बिबट्याने घेतला बालिकेचा बळी, दुर्देवी चिमुकली ४ महिन्यांची

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 02:27 AM2019-01-24T02:27:08+5:302019-01-24T02:27:14+5:30

येडगाव (ता. जुन्नर) येथील खानेवाडी परिसरात असलेल्या धनगराच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला करून कल्याणी सुखदेव झिटे या ४ महिन्यांच्या बालिकेला बळी घेतला.

The victim took the baby, the goddess took four months | बिबट्याने घेतला बालिकेचा बळी, दुर्देवी चिमुकली ४ महिन्यांची

बिबट्याने घेतला बालिकेचा बळी, दुर्देवी चिमुकली ४ महिन्यांची

googlenewsNext

नारायणगाव : येडगाव (ता. जुन्नर) येथील खानेवाडी परिसरात असलेल्या धनगराच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला करून कल्याणी सुखदेव झिटे या ४ महिन्यांच्या बालिकेला बळी घेतला.
वनविभाग अधिकारी, ग्रामस्थ आणि झिटे कुटुंबीयांनी केलेल्या शोधमोहिमेमध्ये ५०० मीटरवर मुलीचा मृतदेह आढळून आला, घटना आज (दि. २३) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे जुन्नर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून वनविभागाने नरभक्षक बिबट्याला त्वरित जेरबंद करावे, अशी मागणी केली आहे, दरम्यान, वनविभागाच्यावतीने झिटे कुटुंबीयांना तातडीची मदत म्हणून ३ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला असून पुढील महिन्यात १२ लाख रुपये वनविभागाच्यावतीने देण्यात येणार आहे, अशी माहिती जुन्नर विभागाचे उपवनसंरक्षक जयरामे गौडा आर व ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी बी. सी. येळे यांनी दिली.
कल्याणी सुखदेव झिटे (वय ४ महिने, रा. मूळ जांबुत बुद्रुक, ता. संगमनेर, जिल्हा अहमदनगर, सध्या रा. येडगाव, ता. जुन्नर) ही मुलगी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली आहे.
या घटनेबाबत उपवनसंरक्षक जयरामे गौडा यांनी दिलेल्या माहितीनुसार : येडगाव (खानेवाडी, ता. जुन्नर) येथे रामदास भिकाजी भोर यांच्या मोकळ््या शेतजमिनीमध्ये सुखदेव झिटे या मेंढपाळाचा मेंढ्यांचा कळप बसविलेला होता. पहाटेच्या सुमारास मेंढपाळ सुखदेव झिटे मेंढ्यांसह आपली पत्नी व दोन लहान मुलींसह उघड्यावर झोपले होते. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास बिबट्या मेंढ्यांवर हल्ला करण्याच्या उद्देशाने आला असता बिबट्याने या ठिकाणी उघड्यावर झोपलेल्या चार महिन्यांच्या बालिकेवर हल्ला करून तिला उचलून नेले. परंतु अंधारात असल्याने तिचा शोध घेता आला नाही, पहाटे ५ च्या सुमारास वनविभागाचे पथक घटनास्थळी आले, ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी बी. सी. येळे व त्यांचे कर्मचारी, झिटे, ग्रामस्थ यांनी बिबट्या ज्या दिशेला गेला त्याच्या आधारे शोध घेत असता अर्ध्या किमी अंतरावर या बालिकेचा मृतदेह सकाळी ६.१५ वाजता मिळून आला. बालिकेच्या शरीराचा काही भाग खाल्लेला दिसून आला.


>घटनास्थळी उपवनसंरक्षक जयरामे गौडा आर, सहायक उपवनसंरक्षक श्रीमंत गायकवाड, युवराम मोहिते, वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे, बिबट निवारण केंद्राचे डॉ. अजित देशमुख, ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी बी. सी. येळे, नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे-पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी करून झिटे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी आमदार शरद सोनवणे, राष्ट्रवादीचे युवानेते अमित बेनके यांनी भेट दिली. येडगावचे सरपंच गणेश गावडे, देविदास भोर, पोलीसपाटील गणेश बांगर, सुखदेव नेहरकर, दीपक भिसे, समीर गावडे आदी स्थानिक ग्रामस्थ यांच्याशी उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली. येडगाव व परिसर हा बिबट वावर असलेले क्षेत्र आहे. या परिसरात ऊस, चिकू, मका, गहू अशी बागायती व दीर्घकालीन पिके घेतली जातात. यामुळे या परिसरात बिबट्यांच्या अधिवासास अनुकूल वातावरण निर्माण झालेले आहे. यामुळे बिबट या ठिकाणी स्थिरावलेले आहेत. या परिसरात पिंजरे लावण्याचे आश्वासन ग्रामस्थांना वनविभागाने दिले. बिबटप्रवण क्षेत्रात रात्रीच्या वेळी गस्त चालू ठेवण्याचे निर्देश दिले व लावलेल्या
पिंजऱ्याच्या ठिकाणी वनमजूर व वनरक्षक
यांना रात्रीच्या वेळी थांबण्याबाबत
वनपरिक्षेत्र अधिकारी यांना सूचना दिल्या. बालिकेच्या मृत शरीराचा सापडलेला भाग शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, जुन्नर येथे पाठवून तेथे विच्छेदन करून मृतदेह झिटे कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला.

Web Title: The victim took the baby, the goddess took four months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.