वरवरा राव भूमिगत नक्षलवादी गणपतीशी संपर्कात ; २६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 09:33 PM2018-11-18T21:33:56+5:302018-11-18T21:36:15+5:30

ज्येष्ठ विद्रोही कवी वरवरा राव यांना विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांनी २६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

varvara rao is in contact with nexalite ganpati ; police custody till 26 nov | वरवरा राव भूमिगत नक्षलवादी गणपतीशी संपर्कात ; २६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

वरवरा राव भूमिगत नक्षलवादी गणपतीशी संपर्कात ; २६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

googlenewsNext

पुणे : बंदी असलेल्या सी़ पी़ आय माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन अटक करण्यात आलेले ज्येष्ठ विद्रोही कवी वरवरा राव यांचा गेली अनेक वर्षे भूमिगत असलेला नक्षलवादी गणपती याच्याशी संपर्कात असल्याचे पुरावे मिळाले असून मणिपूर, नेपाळ येथून हत्यारे आणण्याचा कट रचण्यात त्यांचा महत्वाचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले असल्याचे जिल्हा सरकारी वकिलांनी रविवारी न्यायालयात सांगितले. विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांनी वरवरा राव यांना २६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
 
    पुणेपोलिसांनी अटक केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने वरवरा राव हे राहत्या घरी नजरकैदेत होते. नजरकैदेची मुदत वाढवून देण्याबाबतचे त्यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर पुणे पोलिसांनी शनिवारी रात्री राव यांना पुन्हा अटक केली. हैदराबाद येथून त्यांना रविवारी सकाळी पुण्यात आणून न्यायालयासमोर हजर केले. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी काम पाहिले. राव यांच्या कडून जप्त करण्यात आलेल्या ई मेलमध्ये त्यांनी गणपती या व्यक्तीला ईमेल पाठविले आहेत. हा गणपती कोण आहे?, याचा शोध घ्यायचा आहे़  कटाचा भाग म्हणून एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. अशा प्रकारे भारतात कोणत्या कारवाया सुरू आहेत याचा तपास करायचा आहे. अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे डिसेंबर महिन्यात गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथे हल्ला झाला होता. त्याला देशभर प्रसिध्दी मिळाली होती. अशा प्रकारच्या घटना घडविण्याकरीता वरावर राव यांनी निधी उपलब्ध करून दिला. उसुर, पामेद आणि भेजी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दहशतवादी कृत्यामध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग स्पष्ट झाला आहे. राव यांच्याकडून जप्त करण्यात आलेले ईमेल संदेशांचा तपास करणे, त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या काही कागदपत्रांमध्ये सांकेतिक भाषेचा वापर झाला आहे. ती सांकेतिक भाषा समजावून घेवून ते संदेश नक्की काय आहेत याचा शोध घ्यायचा आहे़ अशा याचाही तपास करायचा असल्याने राव यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी अ‍ॅड. उज्ज्वला पवार यांनी केली. 
   
    बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. रोहन नहार, अ‍ॅड. राहूल देशमुख यांनी काम पाहिले. राव यांना पोलिसांनी शनिवारी केलेली अटक ही दुसरी अटक आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून लॅपटॉप, कॉम्पुटर, हार्डडिक्स सह इतर कागदपत्रे जप्त केलेली आहेत. पोलिस एका बाजूला सांकेतिक भाषांचा वापर केला आहे असे सांगताना त्याबाबत तपास करायचा असल्याचे सांगतात, तर दुसरीकडे गणपतीला ईमेल पाठविल्याचे म्हणते. त्यामुळे पोलिसांकडून दाखल केलेले पुरावे विश्वासार्ह नाही. एल्गार परिषदेच्या आयोजनामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती, उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती यांचा सहभाग होता. मग त्यांच्याकडे का पोलिसांनी तपास केला नाही?. त्यामुळे राव यांना न्यायालयीन कोठडी मंजूर करावी, अशी मागणी अ‍ॅड. नहार यांनी युक्तीवादा दरम्यान केली. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकल्या नंतर न्यायालयाने राव यांना २६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचा आदेश दिला आहे.
 

Web Title: varvara rao is in contact with nexalite ganpati ; police custody till 26 nov

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.