काळजी घ्या, स्वत:वर प्रेम करा, काजोलचा प्रेमळ सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 03:01 AM2018-09-27T03:01:59+5:302018-09-27T03:02:14+5:30

‘स्तनांच्या कर्करोगाचा सामना करताना लोकांचा दृष्टिकोन काय असेल, या विचाराने नैराश्य येते. आयुष्यातला हा प्रवास खूपच आव्हानात्मक असतो.

Take care, love yourself, Kajol's loving advice | काळजी घ्या, स्वत:वर प्रेम करा, काजोलचा प्रेमळ सल्ला

काळजी घ्या, स्वत:वर प्रेम करा, काजोलचा प्रेमळ सल्ला

Next

पुणे - ‘स्तनांच्या कर्करोगाचा सामना करताना लोकांचा दृष्टिकोन काय असेल, या विचाराने नैराश्य येते. आयुष्यातला हा प्रवास खूपच आव्हानात्मक असतो. आपण स्वत:बद्दल काय विचार करतो, याला जास्त महत्त्व असते. ही परीक्षा आपल्यालाच द्यायची आहे. त्यामुळे डॉक्टरांशी, रुग्णांशी चर्चा करून योग्य माहिती घेऊन स्वत:च, स्वत:ची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी स्वत:वर प्रेम करायला शिका,’ असा सल्ला अभिनेत्री काजोल हिने दिला. संकटाच्या काळात आयुष्य अधिकाधिक आनंदाने कसे जगता येईल, याचा विचार करायला हवा, असेही त्या म्हणाल्या.
प्रशांती कॅन्सर केअर मिशनतर्फे लाले बुशेरी लिखित ‘ट्रिम्फ ओव्हर ब्रेस्ट कॅन्सर-ओडिस्सीयस आॅफ फिनॉमिनल वूमेन’ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी अभिनेत्री काजोल आणि अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकी यांच्या हस्ते झाले. या वेळी अभिनेत्री तनुजा, लाले बुशेरी, डॉ. चैतन्यानंद कोप्पीकर उपस्थित होते.
काजोलने स्तनांच्या कर्करोगाचा सामना करणाऱ्या स्त्रियांचे अनुभव, मानसिक आणि शारीरिक बदल, त्यांना कुटुंबाकडून आवश्यक असलेला पाठिंबा अशा विविध विषयांवर दिलखुलास संवाद साधला. काजोल म्हणाली, ‘स्तनांचा कर्करोग झाल्यावर शारीरिक बदल आणि त्यामुळे येणारा मानसिक ताण यांचा सामना करणे अवघड असते. निदान झाल्यावर निराश न होता ताबडतोब डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औैषधोपचार, शस्त्रक्रिया करुन घेतल्यास पुढील धोके टाळता येऊ शकतात. कर्करोगाचा सामना करून, त्यातून तावून सुलाखून बाहेर पडलेल्या महिलांचा मला फार अभिमान वाटतो. नैराश्याची सावली बाजूला सारून त्यांनी संकटांशी केलेले दोन हात आणि चेहºयावरचा आनंद खूप काही शिकवून जातो.’हॉलिवूडच्या तुलनेत बॉलिवूडचे कलाकार जनजागृतीसाठी पुढे येत नाहीत असे वाटते का, असे विचारले असता त्या म्हणाल्या, ‘कलाकार विविध मुद्द्यांवर ठामपणे मत मांडताना दिसतात. ‘हॅशटॅग मी टू’ मधून अत्याचाराबाबत कलाकारांनी खुलेपणाने मत मांडले. सेलिब्रिटींचे म्हणणे प्रेक्षकांपर्यंत लवकर पोचते, हे खरे असले, तरी स्तनांचा कर्करोग, महिलांवरील अत्याचार यांसारख्या गोष्टींबाबत केवळ चित्रपट सृष्टीतीलच नव्हे तर प्रत्येक
क्षेत्रातील स्त्रीने ठामपणे मत मांडले पाहिजे, बोलले पाहिजे.’

