येथील कोरेगाव भीमा ऐतिहासिक विजयस्तंभास सोमवारी विविध पक्ष, संघटनांचे नेते व लाखो बांधवांनी मानवंदना दिली.
१ जानेवारी १८१८ रोजी पेशवे व ब्रिटिश यांच्यामध्ये घनघोर युद्ध झाले. यात ब्रिटिश विजयी झाले. या प्रीत्यर्थ ब्रिटिशांनी विजयस्तंभ उभारला. १ जानेवारी १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयस्तंभास भेट दिली. तेव्हापासून १ जानेवारी रोजी राज्यातील दलित बांधव या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येत असतात.
या निमित्त विजयस्तंभ व परिसराला फुलांची सजावट केली आहे. प्रवेशद्वार जाण्या-येण्याचे रस्ते व विजयस्तंभ संपूर्ण फुलांनी सजवून आकर्र्षित केला होता. भारतीय बौद्ध महासंघाच्या अध्यक्ष मीराताई आंबेडकर, कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, समाज कल्याणमंत्री दिलीप कांबळे, रिपब्लिकन सेना आनंदराव आंबेडकर, पीपल्स रिपब्लिकन पार्र्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, भारतीय दलित कोब्राचे अध्यक्ष विवेक चव्हाण, आमदार जयदेव गायकवाड, भीमशक्ती युवा सेना अध्यक्ष विलास इंगळे, बहुजन समाज पार्र्टीचे अध्यक्ष विलास गरुड, जिल्हा अध्यक्ष बाळासाो. आवारे आदींनी समर्थकांसह मानवंदना देऊन स्वतंत्र अभिवादन सभा घेतल्या.
भारतीय बौद्ध महासंघ प्रणीत समता सैनिक दलाने शिस्तबद्ध कवायत करुन सलामी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज व भारतीय बौद्ध महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मीराताई आंबेडकर यांनी सलामी स्व्ीाकारून मानवंदना देऊन पुष्पचक्र वाहिले. या वेळी मनीषा आंबेडकर, पुणे जिल्हा अध्यक्ष विजयराव गायकवाड, उत्तम मगरे, अशोक कदम, दादासाहेब भोसले आदींसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमासाठी ४०० पोलीस, १०० होमगार्ड, राज्य राखीव दलाच्या दोन कंपन्या, दंगल नियंत्रक पथक असा बंदोबस्त तैनात होता.

प्रचंड गर्दी : जत्रेचे स्वरूप

प्रारंभी विजय रणस्तंभ सेवा संघ यांच्या वतीने रात्री १२ वाजता विजयोत्सव साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे व त्यांचे सर्व सहकाºयांनी परिश्रम घेतले.
पुणे-नगर रस्ता गर्दीने भरून गेला होता. जड वाहनांना बंदी केली होती. पुण्याकडे जाणारी वाहने शिक्रापूर येथून तर पुण्याहून नगरकडे जाणारी वाहने वाघोली येथून अन्यत्र वळवली होती. तुळापूर फाटा ते कोरेगाव भीमापर्यंतचा रस्ता वाहनमुक्त होता. तरीही रस्त्यावर नागरिकांची प्रचंड गर्दी केली होती.
विजयस्तंभाच्या पाठीमागे विविध पुस्तकांचे स्टॉल व खाद्यपदार्थांचे स्टॉल लागले होते. तसेच पाळणे, खेळणी यामुळे जत्रेचे स्वरूप आले होते.