‘आधार’चा संथ कारभार; पुणे-पिंपरीसह जिल्ह्यातील नागरिकांची होतेय ससेहोलपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 04:41 PM2017-11-02T16:41:41+5:302017-11-02T16:46:54+5:30

पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्याची लोकसंख्या पाहता मोठ्या प्रमाणावर आधार कार्ड नोंदणी केंद्र सुरु करणे आवश्यक आहे. मात्र, सध्या तुरळक ठिकाणीच आधार कार्ड नोंदणी केंद्र सुरु आहेत. 

Slow work of 'Aadhaar'; People from the district including Pune - Pimpri | ‘आधार’चा संथ कारभार; पुणे-पिंपरीसह जिल्ह्यातील नागरिकांची होतेय ससेहोलपट

‘आधार’चा संथ कारभार; पुणे-पिंपरीसह जिल्ह्यातील नागरिकांची होतेय ससेहोलपट

Next
ठळक मुद्देशहरात आणि जिल्ह्यात उपलब्ध नाहीत पुरेशी आधार केंद्र नोंदणी अथवा अद्ययावतीकरणासाठी नागरिकांना थांबावे लागते पाच ते सहा ताससॉफ्टवेअरमध्ये बदल करण्याचे काम सुरू असल्याचे कारण देत महाआॅनलाईनचे काम संथ

पुणे : प्राप्तिकर कर भरायचाय?... बँकेचे व्यवहार करायचेत?... रेशन हवे आहे?... शाळेत प्रवेश हवा आहे?... आॅनलाईन सातबारा हवाय?... मालमत्ता पत्रक हवेय?... कर्जमाफी हवीय?... मग द्या आधार कार्ड. राज्य आणि केंद्र शासनाने आधार कार्ड लिंक करण्याच्या सक्तीचा एकीकडे सपाटा लावला आहे. तर दुसरीकडे शहरात आणि जिल्ह्यात पुरेशी आधार केंद्रच उपलब्ध नाहीत. बोकाळलेला भ्रष्टाचार आणि नागरिकांची ससेहोलपट याकडे जिल्हा प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत आहे. ढिलावलेल्या जिल्हा प्रशासनाचे अतिवरीष्ठ अधिकारी डोळ्यावर कातडे ओढून बसले असून राज्य शासनाकडे बोट दाखवून स्वत:ची जबाबदारी झटकण्याचे प्रकार सध्या सुरु आहेत. 
पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्याची लोकसंख्या पाहता मोठ्या प्रमाणावर आधार कार्ड नोंदणी केंद्र सुरु करणे आवश्यक आहे. मात्र, सध्या तुरळक ठिकाणीच आधार कार्ड नोंदणी केंद्र सुरु आहेत. 
टपाल खाते आणि बँकांना आधार केंद्र सुरु करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. सध्या टपाल खात्याकडून दोन ठिकाणी केंद्र सुरु असून विविध बँकांच्या २२ शाखांमध्ये आधार नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे. या ठिकाणांवर दिवसभरात अवघे दहा ते बारा नागरिकांचीच नोंदणी अथवा अद्ययावतीकरणाची कामे होतात. नागरिकांना पाच ते सहा तास या कामासाठी थांबावे लागते. टोकन घेऊन नागरिकाचा नंबर लागेपर्यंत जवळपास तीन ते चार तासाचा कालावधी जातो. केंद्रावरील मशीनवर नागरिकांच्या हातांचे ठसेच उमटत नाहीत, तर अनेकदा डोळ्यांचा रेटीना व्यवस्थित येत नाही अशी कारणे देऊन नागरिकांना वाटेला लावले जाते. काही दिवसांनी पुन्हा नागरिकांना या आधार केंद्रांवर खेटे मारावे लागतात. याबाबत संबंधित अधिकार्‍यांकडे विचारणा केल्यावर नागरिकांना आधारची वेबसाईट बघा, त्यावर केंद्रांची यादी टाकण्यात आलेली आहे मोघम उत्तरे दिली जात आहेत. 
दोन-तीन महिन्यांपूर्वी आधार नोंदणीचे नोंदणीचे काम चार कंपन्यांकडून काढून घेण्यात आले होते. त्यानंतर हे काम महाआॅनलाईनला देण्यात आले आहे. महाआॅनलाईनकडूनही कामाच्या बाबतीत चालढकल करण्यात येत असल्याचे चित्र सध्या निर्माण झालेले आहे. आधार नोंदणीच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्याचे काम सुरू असल्याचे कारण देत आधार नोंदणीचे काम संथ गतीने सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.
ऐन दिवाळीच्या काळात आधार कार्ड न दिलेल्या रेशन ग्राहकांना रेशन न देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, जिल्ह्यात केवळ ३९ टक्केच आधार जोडणी झालेली असल्याने ग्राहकांना त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवीत माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर प्रशासनाने हा निर्णय मागे घेतला होता. 
जिल्ह्यासह पुणे आणि पिंपरी महापालिका क्षेत्रात आधार केंद्रांची संख्या, मशीन्स यांची संख्या कमी आहे. जिल्हा प्रशासनाकडून आधार केंद्रे पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यापूर्वी काम केलेल्या खासगी कंपन्यांना शासकीय कार्यालयांमध्ये येऊन आधार नोंदणी व दुरुस्तीची कामे करण्यास परवानगी द्यावी असा प्रस्ताव युनिक आयडेंटीफिकेशन अ‍ॅथोरिटी आॅफ इंडियाला (युआयडी) जिल्हाधिकार्‍यांकडून देण्यात आला होता. पुरेशा आधार केंद्रांअभावी नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे दोन्ही महापालिकांच्या क्षेत्रिय कार्यालयांसह जिल्ह्यातील मंडल स्तरावर आधार केंद्र सुरु करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याचेही प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. 

Web Title: Slow work of 'Aadhaar'; People from the district including Pune - Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.