Smart City wants 'Silent City' pair - Sanjay Raut | स्मार्ट सिटीला हवी ‘सायलेंट सिटी’ची जोड - संजय राऊत

आपले शहर केवळ स्मार्ट नसावे, ते वाहतुकीच्या दृष्टीनेदेखील खूपच सुसह्य असले पाहिजे. शहरात अनेकदा गरज नसताना हॉर्नचा वापर केला जातो; मात्र हॉर्न वापरायची गरजच नाही. कदाचित, हे वाचून आश्चर्य वाटेल; पण मी स्वत: ७ वर्षांपासून एकदाही हॉर्न वापरलेला नाही. हे शक्य आहे. त्यामुळे ध्वनिप्रदूषण होत नाहीच; शिवाय अनेक मानसिक आणि शारीरिक धोकेदेखील आपण दूर ठेवू शकतो. नो हॉर्न हे अभियान या महिन्यापासून राज्यासह शहरातही राबविण्यात येत आहे. शाळा, महाविद्यालये, वाहनचालक अशा सर्वांच्याच सहभागातून हा उपक्रम पुढे नेणार असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाचे उपायुक्त संजय राऊत यांनी सांगितले.

सर्वच महानगरांमध्ये वाहनांची संख्या दिवसेन् दिवस वाढत आहे. पुण्यासारख्या शहरात तर वाहनांची संख्या वाढण्याचा वेग कितीतरी अधिक आहे. साहजिकच, हॉर्नचा वापरदेखील त्या पटीत वाढला आहे. अनेकदा तर काहीही गरज नसतानादेखील हॉर्नचा वापर करण्याची प्रवृत्ती दिसून येते. त्यामुळे एक प्रकारचा गोंगाट सदैव रस्त्यावर दिसून येतो. याचा अनेकदा त्रासदेखील होतो; मात्र त्याचे कोणालाच काही वाटत नाही. अनेकदा सिग्नल सुटण्याच्या काही सेकंद आधी अथवा एखाद्या कारणामुळे थोडी जरी वाहनांची कोंडी झाली, की चालक हॉर्नवर हॉर्न वाजायला लागतात.
गोंगाट, कोंडी सोडविण्यासाठी आता ‘नो हॉर्न, नको हॉर्न तसेच स्मार्ट सिटी-सायलेंट सिटी-पुणे सिटी’ अशी विविध घोषवाक्ये घेऊन प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) रस्त्यावर उतरणार आहे. वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने ही मोहीम उघडण्यात येणार आहे. याची सुरुवात आरटीओ कार्यालयाने स्वत:पासून केली आहे. शिकाऊ वाहन परवाना काढण्यासाठी येणाºया व्यक्तींनादेखील याबाबत सांगितले जात आहे. तसेच, ‘आम्ही पुणेकर, करणार नाही हॉर्नचा वापर’ असे फलकदेखील लावण्यात आले आहेत. नो हॉर्नची शपथ नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालक यांना देण्यात येत आहे.
हॉर्नमुळे ध्वनिप्रदूषण होतेच; मात्र ध्वनिप्रदूषणामुळे मानसिक ताण, उच्च रक्तदाब, हृदयरोग, कायमचा बहिरेपणा, वृद्ध, बालक आणि रुग्णांमध्येदेखील घबराट निर्माण होत आहे. याशिवाय, वाहनचालकांनादेखील त्याचा त्रास होऊन अपघाताचा धोका वाढतो. अशा गोंगाटी वातावरणात अपघातसदृश स्थिती निर्माण होऊ शकते. मानसिक नैराश्यदेखील त्यामुळे येते. एखाद्या वाहनचालकाने अचानक जोरजोराने हॉर्न वाजविल्यास गडबडून जायला होते. याचा अनुभव प्रत्येकाने घेतला असेल. अशा गडबडीत अपघाताची शक्यता नक्कीच वाढते. मात्र, हॉर्न न वाजविल्यामुळे आपली वाहतूकदेखील सुरक्षित होते, वेगावरदेखील नियंत्रण ठेवता येते, यामुळे प्रवासही आनंददायी होतो... असे फायदे आणि तोटे या दोन्ही गोष्टी नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. विविध शाळा आणि महाविद्यालयांत जाऊन त्याबाबत जागृती करण्यात येणार आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याचे वाहनचालक आहेत. त्यांनाच ध्वनिप्रदूषणाचे धोके समजावल्यास हॉर्नचा वापर कमी होईल. वाहनचालकांनादेखील हॉर्न न वाजविण्याबाबत शपथ देणार आहे.
अनेकांना असे वाटू शकते, की हॉर्न अगदीच न वाजविणे शक्य आहे का? माझा स्वत:चा अनुभव ‘होय, असे शक्य आहे,’ हाच आहे. सात वर्षांपासून मी एकदाही हॉर्न वाजविलेला नाही. माझे कुटुंबीयदेखील त्याचे पालन करतात. नवी मुंबईत कार्यरत असताना तेथे विनायक जोशी यांचे व्याख्यान ऐकले. त्या वेळी ते म्हणाले होते, ‘मी ३ वर्षे हॉर्न वाजविलेला नाही.’ तसेच, त्याचे दुष्परिणामदेखील त्यांनी मला सांगितले. त्या वेळी मी त्यांना ‘करून पाहतो,’ असे उत्तर दिले. त्यानंतर सुरुवातीचे काही दिवस त्रास झाला; मात्र ३ दिवसांनंतर त्याची सवय होते. माझ्या बाबतीत असे घडू शकते, तर इतरांनादेखील हे जमू शकेल.
पुणेकरांनीदेखील यात सहभागी व्हावे, यासाठी हे अभियान राबविण्यात येणार आहे. स्मार्ट सिटीप्रमाणेच ‘सायलेंट सिटी’ हे ब्रीद घेऊन आपण पुढे जाऊ, असा संदेश या माध्यमातून दिला जाईल. ‘स्मार्ट सिटी, सायलेंट सिटी, पुणे सिटी’ असे फलक लावले जातील. तसेच, ‘क्या आपको हॉर्न की बीमारी है’, ‘नो हॉर्न इज रोड सेफ्टी’, ‘नो हॉर्न प्लीज डीअर’ अशी घोषवाक्येदेखील बनविण्यात आली आहेत. तसेच, गव्यासारखी मोठी शिंगे असलेल्या विविध प्राण्यांचा वापर करून ‘हॉर्न (शिंग)ची गरज आम्हाला आहे, तुम्हाला नाही’ अशी बिडंबनात्मक पोस्टरदेखील तयार करण्यात आली आहेत. त्याद्वारे वाहनचालक, विद्यार्थी यांना आवाहन केले जाईल. राज्यासह शहरातदेखील या उपक्रमाची सुरुवात झाली असून, एक अभियान म्हणून हा उपक्रम राबविण्यात येईल.