‘स्मार्ट सिटी’ची सायकल ५ डिसेंबरला रस्त्यावर; महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 04:28 PM2017-12-02T16:28:27+5:302017-12-02T16:41:55+5:30

स्मार्ट सिटी कंपनीच्या सायकल शेअरिंग योजनेला ५ डिसेंबरला (मंगळवार) सकाळी साडेदहा वाजता महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते सुरूवात होत आहे.

'Smart City' cycle on the road on 5th December; Mayor Mukta Tilak to inaugurate | ‘स्मार्ट सिटी’ची सायकल ५ डिसेंबरला रस्त्यावर; महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते सुरूवात

‘स्मार्ट सिटी’ची सायकल ५ डिसेंबरला रस्त्यावर; महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते सुरूवात

Next
ठळक मुद्देकंपनीच्या औंध-बाणेर-बालेवाडी या विशेष क्षेत्रापुरतीच राबवण्यात येणार योजना सायकल वापरासाठी अ‍ॅप्लिकेशन घ्यावे लागेल, नावाची नोंद झाली की वापरता येईल सायकल

पुणे : स्मार्ट सिटी कंपनीच्या सायकल शेअरिंग योजनेला ५ डिसेंबरला (मंगळवार) सकाळी साडेदहा वाजता महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते सुरूवात होत आहे. कंपनीच्या औंध-बाणेर-बालेवाडी या विशेष क्षेत्रापुरतीच ही योजना राबवण्यात येत असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही ही योजना राबवण्यात येणार आहे.
पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी ही माहिती दिली. जगातील बहुतेक मोठ्या शहरांमध्ये आता पर्यावरण संवर्धन तसेच व्यायाम यासाठी सायकल चालवण्याला प्राधान्य दिले जाते. त्यामुळेच ही योजना पथदर्शी स्वरूपात राबवण्यात येत आहे. एका कंपनीने त्याची जबाबदारी घेण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे त्या कंपनीला तीन महिन्यांसाठी त्यांच्या सायकलींसह हा प्रकल्प ट्रायल बेसिसवर राबवण्यास सांगण्यात आले आहे. वाहतूक शाखा, महापालिका यांची यासाठी विशेष परवानगी घेण्यात आली आहे.
सायकल कंपनीचे प्रतिनिधीही यावेळी उपस्थित होते. ३०० सायकली स्मार्ट सिटीच्या विशेष क्षेत्रात वापरता येतील. या सर्व सायकली अत्याधुनिक आहेत. सायकल वापरासाठी एक अ‍ॅप्लिकेशन मोबाईलवर घ्यावे लागेल. नावाची नोंद झाली की मग सायकल वापरता येईल. तीची लॉकिंग सिस्टिमही अत्याधुनिक आहे. सायकल वापराचा पहिला अर्धा तास किरकोळ शुल्क असेल. त्यानंतरच्या प्रत्येक तासासाठी वेगवेगळे शुल्क आकारले जाईल. सायकल कुठेही सोडली तरी तिच्यावर असलेल्या जीपीएस सिस्टीममुळे ती कुठे आहे ते लगेच समजेल. कंपनीचे प्रतिनिधी ती जमा करून घेतील किंवा तिथल्यास दुसऱ्या वापरकर्त्याला देतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
स्मार्ट सिटी कंपनीने विशेष क्षेत्रात सध्या दीड किलोमीटर अंतराचा पादचारी मार्ग विकसीत केला आहे. तिथेच सायकल ट्रॅक तयार करण्यात आला आहे. त्याशिवाय विशेष क्षेत्रात आणखी काही किलोमीटर अंतराचे सायकल ट्रॅक तयार करण्यात येत आहेत. प्रदुषण कमी करण्याचा हा अत्यंत चांगला उपाय आहे. त्यामुळे पुणे महापालिकाही ही योजना राबवत असेल तर त्यांना स्मार्ट सिटी कंपनीचे सहकार्य असेल असे जगताप म्हणाले. सायकलचा वापर वाढाला, जवळच्या कामांसाठी सायकल वापरता येणे शक्य  आहे असे जगताप म्हणाले.
महापालिका संपूर्ण पुणे शहरात ही योजना राबवणार असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे. स्मार्ट सिटी कंपनीचा हा प्रकल्प आदर्श व पथदर्शी असेल असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला. सायकलींचे शहर ही एकेकाळी पुण्याची ओळख होती. मधल्या काळात ती ओळख पुसून गेली. पर्यावरण संवर्धनासाठी त्याचा चांगला उपयोग होईल व पुण्याला पुन्हा जूनी ओळख मिळेल असे जगताप म्हणाले. महापौरांच्या हस्ते येत्या मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता विद्यापीठात या योजनेची सुरूवात करण्यात येणार आहे.

 

सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा परिसर बराच मोठा आहे. सततच्या वाहनांच्या गर्दी व धुरामुळे तो प्रदुषित होत चालला आहे. त्यासाठीच विद्यापीठाला ‘नो व्हेईकल झोन’चा प्रस्ताव दिला आहे. यात विद्यापीठात एकही स्वयंचलित वाहन आणायचे नाही, अंतर्गत सर्व परिसर सर्वांनीच फक्त सायकलवर फिरायचा असा विचार आहे. प्राथमिक चर्चा झाली आहे, मान्यता मिळाल्यास हा प्रकल्प तिथे राबवू.
- राजेंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी कंपनी

Web Title: 'Smart City' cycle on the road on 5th December; Mayor Mukta Tilak to inaugurate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे