Traffic Manager, PMP, was found to be present in newspapers | ‘पीएमपी’ला सापडेनात वाहतूक व्यवस्थापक, वृत्तपत्रांच्या माध्यमातून हजर राहण्याची सूचना

पुणे : परवानगी न घेता गैरहजर असलेले निलंबित वाहतूक व्यवस्थापक सुनील गवळी हे पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) सापडत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाने वृत्तपत्रांच्या माध्यमातून गवळी यांना कार्यालयात हजर राहण्याची सूचना केली आहे; अन्यथा सेवा समाप्त करण्याचा इशाराही या जाहीर सूचनेद्वारे देण्यात आला आहे.
‘पीएमपी’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता गैरहजर राहिल्याप्रकरणी गवळी यांना निलंबित केले आहे. दि. ६ डिसेंबरपासून कार्यालयाची परवानगी न घेता व कार्यालयास न कळविता कामावर गैरहजर असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात प्रशासनाने दि. ९ जानेवारी रोजी वृत्तपत्रांतून प्रसिद्ध केलेल्या जाहीर सूचनेनुसार, यापूर्वी गवळी यांनी कार्यालयाला दिलेल्या पत्त्यावर कारणे दाखवा नोटीस टपालाने पाठविण्यात आली होती. ही नोटीस पत्ता अपूर्ण म्हणून परत आली. त्यानंतर पुन्हा दि. १८ डिसेंबरला गवळी यांच्या विभागीय चौकशीसाठी जोडपत्रे टपालाने पाठविण्यात आली. हे टपालही अपूर्ण पत्ता म्हणून परत आले आहे. त्यानंतर कार्यालयीन सेवकामार्फत त्यांच्या घरी हा पत्रव्यवहार पाठविण्यात आला असता, घर बंद असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
उपलब्ध सर्व मार्गांचा प्रयत्न करूनही गवळी कार्यालयाशी संपर्क करीत नाहीत, पत्रव्यवहारांना प्रतिसाद देत नाहीत. विभागीय चौकशीचे पुढील कामकाज करणे शक्य होत नाही. गवळी यांना सात दिवसांच्या आत संपर्क साधण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. अन्यथा सात दिवसांनंतर सर्व आरोप सिद्ध झाले, असे गृहीत धरून सेवा समाप्त करण्यात येतील, असे जाहीर सूचनेद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, गवळी वैद्यकीय कारणास्तव कामावर रुजू होत नसल्याचे समजते. त्यांनी प्रशासनाकडे दोन वैद्यकीय प्रमाणपत्रेही सादर केली आहेत. तसेच ते दिलेल्या मुदतीत हजर होऊ शकतात, असेही सूत्रांनी सांगितले.