ं महिला सक्षमीकरण आपल्यापासूनच !

महिला सक्षमीकरणाची सुरुवात प्रत्येक स्त्रीने आपल्यापासूनच करायला हवी. स्त्रियांनी एकमेकींचे पाय खेचण्यापेक्षा, एकमेकींना कमी लेखण्यापेक्षा एकजुटीने पुढे जायला हवे, तरच खºया अर्थाने सक्षमीकरण होऊ शकेल. एका स्त्रीला दुसºया स्त्रीचे दु:ख, समस्या पटकन समजू शकतात. त्या समस्या समजून घेऊन एकमेकींची ताकद बनण्याचा प्रयत्न करायला हवा. - काजोल

आपल्याकडील शिक्षण पद्धती, पालकांची बदललेली मानसिकता यांनी सध्याच्या पिढीला दुबळे केले आहे. मुलांना स्वत:च्या डोक्याने, मनाने विचार करण्याची, स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याची पालक संधीच देत नाहीत. मुलांचे अतिलाड केल्याने त्यांना नकाराचा, संकटांचा सामना करण्याची सवयच राहत नाही. मुले पालकांचे अनुकरण करत असतात. त्यामुळे आपल्या वागण्यातूनच पालक मुलांवर संस्कार करू शकतात. मुलींवर बंधने घालण्यापेक्षा मुलांनी कसे वागावे, स्त्रीचा आदर कसा करावा, हे शिकवण्याची गरज आता निर्माण झाली आहे. आपली मुले ही स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहेत, हे पालकांनी विसरून चालणार नाही. - तनुजा

मैैं फिल्मी नही हूँ : नवाजुद्दिन सिद्दिकी

चित्रपटात काम करताना कलाकार आणि भूमिका यांची आपापसांत देवाण-घेवाण होत असते. यातून कलाकाराला शिकायला मिळत असते. मला सुरुवातीपासून कधीच चित्रसृष्टीतील ‘स्टार्स’चे आकर्षण नव्हते.
‘थिएटर अ‍ॅक्टर्स’कडे मी जास्त आकर्षित व्हायचो. पु. ल. देशपांडे, वामन केंद्रे यांचा मी चाहता आहे. साठच्या दशकापासून आपल्याकडे ‘हिरो’ची अत्यंत चुकीची प्रतिमा तयार करण्यात आली आहे. हिरोइन असणारा, गुंडांशी मारामारी करणारा, रोमँटिक असणारा, सर्वगुणसंपन्न असाच हिरो आपण पाहत आलो आहोत.
असा हिरो मला कधीच पटला नाही. कोणताही माणूस परिपूर्ण नसतो. त्याच्यामध्ये चांगले-वाईट गुण असतातच. कलाकारही तसाच असायला हवा. मी कलाकार झालो नसतो, तर दुसरे काही करण्यापेक्षा चांगला कलाकार होण्याचा प्रयत्न केला असता.
४‘मंटो’बद्दल बोलताना नवाजुद्दिन म्हणाला, ‘हिंदी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच एखाद्या लेखकावर चित्रपट तयार करण्यात आला आहे. समाजात जे दिसले, ते सत्य जसेच्या तसे त्याने लेखणीतून उतरवले. समाजातील वास्तव मांडल्याने त्याच्यावर टीका झाली. आजही आपल्यामधील अनेकांमध्ये ‘मंटो’ वसलेला आहे.’
४‘मंटो’ काळाच्या खूप पुढे गेला आहे. या चित्रपटाला कान्स फेस्टिव्हलमध्ये मानांकन मिळाले, प्रेक्षकांची प्रचंड दाद मिळाली. भारतात मात्र चित्रपट फसला, अशी खंत त्याने व्यक्त केली. तो म्हणाला, ‘चित्रपटाचे वितरण अत्यंत चुकीच्या पद्धतीने झाले, त्यामुळे चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचलाच नाही. साहित्याचे महत्त्व आजच्या पिढीला कधी कळणार, याची चिंता वाटते.’

Web Title: Take care, love yourself, Kajol's loving advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.