ठळक मुद्देयुवकाला एवढी मारहाण झाली होती की त्याला चालतादेखील येत नव्हतेप्रकरण मिटविण्यासाठी मोठ्या रकमेचीदेखील मागणी केल्याचे समजतेया मारहाणीमुळे युवक भेदरला असून न केलेल्या गुन्ह्यासाठी अमानुष मारहाण करण्यात आली

पुणे : ट्रिपलसीट दुचाकीवरील युवकाने हुज्जत घातली म्हणून येरवडा पोलिसांनी युवकाला गुन्हेगारापेक्षाही अमानुष मारहाण केल्याचा गंभीर प्रकार रविवारी घडला. अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. या गंभीर घटनेमुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या मनमानीचा प्रत्यय येत असून गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगारांना अभय तर सर्वसामान्यांना कायद्याचा धाक दाखवित अशा प्रकारे अमानुष मारहाण करण्याचा गंभीर प्रकार येरवडा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी संबधित युवकाच्या पालकांनी पोलीस आयुक्तांकडेच दाद मागणार असल्याचे सांगितले.
रविवार ५ नोव्हेंबर रोजी बाराच्या सुमारास संबधित युवक हा त्याचा वाढदिवस असल्यामुळे केक आणण्यासाठी लहान दोन भावांना घेऊन मित्राच्या दुचाकीवरून कल्याणीनगर येथून येरवडा येथे चालला होता. शास्त्रीनगर चौकात दोन पोलीस कर्मचार्‍यांनी त्यांना अडवले. लायसेन्स व गाडीच्या कागदपत्रांची मागणी केली असता, गाडी माझी नाही मी कागदपत्रे मागवतो, असे म्हणताना पोलिसांनी दुचाकीची चावी त्याच्या हातातून हिसकावली. या वेळी संबधित युवकाची त्यांच्यासेबत हुज्जत झाली. चल पोलीस स्टेशनला गाडी घे, असे म्हणत त्याला येरवडा पोलीस स्टेशन येथे ते दोन पोलीस कर्मचारी घेऊन आले.
डीबीरूममध्ये त्या युवकाची चौकशी सुरू झाली. डीबी पथकातील दोघांनी त्या युवकाला थेट पट्ट्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत तुम्ही पोलिसांना शिकवता का? आम्ही तुमची बरोबर वाट लावतो, असे म्हणत जबर मारहाण केली.
दरम्यान संबधित युवकाने गाडीची कागदपत्रे घेऊन मित्राला बोलावले. त्यालाही मारहाण सुरू केली. गाडीचे पेपर दिल्यावरही का मारता, असे विचारल्यावर आता तुम्हाला दाखवतो पोलीस काय असतो? तुम्ही गाडीवरून हत्यारे घेऊन चालला होता. हा गुन्हा टाकतो, मग बघा तुमची मस्ती जिरेल, असे म्हणत आणखीच मारहाण केली.
याबाबत युवकाच्या मित्रांनी घरी कळवल्यावर स्थानिक कार्यकर्ते व स्वत: लाईनबॉय, पेशाने वकील असणारी व्यक्ती पोलिसांकडे गेली. त्यांनी काय केलंय? असे विचारल्यावर, वेपन घेऊन सापडलेत ते, असे सांगत गुन्हेगारांना तुम्ही मदत करता का? असे सुनावले. साहेबांनी यांच्याकडे व्यवस्थित तपास करायला लावलाय, तुम्ही नका गुन्हेगारांची बाजू घेऊ, असा सल्ला त्यांना दिला. एवढ्यावरच न थांबता पुन्हा त्या युवकाला मारहाण सुरू झाली. संबधित पोलीस त्यांच्या अधिकार्‍याशी फोनवरून माहिती देत होते.
प्रकरण मिटविण्यासाठी मोठ्या रकमेचीदेखील मागणी केल्याचे समजते. मात्र आमदार कार्यालयातून पोलीस निरीक्षकांना रात्री उशिरा फोन गेल्यावर संबधित युवकाची सुटका झाली. मात्र त्या युवकाला एवढी मारहाण झाली होती की त्याला चालतादेखील येत नव्हते. त्याचा मोबाईल, पाकीट व चावी त्या पोलिसांनी ठेऊन घेतली. सोमवारी सकाळी त्याची कुटुंबीयांनी वैद्यकीय तपासणी केली. येरवडा पोलिसांच्या या गंभीर मारहाणीमुळे युवक भेदरला असून न केलेल्या गुन्ह्यासाठी अर्वाच्य शिवीगाळ व अमानुष मारहाण करण्यात आली.
एकंदरीतच या गंभीर प्रकरणामुळे येरवडा पोलिसांनी केवळ ट्रिपल सीटवर सापडलेल्या युवकाला कोणाच्या जीवावर एवढी गंभीर मारहाण केली? पोलीस एवढे निर्दयी कसे वागू शकतात? पोलिसांनी कायद्याचा वापर केवळ नागरिकांना धमकावण्यासाठीच करायचा का? यामुळे सर्वसामान्याना पोलिसांकडून न्याय मिळेल का? हे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. येरवड्यात गंभीर गुन्ह्यांचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत. गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही, तर पोलीस मात्र सर्वसामान्यांना अमानुष वागणूक मिळते. पोलीस आयुक्तांकडेतरी याप्रकरणी न्याय मिळेल का? असा सवाल संबधित युवकाच्या कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे.