एफटीआयआयच्या उपाध्यक्षांनाच अध्यक्षपदी बढती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 09:42 PM2018-12-13T21:42:59+5:302018-12-13T21:43:25+5:30

अडीच महिन्यांपूर्वी अनुपम खेर यांनी आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्याचे कारण पुढे करीत राजीनामा दिला होता.

Vice President of FTII will be elevated as President | एफटीआयआयच्या उपाध्यक्षांनाच अध्यक्षपदी बढती

एफटीआयआयच्या उपाध्यक्षांनाच अध्यक्षपदी बढती

पुणे : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ( एफटीआयआय) च्या अध्यक्षपदाचा अनुपम खेर यांनी राजीनामा दिल्यानंतर या रिक्त पदावर बी. पी. सिंग यांची वर्णी लागली आहे.  सिंग हे एफटीआयआयच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने सिंग यांनाच बढती दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अडीच महिन्यांपूर्वी अनुपम खेर यांनी आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्याचे कारण पुढे करीत ट्विटरवरून एफटीआयआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले होते. त्यापासून या पदावर नसरूद्दीन शाह, गुलशन ग्रोव्हर यांच्या नावाची चर्चा सुरू होती. पण केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने बी.पी सिंग यांनाच अध्यक्षपदी विराजमान करून निष्फळ चर्चाना एकप्रकारे पूर्णविराम दिला आहे. 

 बी.पी सिंग हे एफटीआयआयचे 1970 च्या बॅचमधील सिनेमॅटोग्राफी अभ्यासक्रमाचे माजी विद्यार्थी आहेत. दूरचित्रवाहिनीवर गाजलेल्या ' सीआयडी' या मालिकेचे ते निर्माता-दिग्दर्शक आहेत. अखंडितपणे 21 वर्ष चालण्याचा मान या मालिकेने पटकावला आहे. मालिकेला 2004 मध्ये सहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने सलग 111 मिनिटांचे सलग चित्रीकरण त्यांनी केले होते ज्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. बी. पी. सिंग यांनी  एफटीआयआयच्या विद्या परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा 2014 ते 2017 या काळात सांभाळली आहे. 

  स्कीलिंग इंडिया इन फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ( स्कीफ्ट) अंतर्गत देशभरात चित्रपट संस्कृती रुजविण्याकरिता 24 शहरांमध्ये 120 लघू अभ्यासक्रम चालविले या उपक्रमात त्यांचा मोलाचा सहभाग आहे. यापुढेही त्यांच्या मार्गदर्शनाखाली एफटीआयआय पुढील वाटचाल करेल, असे एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कॅथोला यांनी सांगितले.

Web Title: Vice President of FTII will be elevated as President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.