‘शोले’चा शेवटही झाला होता ‘सेन्सॉर’; रमेश सिप्पी यांचा ‘पिफ’मध्ये गौप्यस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 04:34 PM2018-01-12T16:34:54+5:302018-01-12T16:40:02+5:30

हात नसलेला ठाकूर पायाने गब्बरला कसा काय मारू शकतो? असा प्रश्न उपस्थित करीत ‘शोले’ चित्रपटाचा शेवट बदलायला भाग पाडले, असा गौप्यस्फोट करीत दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी ‘सेन्सॉर’ ही खूप मोठी समस्या आहे’ अशा शब्दांत सेन्सॉर बोर्डावर टीका केली.

'Sholay's end was 'sensor'; Ramesh Sippy's, Revelation in 'PIFF' | ‘शोले’चा शेवटही झाला होता ‘सेन्सॉर’; रमेश सिप्पी यांचा ‘पिफ’मध्ये गौप्यस्फोट

‘शोले’चा शेवटही झाला होता ‘सेन्सॉर’; रमेश सिप्पी यांचा ‘पिफ’मध्ये गौप्यस्फोट

Next
ठळक मुद्देसेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाविरूद्ध दिग्दर्शक नक्कीच लढा देऊ शकतात : रमेश सिप्पी''‘पॅशन'’ हा चित्रपट निर्मितीचा महत्त्वपूर्ण घटक'

पुणे :  ‘शोले’ चित्रपटाचा शेवट एका वेगळ्या दृष्टीकोनातून केला होता. सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट पाहिल्यानंतर खूपच हिंसा दाखविण्यात आली आहे. हात नसलेला ठाकूर पायाने गब्बरला कसा काय मारू शकतो? असा प्रश्न उपस्थित करीत चित्रपटाचा शेवट बदलायला भाग पाडले. त्यांनी सूचविलेल्या शेवटाने आम्ही फारसे आनंदी नव्हतो.. पण आम्हाला ते करावे लागले...असा गौप्यस्फोट करीत ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी करीत ‘सेन्सॉर’ ही खूप मोठी समस्या आहे’ अशा शब्दांत सेन्सॉर बोर्डावर टीका केली.
पिफमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पिफ फोरममधील राज कपूर पॅव्हेलियन मंचाचे उद्घाटन रणधीर कपूर, राजीव कपूर, ऋषी कपूर तसेच रमेश सिप्पी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पिफचे संयोजक डॉ. जब्बार पटेल यांनी सिप्पी यांची मुलाखत घेतली, त्या वेळी ते बोलत होते. भारतीय चित्रपटसृष्टीत ‘शोले’ या चित्रपटाने इतिहास रचत रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. आजही या चित्रपटाचे रसिकमनावर गारूड कायम आहे. ‘अरे ओ सांबा कितने आदमी थे, ये हाथ मुझे दे दे ठाकूर’ हे गब्बरचे संवाद त्याच अमजद खान यांच्या खर्ज्यातील आवाजात सादर करीत शोलेची आठवण ताजी केली. सलीम-जावेद यांनी लिहिलेले गब्बरच्या तोंडचे संवाद पाहिले तर खूप साधे आहेत पण त्याला काहीसा उत्तर प्रदेशीय भाषा आणि लय यामुळे हे संवाद खूपच प्रभावी वाटले आहेत. कथानक, वातावरण, ड्रामा याला कुठेही धक्का न लावताही दिग्दर्शकाला अनेक वेगळे प्रयोग चित्रपटामधून करता येऊ शकतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे  ‘शोले’. जे प्रेक्षकांनी पूर्वी कधी पाहिले नाही ते तंत्रज्ञानाच्या माध्यमातून चित्रपटात दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतु एका वेगळ्या दृष्टीकोनातून बनविलेल्या चित्रपटाचा शेवट बदलला जाणे ही दिग्दर्शकासाठी निराशेची गोष्ट असते. त्याचा सामना मला करावा लागला आहे. त्यामुळे सेन्सॉरशीप लादली जाण्याची बाब काही नवीन नाही. सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाविरूद्ध दिग्दर्शक नक्कीच लढा देऊ शकतात. मात्र एक गोष्ट नक्कीच आहे की चित्रपटातून हिंसेचे उदात्तीकरण करण्यात आलेले सगळेच चित्रपट बॉक्स आॅफिसवर यशस्वी ठरतातच असेही नाही. पण दिग्दर्शकाने आपले काम चोखपणे करीत राहाणे हाच त्यावरचा उत्तम पर्याय आहे, असा सल्ला त्यांनी नवोदित दिग्दर्शकांना दिला. मला चित्रपट बनविण्याची कधीच भीती वाटत नाही. दिग्दर्शकाला चित्रपटामधून जे मांडायचे आहे ते त्याने मांडले पाहिजे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 
‘पॅशन’ हा चित्रपट निर्मितीचा महत्त्वपूर्ण घटक आहे. मी स्वत: चित्रपट बनविण्याचे रितसर प्रशिक्षण घेतलेले नाही. लहानपणी वडिलांच्या चित्रपट सेटवर जायचो. पडद्यामागे घडणाऱ्या गोष्टी, लाईटस, कॅमेरा, अभिनय या सर्व गोष्टा जवळून अनुभवल्या. याच वातावरणात लहानाचा मोठा झालो. पॅशन असल्याशिवाय चित्रपट निर्मितीचा भाग होता येणे शक्य नाही. त्याकाळाच्या तुलनेत आज नवीन पिढीला चित्रपट निर्मितीच्या वेगवेगळ्या घटकांचे प्रशिक्षण घेण्याची अनेक व्यासपीठ खुली झाली आहेत. चित्रपट म्हणजे कथानक सांगण्याचा प्रकार असतो. ते कथानक प्रेक्षकांना कसे भावेल त्यासाठी त्यामध्ये कोणत्या गोष्टींचा वापर करता येईल तो कसा घडविता येईल या गोष्टींचे आकलन प्रशिक्षणाच्या माध्यमातून सहजसोप्या पद्धतीने होऊ शकते असे सांगत प्रशिक्षण महत्वपूर्ण असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली.

Web Title: 'Sholay's end was 'sensor'; Ramesh Sippy's, Revelation in 'PIFF'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.