‘सुदर्शन’अस्त्राचा पुण्यात कलाविष्कार; नृत्य महोत्सवातून देव-देविकांचे उलगडले सौंदर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:19 PM2018-02-24T12:19:04+5:302018-02-24T12:19:04+5:30

कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि डॉ. उषा आर. के. यांच्यातर्फे  ‘दिव्या ट्रिलॉजी’ या नृत्यमहोत्सवाचे सेनापती बापट रस्त्यावरील भारतीय विद्या भवनाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते.

Sudarshan astra dance festival in Pune | ‘सुदर्शन’अस्त्राचा पुण्यात कलाविष्कार; नृत्य महोत्सवातून देव-देविकांचे उलगडले सौंदर्य

‘सुदर्शन’अस्त्राचा पुण्यात कलाविष्कार; नृत्य महोत्सवातून देव-देविकांचे उलगडले सौंदर्य

Next
ठळक मुद्देसादर झालेल्या सुदर्शन अस्त्राच्या कलात्मक आविष्काराने रसिक मंत्रमुग्धसर्जनशील आणि कलाकारांसाठी काहीसा आव्हानात्मक असा हा कलाविष्कार

पुणे : देवी, देवता म्हटले की त्यांच्या तेजस्वितेबरोबरच डोळ्यांसमोर येतात ती त्यांची वाहनं, त्यांना आवडणारी फुले, त्यांची ओळख बनलेली विशिष्ट शस्त्रे. या देवी, देवतांचे दर्शन घडविण्यासाठी अस्त्र, वाहन आणि पुष्प अशा तीन गोष्टींची निवड करून भरतनाट्यम कलाविष्काराद्वारे देवी, देवतांच्या विविध रूपांचे सौंदर्य शुक्रवारी रसिकांसमोर उलगडण्यात आले. या वेळी सादर झालेल्या सुदर्शन अस्त्राच्या कलात्मक आविष्काराने रसिक मंत्रमुग्ध झाले. 
कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि डॉ. उषा आर. के. यांच्यातर्फे  ‘दिव्या ट्रिलॉजी’ या नृत्यमहोत्सवाचे सेनापती बापट रस्त्यावरील भारतीय विद्या भवनाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या नृत्य महोत्सवाचे ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यांगना व कलावर्धिनीच्या संस्थापिका सुचेता भिडे-चापेकर, ज्येष्ठ नृत्यांगना पंडिता शमा भाटे, भारतीय विद्याभवनाचे नंदकुमार काकिर्डे आणि डॉ. उषा आर. के. यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.  सर्जनशील आणि कलाकारांसाठी काहीसा आव्हानात्मक असा हा कलाविष्कार. नृत्यातून देवी, देवतांचे पैलू उलगडणे तसे फारसे कठीण नाही, परंतु अस्त्र, वाहन आणि पुष्प या तीन गोष्टींचे रूपक घेऊन नृत्यातून देवी, देवतांच्या रूपांचे प्रकटीकरण करण्यात आले. या वेळी प्रसिद्ध भरतनाट्यम कलाकार पवित्र भट यांनी नृत्यातून ‘ब्रह्मास्त्रा’चे सादरकरण करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. प्रसिद्ध भरतनाट्यम कलाकार परिमल फडके यांनी कामदेवांच्या पुष्पअस्त्राचे नृत्यातून दर्शन घडवले.  पार्श्वनाथ उपाध्ये यांनी  ‘पिनाक’ अस्त्राचे अत्यंत खुबीने सादरीकरण केले. मिथुन श्याम यांनी विष्णूच्या ‘सुदर्शन’अस्त्राचा कलात्मक आविष्कार घडविला. 
डॉ. उषा आर. के. यांनी या नृत्याविष्काराची संकल्पना स्पष्ट केली. 

तरुण नर्तक पारंपारक नृत्य करीत आहेत, ही खूपच कौतुकाची बाब आहे. बंगळुरू, पुणे, चेन्नई, मुंबई आणि दिल्ली येथील १४ प्रसिद्ध नृत्यकलाकार एकत्र येऊन सादरीकरण करीत आहेत. त्यांच्यामध्ये निखळ स्पर्धा दिसत आहे. यातूनच नृत्याचा प्रसार होण्यास मदत होणार आहे.       
- सुचेता भिडे-चापेकर

Web Title: Sudarshan astra dance festival in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे