साडे सहा लाख भरले पण चौदा कोटींचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 12:59 PM2018-10-24T12:59:50+5:302018-10-24T13:03:15+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मैदान भाडयाने देताना झालेल्या बेकायदेशीर प्रक्रियेमुळे १४ कोटी ४० लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे ‘लोकमत’ने सोमवारी उजेडात आणले.

Six and half lacs paid but what about 14 crores ? | साडे सहा लाख भरले पण चौदा कोटींचे काय?

साडे सहा लाख भरले पण चौदा कोटींचे काय?

Next
ठळक मुद्देचित्रपट सेट बेकायदेशीरपणे भाडयाने : सर्वच रक्कमेच्या वसुलीची मागणी दीपक जाधव  चित्रपटाच्या शुटींगसाठी विद्यापीठाचे मैदान नोव्हेंबर २०१७ मध्ये ४५ दिवसांसाठी भाडयाने चित्रपटाचा संपूर्ण सेट मैदानामधून हलविण्यासाठी ८ महिन्यांचा कालावधी उच्च शिक्षण विभागाकडून नाही कारवाईयाप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी होते दिले

दीपक जाधव 
पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाचे मैदान भाडयाने देताना झालेल्या बेकायदेशीर प्रक्रियेमुळे १४ कोटी ४० लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे ‘लोकमत’ने सोमवारी उजेडात आणले. त्यानंतर विद्यापीठ प्रशासन खडबडून जागे झाले असून त्यांनी चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याकडून करारानुसार ठरलेल्या साडे सहा लाख रूपयांची मंगळवारी वसुली केली. मात्र नियमबाहय पध्दतीने सुट बुडलेले १४ कोटी ४० लाख रूपयांचीही तातडीने वसुली करण्याची मागणी विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली आहे. 
चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी त्यांच्या चित्रपटाच्या शुटींगसाठी नोव्हेंबर २०१७ मध्ये ४५ दिवसांसाठी विद्यापीठाचे मैदान भाडयाने घेतले होते. मात्र निर्धारित मुदतीमध्ये त्यांच्या शुटींगचे काम पूर्ण झाले नाही. चित्रपटाचा संपूर्ण सेट मैदानामधून हलविण्यासाठी ८ महिन्यांचा कालावधी लागला. त्यापोटी विद्यापीठाकडे किती रूपयांचे भाडे जमा झाले याची लेखी माहिती सिनेट सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे मागितली होती. त्यातून नागराज मंजुळे यांच्याकडून विद्यापीठाने कोणतेही भाडे घेतले नसल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. नागराज मंजुळेंनी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर साडे सहा लाख रूपये खर्च करावेत अशी अजब अट टाकून विद्यापीठाने मंजुळेंना कोटयावधी रूपयांच्या भाडयाची सवलत दिली होती. यामध्ये विद्यापीठाला भाडयाचा एक रूपयाही मिळाला नाही. आणखी धक्कादायक म्हणजे नागराज मंजुळे यांनी मैदान खाली करून ६ महिने उलटल्यानंतरही करारानुसार हे साडे सहा लाख रूपयेही शिष्यवृत्तींवर खर्च केले नव्हते. चित्रपटाच्या शुटींगसाठी मैदान भाडयाने देताना कुलगुरूंच्या विशेषाधिकाराचा गैरवापर होऊन कोटयावधी रूपयांचे भाडे माफ करण्यात आल्याचे ‘लोकमत’ने उजेडात आणल्यानंतर मंजुळे यांनी मंगळवारी साडे सहा लाख रूपयांचा धनादेश जमा केला आहे. प्रभारी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
.................
उच्च शिक्षण विभागाकडून नाही कारवाई
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मैदान नियम डावलून भाडयाने देण्यात आल्याचे उजेडात आल्यानंतर याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी दिले होते. मात्र उच्च शिक्षण विभागाने विद्यापीठाकडून खुलासा मागविण्यापलीकडे कोणतीही कारवाई केली नाही. कुलगुरूंना त्यांच्या अधिकरामध्ये कोटयावधी रूपयांचे भाडे माफ करता येते का, व्यवस्थापन परिषदेला याबाबत विश्वासात घेण्यात आले होते का, जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव तयार केला होता त्याचे पुढे काय झाले, विद्यापीठाच्या कुलपतींची या करारासाठी परवानगी घेण्यात आली होती का असे अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहेत. मात्र उच्च शिक्षण विभागाकडून याबाबत पुढे काहीच कारवाई करण्यात आली नाही.
..............................
करारातील या तरतुदीचेही झाले नाही पालन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासन व नागराज मंजुळेंचे आटपाट प्रोडक्शन यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या प्रक्रियेत विद्यापीठातील माध्यम व संज्ञापन अभ्यास विभाग  व ललित कला केंद्र  व इतर विभागाच्या विद्यार्थ्यांना चित्रीकरणाचा अनुभव घेता येणार होता करारातील या तरतुदींचेही पालन झालेले नाही. आटपाट संस्थेने ८ महिने विद्यापीठाचे मैदान तर वापरले आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण नागपूर येथे सुरू आहे, करारात ठरल्यानुसार आटपाट संस्थेने विद्यार्थ्यांना नागपूरला नेऊन चित्रीकरणाचा अनुभव द्यावा अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली आहे.

Web Title: Six and half lacs paid but what about 14 crores ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.