समस्यांच्या चक्रव्यूहात तीनहत्ती चौक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 02:32 AM2018-11-13T02:32:51+5:302018-11-13T02:33:00+5:30

महात्मा फुले चौक : अनधिकृत पार्किंग व फ्लेक्सचा सुळसुळाट, वाढलेले गवत व झुडपांनी रया गेली

Three Hatti Chowk in the tragedy of problems | समस्यांच्या चक्रव्यूहात तीनहत्ती चौक

समस्यांच्या चक्रव्यूहात तीनहत्ती चौक

googlenewsNext

धनकवडी : पाच वर्षांपूर्वी कारंजे बंद पडले, सुशोभिकरणात उभारलेले हत्ती काही वेळा कोसळले, वाहतूक बेटांमध्ये वाढणारे गवत आणि झुडुपांना वेळेत काढण्याची तसदी महापालिकेने कधीही घेतली नाही या समस्या कायम असतानाच या ऐसपैस चौकात बेकायदा पार्किंग बोकाळली. खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी तर चौकाची चौपाटी केली. गेली अनेक वर्षे फ्लेक्सबाजीचा अड्डा ठरलेल्या चौकाला किमान विद्रुपीकरणाच्या कचाट्यातून मुक्त करा आणि क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले चौक या नावाचं वैभव जतन करा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या कारवाया होत नसल्यामुळे बेकायदा पार्किंग आणि फ्लेक्सबाजीचा अड्डा ठरलेला क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले म्हणजेच तीन हत्ती चौकाला विद्रूपीकरणाचे लागलेले ग्रहण सुटण्याचे नाव घेत नाही. पश्चिमेला धनकवडी गावठाण आणि तळजाई पठार, पूर्वेला संभाजीनगर, सातारा रस्ता ते बिबवेवाडी तर दक्षिणेला भारती विद्यापीठ परिसर, आंबेगावचा दत्तनगर, कात्रज, उत्तरेला पद्मावती, सहकारनगर ते थेट शहराला जोडण्याची प्रमुख भूमिका बजावणारा हा चौक आहे. सातारा रस्त्यावरील सिग्नलचे अडथळे, वेगवान वाहतूक आणि जोखीम टाळणारे या मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. विकास आराखड्यात रस्त्यासाठी जागा नसताना राऊत बाग ओढ्यावर पूल उभारून ऐसपैस जागा निर्माण करण्याचे प्रयत्न २००३ मध्ये तत्कालीन नगरसेवक सुभाष जगताप यांनी केले. त्यानंतर मध्यभागी वर्तुळाकार आणि तिन्ही दिशांना पाकळ्या असलेली वाहतूक बेटं उभारण्यात आली. त्याकाळी सुशोभित चौकाचे एक उत्तम उदाहरण ठरले होते. त्यावेळी महापालिकेने २५ लाख रुपये खर्च केले होते. रंगीबेरंगी प्रकाशझोतात न्हावून जाणारे कारंजे पाहण्यासाठी नागरिकांना स्टेडियमसारखी बैठक व्यवस्था उभारली होती. काही वर्षांनंतर या सुशोभिकरणाला घरघर लागली. ती दूरवस्था दूर करण्यात महापालिका आजवर अपयशी ठरली आहे. परिणामी, या दुर्लक्षित चौकाचा गैरफायदा अनेकजण घेऊ लागले. चौकात चारही बाजूला जागा मिळेल तिथे बेकायदा पार्किंगने जागा व्यापली. या चौकाला विद्रूप करण्याची जणू स्पर्धाच लागल्यासारखी सातत्याने फ्लेक्सबाजीचे ग्रहण लागले. महापालिकेचा पंगू आकाशचिन्ह विभाग आणि वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षाचा फायदा बेशिस्तीने घेतला. ट्रक, मिनी बस, स्कूल बस, टेम्पो, रिक्षांनी तर बेकायदेशीर पार्किंगची हक्काची जागा केली. रहदारीला अडथळा होऊन अपघाती स्थितीचा सामना नागरिकांना सातत्याने करावा लागत आहे. संपूर्ण फ्लेक्सने व्यापणारा हा चौक समोरून येणारी वाहने दिसत नसल्यामुळे धोकादायक ठरत आहे.

कुठे आहेत कारंजी आणि हिरवळ?
धनकवडीतील या चौकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. धनकवडी गाव, भारती विद्यापीठ परिसर सातारा रस्ता मार्गे बिबवेवाडीलाही शहराशी जोडणारा महत्त्वाचा चौक आहे.
ओढा परिसरातील उपलब्ध झालेल्या प्रशस्त जागेचा वापर करून १५ वर्षांपूर्वी या चौकाचा विकास करण्यात आला. मध्यभागी वर्तुळाकार वाहतूक बेट, तिन्ही रस्त्यांना त्रिकोणी आकाराचे वाहतूक बेट, सुंदर फुलांच्या पाकळ्यांप्रमाणे चौकाची रचना करण्यात आली होती.
या सर्व वाहतूक बेटांमध्ये हिरवळ व झाडी लावण्यात आली होती. मध्यभागी असलेल्या वर्तुळाकार बेटामध्ये केलेली तीन हत्तींची उभारणी आणि कारंजे लक्षवेधी ठरले.

1 अतिक्रमण विभागाच्या दुर्लक्षामुळे विविध खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी पाय रोवले. एकूणच मोठ्या आकाराच्या सुशोभित चौकाचे वैभव लोप पावल्याची स्थिती आहे. चौकाचे नव्याने सुशोभिकरण होणार असल्याची चर्चा गेली वर्षभर घोंगावत आहे; त्याला विलंब होत असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आहे.
2 नगरसेवक महेश वाबळे, म्हणाले, चौकाला नव्याने सुशोभित करण्याचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत. त्यासाठीच्या सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत. १५ दिवसांत कामाला सुरुवात होणार आहे.
3 यामध्ये तीन हत्तींची प्रतिमा आहे तशीच ठेवून कारंजे , गार्डन आणि सुशोभित झाडे लावून सुशोभिकरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर १२० फुट लांब व ७ फुट उंचीचे संभाजीमहाराजांचे म्युरल उभारण्यात येणार आहे.
 

Web Title: Three Hatti Chowk in the tragedy of problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे