भूमिगत जलवाहिन्यांच्या जाळ्यांचे नकाशेच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 01:25 AM2018-08-18T01:25:55+5:302018-08-18T01:26:15+5:30

भुयारी गटारे, तसेच जलवाहिन्या यासाठी पुणे शहराचे नेहमीच देशात कौतुक होत असते. मात्र त्याला धक्का बसेल अशा गोष्टी आता महापालिकेत होत आहेत.

There are no maps of underground waterfalls | भूमिगत जलवाहिन्यांच्या जाळ्यांचे नकाशेच नाहीत

भूमिगत जलवाहिन्यांच्या जाळ्यांचे नकाशेच नाहीत

Next

पुणे - भुयारी गटारे, तसेच जलवाहिन्या यासाठी पुणे शहराचे नेहमीच देशात कौतुक होत असते. मात्र त्याला धक्का बसेल अशा गोष्टी आता महापालिकेत होत आहेत. या रचनेच्या नकाशांचा अभ्यास न करताच बांधकामांना परवानग्या देत गेल्याने किंवा त्यावरच अनधिकृत बांधकामे होत गेल्याने आता यातील अनेक वाहिन्या खचून जमिनीखाली बुजल्या गेल्याचे लक्षात येत आहे. डीपी रस्त्यावर राजाराम पुलाच्या कोपऱ्यावर खचल्या गेलेल्या रस्त्यामुळे या गोष्टी आता उजेडात येत आहेत.
डीपी रस्त्यावर काही दिवसांपूर्वी रस्ता अचानक खचला. तिथे पाहणी केल्यानंतर रस्ता नाही तर ड्रेनेज खचलेले आहे, असे लक्षात आले. होईल लगेच काम म्हणून महापालिकेने काम सुरू केले; मात्र त्यानंतर खचलेल्या रस्त्याचे भले मोठे भुयारच झाले. खचलेल्या त्याच भागातून जलवाहिन्या, सांडपाणी वाहून नेणाºया वाहिन्या व आता नव्यानेच आलेल्या ‘पाईपमधून स्वयंपाकाचा गॅस’ योजनेतील गॅसवाहिन्या गेलेल्या आढळल्या.
स्थानिक सामाजिक कार्यकर्ते संदीप खर्डेकर पहिल्या दिवसापासून या कामावर लक्ष ठेवून आहेत. महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अभियंता अनिरुद्ध पावसकर हेही त्यांच्या समवेत आहेत. काम पूर्ण होणे बाजूलाच राहिले ते वाढतच चालले असल्याचे खर्डेकर यांचे निरीक्षण आहे. खचलेल्या या चेंबरमुळे त्या समोरच्याच मॅजेंटा लॉनमधे तर मैलापाण्याचा जवळपास पूरच आला आहे. आता नदीकाठावरुन जाणाºया १२०० मि.मी.च्या ट्रंकलाईनला (मुख्य वाहिनी) आत्ताच्या खचलेल्या चेंबरमधून ९०० मि.मी.ची नवीन वाहिनी टाकल्यावरच हा पावसाळी लाईनचा व मैलापाण्याचा प्रवाह नियंत्रित करता येईल. आता ड्रेनेज चेंबर शास्त्रीय पद्धतीने बांधण्याचे काम सुरू आहे. तरीही दोन दिवस काम चालण्याची शक्यता आहे. रस्त्याखाली गाडले गेलेल्या वाहिन्या व चेंबरचा शोध घेण्यात येत आहे.
महापालिकेकडे शहरातील भूमिगत असलेल्या प्रत्येक वाहिनीचा नकाशा असणे गरजेचे आहे. तसे असेल तरच दुरुस्तीचे काम वेगात करता येते. असे नकाशेच महापालिकेकडे नाहीत. काम बºयाच वर्षांपूर्वीचे आहे हे लक्षात घेतले तरीही असे नकाशे असलेच पाहिजेत. आता महापालिकेने एका खासगी संस्थेला हे काम दिले आहे. त्यांच्या सर्वेक्षणातून वाहिन्यांचे जाळे नकाशाबद्ध होईल, असे खर्डेकर म्हणाले.

खचलेल्या रस्त्याचे काम सहाव्या दिवशीही अपूर्णच
खचलेल्या ड्रेनेज व रस्त्याचे शुक्रवारी सहाव्या दिवशीही काम अपूर्णच आहे. कारण काम करता येणेच अशक्य झाले आहे. कोणत्या वाहिन्या कुठून कुठे गेल्या आहेत, त्यातील नव्या कोणत्या, जुन्या कोणत्या याची माहितीच महापालिका प्रशासनाकडे नाही. वास्तविक अशा गोष्टींचे सविस्तर नकाशेच त्या त्या विभागाकडे उपलब्ध हवेत. असे नकाशे नाहीत. वाहिन्या गेल्या आहेत त्या भागावर बांधकाम होऊ न देणे अपेक्षित असते. तसे गेल्या कित्येक वर्षांत झालेले नाही. त्यामुळे एखाद्या नव्या बांधकामाचा पाया खोदताना काही वाहिन्या जमिनीखाली जाऊन बुजून गेलेल्या डीपी रस्त्यावरील काम करताना निदर्शनास आलेले आहे. पाणी वाहून नेण्याची अडचण झाली म्हणून नव्याने वाहिन्या टाकल्या असल्याचेही दिसून येत आहे.

Web Title: There are no maps of underground waterfalls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.