शिक्षकभरतीबाबत टोलवाटोलवी, रात्रशाळा शिक्षकांविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 01:13 AM2018-09-21T01:13:28+5:302018-09-21T01:13:35+5:30

रात्रशाळांमधील १४५६ शिक्षक तडकाफडकी काढून घेऊन वर्ष उलटले तरी अद्याप रात्रशाळांमध्ये पर्यायी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

Tollwatolvi, without night teachers, without teacher recruitment | शिक्षकभरतीबाबत टोलवाटोलवी, रात्रशाळा शिक्षकांविनाच

शिक्षकभरतीबाबत टोलवाटोलवी, रात्रशाळा शिक्षकांविनाच

Next

पुणे : रात्रशाळांमधील १४५६ शिक्षक तडकाफडकी काढून घेऊन वर्ष उलटले तरी अद्याप रात्रशाळांमध्ये पर्यायी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. अर्धवेळ हंगामी स्वरूपाच्या शिक्षकांची भरती करण्यास मान्यता द्यावी, यासाठी शिक्षण संचालक, उपसंचालक यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्याला मान्यता देण्यात आलेली नाही. त्यामुळे शिक्षकांअभावीच रात्रशाळा चालत असल्याने विद्यार्थी अडचणीत आले आहेत.
शासनाने रात्रशाळा व महाविद्यालयात दुबार नोकरी करीत असलेल्या १४५६ शिक्षकांची सेवा शासनाने मे २०१७ मध्ये एका परिपत्रकाद्वारे संपुष्टात आणली. त्यानंतर त्या जागांवर लगेच शासनाने पर्यायी शिक्षक उपलब्ध करून देणे आवश्यक होते. मात्र त्यावर काहीच कार्यवाही शासनस्तरावरून होताना दिसत नाही. सध्या शासनाकडून शिक्षकभरतीला स्थगिती देण्यात आलेली आहे.
रात्रशाळांमधून शिक्षक काढून घेतल्यानंतर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे रात्रशाळेमध्ये समायोजन केले जाईल, असे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात त्यानुसार अंमलबजावणी झालीच नाही.
शाळा अडचणीत येऊ नयेत यासाठी हंगामी स्वरूपाच्या शिक्षक भरतीला परवानगी देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आलेला आहे. याबाबतचे इतिवृत्तही उपलब्ध आहे. त्याची प्रत तत्कालीन उपसंचालक दिनकर टेमकर, मीनाक्षी राऊत, संचालक गंगाधर म्हमाणे यांना देऊनही त्यांच्याकडून काहीच कार्यवाही झालेली नाही. केवळ कागदी घोडे नाचविण्यापलीकडे ते काहीच करीत नसल्याने रात्रशाळेच्या शिक्षकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
इंग्रजी, गणित, विज्ञान आदी विषयांचे शिक्षकच नसल्याने याचा अभ्यास कसा करायचा याचा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालेला आहे. मात्र रात्रशाळांमधील शिक्षक काढून घेण्यात आल्याने त्या जागी हंगामी अर्धवेळ शिक्षक भरण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती रात्रशाळांनी उपसंचालकांकडे एक वर्षापूर्वी केली. शिक्षणाधिकाऱ्यांनी उपसंचालकांना पत्र पाठवून याबाबत काय निर्णय घ्यायचा, याचे मार्गदर्शन मागितले.
उपसंचालकांनी संचालकांकडे, तर संचालकांनी आयुक्तांकडे आणि सर्वात धक्कादायक म्हणजे शिक्षण आयुक्तांनी शिक्षण सचिवांमध्ये याबाबत काय निर्णय घ्यायचा, याचे मार्गदर्शन मागितले आहे.
>कार्यवाही
सुरू आहे
रात्रशाळांमध्ये हंगामी शिक्षकभरती करण्यास मान्यता देण्याबाबत संचालकांकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. त्यांचा अभिप्राय प्राप्त झाला असून त्यानुसार कार्यवाही केली जाईल.
- मीनाक्षी राऊत,
प्रभारी शिक्षण उपसंचालक
>शिक्षकांची तातडीने
भरती करावी
रात्रशाळांमध्ये शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रात्र शाळांमध्ये हंगामी शिक्षकभरती करण्यास परवानगी दिली जावी, असा निर्णय घेतला होता. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
- अविनाश ताकवले,
प्राचार्य, पूना नाईट स्कूल

Web Title: Tollwatolvi, without night teachers, without teacher recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक