Shocking ! Death of old age in attack of decoity | धक्कादायक ! दराे़डेखाेऱ्यांच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू
धक्कादायक ! दराे़डेखाेऱ्यांच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू

मंचर :  पारगाव-शिंगवे (ता.आंबेगाव) येथे दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात एका वृध्दाचा मृत्यू झाला तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. हल्ल्यानंतर दरोडेखोरांनी घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे ९० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना आज पहाटे दोनच्या सुमारास घडली.  

कुशाभाऊ पिराजी लोखंडे (वय ७४) असे ठार झालेल्या वृध्दाचे नाव आहे. तर सुमन कुशाभाऊ लोखंडे (वय ६२) असे त्या जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,  आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील  पारगाव (शिंगवे) येथील मळ्यामध्ये शेतकरी कुशाभाऊ पिराजी लोखंडे त्यांच्या कुटुंबीयांसमवेत राहतात. त्यांचा मुलगा सुभाष लोखंडे हा कामानिमित्त ठाणे येथे गेला होता. पहाटे दोनच्या सुमारास घरातील कौले काढून पाच ते सहा दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. झोपेत असलेल्या सुमन लोखंडे यांच्यावर कुऱ्हाडीने वार केला त्या ओरड्यामुळे  कुशाभाऊ लोखंडे यांना जाग आली. त्यांनी दरोडेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्यावर दरोडेखोरांनी त्यांच्या मानेवर व छातीवर लोखंडी शस्त्राने वार केला. त्यात ते रक्ताच्या थारोळ्यात बेशुध्द झाले. त्यानंतर पुन्हा सुमन यांच्याकडे दरोडेखोरांनी मोर्चा वळविला आणि त्यांच्या कानातीर सोन्याच्या कुड्या घेण्यासाठी त्यांचे कान अक्षरश: ओरबडले. त्यांंच्या कानाच्या पाळ्या फाटल्या. सुमन यांना मारहाण केल्याने त्यांचा डावा हात फॅक्चर झाला आहे. त्यानंतर दरोडेखोरांनी कपाटातील तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि काही रोख रक्कम असा एकुण ९० हजार रुपयांचा ऐवज चोरुन पळून गेले. त्यानंतर सुमन यांनी आराडा ओरड केली. त्यामुळे शेजारी राहणारे  चंद्रकांत लोखंडे ,काळुराम लोखंडे आणि इतर काही  ग्रामस्थ मदतीसाठी धावले.

त्यावेळी कुशाबा लोखंडे हे कॉटवर तर सुमन लोखंडे आतल्या घरात रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या दिसल्या. दोघांनाही त्यांनी तातडीने  पारगाव येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी अमित काटे यांच्या रुग्णवाहिकेतुन मंचर येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय उपचारापुर्वीच कुशाबा लोखंडे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.  सुमन लोखंडे यांच्यावर उपचार सुरु आहेत. 


दरम्यान घटनास्थळी  अप्पर पोलिस अधिक्षक संदीप जाधव, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे, पोलिस निरीक्षक प्रदीप जाधव, गुन्हा अन्वेशन विभागाचे रविंद्र मांजरे,  सोमनाथ पांचाळ यांनी भेट दिली. दरोडेखोरांची चप्पल घटनास्थळी सापडली,पोलिसांच्या श्वानपथकाला बोलविले मात्रसुमारे अडीच किमी लांब निरगुडसर ते पारगाव शिवेपर्यंत श्वान गेले व तेथेच घुटमळत राहिले. तेथून पुढे  दरोडेखोर वाहनातून पळून गेल्याचा अंदाज श्वानपथक प्रमुख एस.डी.रोकडे यांनी व्यक्त केला.

लोखंडे यांच्या घराशेजारी कांताराम ढोबळे यांच्या घरावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे काहीच हाती लागले नाही त्यामुळे केवळ घरातील साड्या घेऊन दरोडेखोर पसार झाले. जाता जाता निरगुडसर गावाच्या हद्दीतील कार, वस्तीवर संतोष बाबुराव टाव्हरे यांची दुचाकी मोटार सायकल त्यांनी पळविली. या तिन्ही घटना एकमेकांशी संबंधीतआहेत काय याबाबत पोलिस तपास करीत आहेत. खून करून दरोडा टाकल्याच्या प्रकरणामुळे परिसरात भिती पसरली आहे.

दाेन दिवसात पाेलीस चाैकी सुरु करु 
आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागात पोलिस चौकी सुरु करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. आज घडलेल्या दरोड्याच्या प्रकारानंतर हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.  जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांनी पारगाव येथे घटनास्थळी दिल्यावर त्यांनी अप्पर पोलिस अधिक्षक संदीप जाधव यांच्याकडे पारगाव येथे औट पोलिस चौकी उभारावी अशी मागणी केली .येत्या दोन दिवसात येथे पोलिस चौकी सुरु करुन एक पोलिस अधिकारी आणि दोन पोलिस कर्मचारी उपलब्ध करुन दिले जातील .अशी ग्वाही अप्पर पोलिस अधिक्षक जाधव यांनी दिली.


Web Title: Shocking ! Death of old age in attack of decoity
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.