Taking a bribe of 11 lakh from Sinhagad Institute, the dealer was arrested | सिंहगड इन्स्टिट्युटकडून 11 लाखांची लाच घेताना वनपालाला पकडले रंगेहाथ

पुणे : लोणावळा येथील सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्युटच्या खासगी वनक्षेत्रातील जागेवर केलेल्या बांधकामातील गुन्ह्यात जप्त केलेली वाहने सोडविण्यासाठी व बांधकामाला कोणताही अडथळा न करण्यासाठी तब्बल ११ लाख रुपयांची लाच वडगाव मावळ येथील वनविभागाच्या वनपालाने मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुण्यात शुक्रवारी रात्री ८ वाजता त्याला सापळा रचून पकडले. 
वनपाल विलास बाबाजी निकल (वय ४९, रा. वडगाव मावळ) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्युटच्या प्रशासन अधिका-यांनी तक्रार दिली होती. इन्स्टिट्युटने लोणावळा येथे खरेदी केलेल्या गट नंबर ३१६ वर खासगी वन, अशी नोंद सातबारा उता-यावर लागली होती. त्या जमिनीबाबत वनविभागाने आक्षेप घेतला होता. त्यावर इन्स्टिट्युटने उच्च न्यायालयात केस दाखल केली होती. या गटनंबरमध्ये इन्स्टिट्युटने चरखोदकाम करून बांधकाम सुरू केले होते. त्यावरून वनविभागाच्या अधिका-यांनी इन्स्टिट्युटचे प्राचार्य व इतरांवर गुन्हे दाखल करून तेथील ठेकेदाराचे जेसीबी व इतर वाहने जप्त करून हे बांधकाम बंद केले होते. ही जप्त वाहने व जेसीबी सोडविण्यासाठी व इन्स्टिट्युटचे बांधकाम करण्यासाठी कोणताही अडथळा न करण्यासाठी वडगाव मावळ येथील वनपाल विलास निकम याने ११ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. प्रशासन अधिका-यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली़ या तक्रारीची शुक्रवारी सकाळी पडताळणी करण्यात आली. त्यानुसार सिंहगड इन्स्टिट्युटच्या लोणावळा येथील गेस्ट हाऊसमध्ये सापळा रचण्यात आला. तेथे ११ लाख रुपयांची लाच स्वीकारताना निकम याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी केले आहे.


Web Title: Taking a bribe of 11 lakh from Sinhagad Institute, the dealer was arrested
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.