Strawberry season effloresce due to cold season... 30 to 40 percent increase rates In Pune | थंडीमुळे बहरला स्ट्रॉबेरीचा हंगाम... पुण्यात आवक वाढली; दरामध्ये ३० ते ४० टक्क्यांची वाढ

ठळक मुद्देदरवर्षी आॅक्टोबर महिन्याच्या शेवटी स्ट्रॉबेरी बाजारात, परंतु यंदा परतीच्या पावसामुळे हंगाम उशिरामोठी आवक होऊनदेखील मागणी चांगली असल्याने दोन किलोस २०० ते ३०० रुपये भाव

पुणे : राज्यात गेल्या आठ दिवसांपासून चांगली थंडी पडू लागल्याने स्ट्रॉबेरीचा हंगामदेखील बहरात आला आहे. गेल्या काही दिवसांत आवक वाढली असून, गोड अन् चांगल्या दर्जाच्या स्ट्रॉॅबेरीमुळे मागणीदेखील वाढली आहे. मागणी वाढल्याने स्ट्रॉबेरीच्या दरामध्ये ३० ते ४० टक्क्यांची वाढ झाली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. 
दरवर्षी आॅक्टोबर महिन्याच्या शेवटी स्ट्रॉबेरी बाजारात दाखल होते, परंतु यंदा परतीच्या पावसामुळे हा हंगाम उशिरा सुरू झाला. त्यात ओखी वादळ व त्यानंतर आलेल्या ढगाळ हवामानाचादेखील स्ट्रॉॅबेरीला फटका बसला. आता मात्र राज्यात सर्वत्र चांगली थंडी पडत असून, या हवामानाचा स्टॉबेरीला फयदा होत आहे. यामुळे स्ट्रॉबेरीचा हंगाम सध्या बहरात आहे़ 
गेल्या आठवड्यात स्ट्रॉबेरीच्या दोन किलोस १५० ते २०० रुपये दर मिळाला होता. रविवारी (दि. १७)  बाजारात तब्बल चार टन इतकी स्ट्रॉबेरीची आवक झाली. मोठी आवक होऊनदेखील मागणी चांगली असल्याने दोन किलोस २०० ते ३०० रुपये भाव मिळाल्याची माहिती स्ट्रॉबेरीचे व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली़ पुण्यातील मार्केट यार्डमध्ये प्रामुख्याने महाबळेश्वर, पाचगणी, वाई, भिलार, तसेच जावळी तालुका, तसेच भोर तालुक्यातून काही प्रमाणात स्ट्रॉबेरीची आवक होत आहे़  
पुणे बाजारातून गोवा आणि गुजरात राज्यातील व्यापाऱ्यांकडून सर्वाधिक मागणी आहे़  तसेच कोलकाता, कर्नाटक, बंगळुरू, तमिळनाडू, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथूनही 
मागणी वाढली असल्याचे मोरे यांनी नमूद केले़ तसेच घरगुती ग्राहकांसह कँडी, आइस्क्रीम, पल्प सिरप, जेली उत्पादक कंपन्यांकडून स्ट्रॉबेरीला मोठी मागणी आहे़ 
दरवर्षी बाजारात विंटर, एस़ए़ कॅमेर ओझा, नादीला, आर २, आर १, तसेच स्वीट चार्ली या स्ट्रॉबेरीची आवक होत आहे़ स्ट्रॉबेरीचा हंगाम गेल्या दोन महिन्यांपासून सुरू झाला असून सध्या हंगाम बहरला आहे़ अजून दोन ते अडीच महिने हंगाम सुरू राहील, असे मोरे यांनी सांगितले़.

सफरचंद : एका पेटीमागे ५० रुपयांची वाढ
काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टी सुरू झाल्याने मार्केट यार्डातील फळ बाजारात सफरचंदाची आवक घटली आहे. परिणामी, सफरचंदाच्या पेटीमागे ५० रुपयांनी वाढ झाली आहे, तर थंडीमुळे आवक वाढल्याने पेरू व बोरांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी घट झाली. लिंबाचे दर २० टक्क्यांनी वधारले असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. दरम्यान, डाळिंबाची आवक घटली असून दर स्थिर आहेत. 

मार्गशीर्ष संपल्याने फुलांच्या मागणीत घट
मार्गशीर्ष व लग्नाच्या भरपूर मुहूर्तामुळे गेले महिनाभर फुलांना चांगली मागणी होती. परंतु मागशीर्ष संपल्यामुळे फुलबाजारात फुलांना मागणी घटली आहे. त्यामुळे फुलांचे भाव तीस ते चाळीस टक्क्यांनी घसरले आहेत. सध्या मार्केट याडार्तील फुल बाजारात जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात फुलांची आवक होत आहे. मात्र, मागणीअभावी हीच परिस्थिती काही दिवस कायम राहील, अशी शक्यता व्यापारी सागर भोसले यांनी व्यक्त केली.