SSC Result 2019 : सलाम कराव्यात अशा तीन संघर्षकथा !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 07:25 PM2019-06-08T19:25:24+5:302019-06-08T19:27:37+5:30

शहरातील पूना नाईट हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजच्या ९ मुलांनी दहावीचा गड सर केला असून शाळेचा निकाल ५३ टक्के लागला आहे. यंदा परीक्षेला १७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

SSC Result 2019: Salute three students for their success | SSC Result 2019 : सलाम कराव्यात अशा तीन संघर्षकथा !

SSC Result 2019 : सलाम कराव्यात अशा तीन संघर्षकथा !

Next

पुणे : शहरातील पूना नाईट हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजच्या ९ मुलांनी दहावीचा गड सर केला असून शाळेचा निकाल ५३ टक्के लागला आहे. यंदा परीक्षेला १७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.या शाळेतील विद्यार्थी दिवसभर काम करून शिक्षण घेतात. त्यामुळे त्यांच्या यशाकडे टक्केवारीच्या चष्म्यातून न बघता कष्ट आणि जिद्दीच्या दृष्टिकोनाने बघितले जाते. या नऊ विद्यार्थ्यांनी केलेला संघर्ष सलाम करावा असा आहे. '

यंदा प्रथम आलेल्या पवन अंबादास गोरंटला याने ६३. ८० टक्के गुण मिळवले आहेत. मूळ सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट गावचे त्याचे कुटुंबीय आमच्या शोधासाठी तीन वर्षांपूर्वी पुण्यात आले. तो दिवसभर  शहरातील एका टेलरिंग दुकानात शर्टांना काजे बटण बसवण्याचे काम करतो. या कामाचे त्याचे एका शर्टमागे पाच रुपये मिळतात. त्या पैशांतून तो कुटुंबाला हातभार लावतो.  त्याचे वडील टेलर आहेत. भविष्यात वाणिज्य शाखेत शिक्षण घेण्याचा त्याचा मानस आहे. तो म्हणतो, 'शिक्षणाची संधी कधीही संपलेली नसते. या नाही तर पुढच्या वर्षी पण प्रत्येकाने शिक्षण घ्यायला हवे. शिक्षणाने आयुष्याची प्रगती होतेच,           

याच शाळेतून दुसऱ्या क्रमांकावर उत्तीर्ण झालेल्या सिद्धेनाथ हजारे हा एका उपाहारगृहात वेटरची नोकरी करतो. मुळगाव नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असलेल्या सिद्धनाथच्या घरी कोणीही शिक्षीत नाहीत. मात्र शिकून कुटुंबाला पुढे न्यायचेच असा निश्चय केलेल्या त्याने दिवसभर काम करून रात्र शाळेत शिक्षण घेतले. महिन्याला आठ हजार रुपये इतका पगार त्याला मिळतो. पण त्यातले अवघे काही रुपये स्वतःजवळ ठेवत तो ती रक्कम कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पाठवतो. तो म्हणाला की, 'ही तर सुरुवात आहे. मला कुटुंबाला पुढे नेण्यासाठी शिक्षण घ्यायचे आहेच पण देशासाठी भविष्यात पोलीस किंवा सैन्यात जायचे आहे. 

या शाळेत महिला विद्यार्थिनी असून उषाबाई जगताप यांनी या वर्षी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. सकाळी एका स्नॅक्स सेंटरमध्ये काम करून त्या दिवसभर टेलरिंग काम करतात. त्यांचा मुलगा १० वर्षांचा असून त्याला शिकवता यावे, अभ्यास घेता यावा याकरिता त्यांनी शाळेत प्रवेश घेण्याचा निश्चय केला. आता त्या पुढेही शिक्षण घेणार असून स्वतःच्या पायावर सन्मानाने उभं राहण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्या म्हणाल्या की, 'उशीरा का होईना पण मुलींनी शिकायला हवे. तुमच्या मुलांचे पालक म्हणून तरी तुम्हाला शिक्षण घेणे आवश्यक आहे. ते काय करतात, कसा अभ्यास करतात हे समजून घेण्यासाठी मी शिक्षण घेतले'. 

Web Title: SSC Result 2019: Salute three students for their success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.