'महाराष्ट्र बँकेचे अध्यक्ष मराठे यांच्यावर कारवाई करा'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 02:04 AM2018-10-30T02:04:12+5:302018-10-30T02:04:50+5:30

डीएसके गुंतवणूकदारांची बँकेसमोर निदर्शने

Take action against 'Maharashtra Bank President Maratha' | 'महाराष्ट्र बँकेचे अध्यक्ष मराठे यांच्यावर कारवाई करा'

'महाराष्ट्र बँकेचे अध्यक्ष मराठे यांच्यावर कारवाई करा'

Next

पुणे : ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ने बँकिंग नियमांची पायमल्ली करून बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना कर्जवाटप केले. त्याला बँकेचे अध्यक्ष रवींद्र मराठेदेखील तितकेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी डीएसके गुंतवणूकदारांनी शिवाजीनगर येथील ‘बँक आॅफ महाराष्ट्र’च्या मुख्यालयासमोर सोमवारी निदर्शने केली.

बँकेने डीएसके यांना निष्काळजीपणे आगाऊ कर्ज दिले. त्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाल्याचे गुंतवणूकदारांनी या वेळी सांगितले. सुमारे ३५ हजार गुंतवणूकदार विविध समस्यांचा सामना करत असून, यामध्ये ‘बँक आॅफ महाराष्ट्र’ही जबाबदार आहे. डीएसके यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना पुढील तारखांचे धनादेश दिले. मात्र, त्यावर बँक आॅफ महाराष्ट्राने देखरेख ठेवली नाही. संबंधित धनादेश परत आल्यानंतरही बॅँकेने डीएसके यांच्या खात्यात पुरेसा निधी नसल्याचे जाणीवपूर्वक लपवून ठेवले. बँकेने कडक धोरण स्वीकारून डीएसके यांना आणखी कर्ज मिळणार नाही, अशी भूमिका २०१३ मध्येच घेणे गरजेचे होते. तसेच डीएसके यांना काळ्या यादीत टाकणे आवश्यक होते. तशा प्रकारे भूमिका घेतली गेली असती तर गुंतवणूकदारांचा भविष्यातील गुंतवणुकीचा धोका टळला असता. मात्र, बॅँक आॅफ महाराष्ट्राच्या व्यवस्थापनाने त्याकडे डोळेझाक केली. त्यांनी डीएसके यांच्या आर्थिक निर्णयांच्या चुकांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप गुंतवणूकदार दीपक फडणीस यांनी या वेळी केला.

काही गुंतवणूकदारांनी बँकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले. बँकेने केलेल्या कर्जपुरवठ्याचा आणि डीएसके समूहामध्ये केलेल्या छोट्या गुंतवणूकदारांच्या संदर्भातील परिस्थितीचा काहीही संबंध नसल्याचे बँकेकडून या वेळी सांगण्यात आले. या उलट बँकेलाही डीएसके समूहाला कर्जपुरवठा केल्याने तोटा सहन करावा लागत आहे. बँकेने या कर्जरकमेच्या वसुलीची कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती बँक व्यवस्थापनाकडून देण्यात आली. तसेच, गुंतवणूकदारांनी त्यांना झालेल्या नुकसानीबाबत बँकेवर केलेल्या आरोपांची चौकशी तपास यंत्रणा करीत असल्याचे अंदोलनकर्त्यांना सांगण्यात आले.

बॅँक आॅफ महाराष्टÑने दिलेल्या खुलाशानुसार, बँकेच्या प्रतिनिधींनी गुंतवणूकदारांची तक्रार संयमाने ऐकली आणि सहानुभूती व्यक्त करताना स्पष्ट केले की, बँकेने केलेल्या कर्जपुरवठ्याचा आणि डीएसके समूहामध्ये केलेल्या छोट्या गुंतवणूकदारांच्या संदर्भातील उद्भवलेल्या परिस्थितीचा काहीही संबंध नाही. बँकेलाही डीएसके समूहला कर्जपुरवठा केल्याने तोटा सहन करावा लागत आहे या कर्जरकमेच्या वसुलीसाठी बँकेने वसुलीची कार्यवाही सुरू केली आहे. गुंतवणूकदारांनी त्यांना झालेल्या नुकसानीबाबत बँकेवर केलेल्या आरोपांची दाखल चौकशी करणाºया तपास यंत्रणेने यापूर्वीच नोंद घेतली आहे. त्यानंतर ठेवीदारांनी बँकेचे मुख्य कार्यालय सोडले.
 

Web Title: Take action against 'Maharashtra Bank President Maratha'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.