शिवरकर उद्यानातील खेळणी बुडाली अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 03:18 AM2018-12-10T03:18:18+5:302018-12-10T03:18:43+5:30

उद्यानाच्या क्षेत्रफळानुसार प्रकाश अपुरा, सीसीटीव्हीच्या तिसऱ्या डोळ्याची कमतरता, स्वच्छतेचे तीनतेरा

Shivarkar garden toys disappear in the dark | शिवरकर उद्यानातील खेळणी बुडाली अंधारात

शिवरकर उद्यानातील खेळणी बुडाली अंधारात

googlenewsNext

वानवडी : परिसरात सहा ते सात एकर जागेमध्ये असणाºया कै. विठ्ठलराव शिवरकर उद्यानात जागेच्या क्षेत्रफळानुसार बहुतांश ठिकाणी विद्युत दिव्यांचा प्रकाश हा कमी प्रमाणात असून लहान मुलांची खेळणी असलेल्या भागात अंधार असल्याची परिस्थिती आहे. तर वेळच्या वेळी खेळणी साहित्यांची देखभाल करणे गरजेचे आहे.

शिवरकर उद्यानात मुलांची खेळणी असलेल्या ठिकाणी जास्त प्रकाश पडेल अशा स्वतंत्र विद्युत दिव्यांची सोय नसल्याने चालणाºया ट्रॅकवर असलेल्या विद्युत खांबावरील प्रकाश हा मुलांची खेळणी असलेल्या व मातीमध्ये खेळत असलेल्या ठिकाणी पडत आहे. हा प्रकाश तितकासा पुरेशा प्रमाणात नसल्याने लहान मुलांना खेळताना अंधारात इजा होण्याची शक्यता असून, या ठिकाणी अपघातही घडू शकतो.
उद्यानाची वेळ सकाळी ६ ते ११ व सायंकाळी ४ ते रात्री ८.३० अशी असल्याने सकाळच्या वेळी ६ नंतर व सायंकाळी ६च्या अगोदर विद्युत दिव्यांची आवश्यकता भासत नाही.

संध्याकाळी ६ नंतर आता अंधार पडत असल्याने व त्याच वेळी उद्यानात लहान मुलांना घेऊन पालक व इतर ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक फेरफटका मारण्यासाठी व व्यायामासाठी येतात. अशा वेळी व्यायामाचे साहित्य व लहान मुलांची खेळणी अशा ठिकाणी जास्त प्रकाश पडेल अशी व्यवस्था हवी. पूर्व भागात असलेल्या उद्यानांपैकी वानवडीतील शिवरकर उद्यान हे खूप प्रशस्त आहे.

खेळणारी मुले अंधारात पण पुतळा उजेडात...
उद्यानातील कै. विठ्ठलराव शिवरकर यांच्या पुतळ्यावर एक नव्हे तर दोन दोन विद्युत दिव्यांनी प्रकाश पडत असताना लहान मुले ज्या भागात खेळत असतात अशा खेळणी असलेल्या ठिकाणी प्रकाश असण्यासाठी स्वतंत्र अशी विद्युत दिव्यांची सोय नाही. खेळणी असलेल्या ठिकाणी जो प्रकाश पडतो तो बाजूला असलेल्या ट्रॅकवरील विद्युत दिव्यांचा आणि तेही बंद अवस्थेत असेल तर लहान मुले अंधारातच खेळण्यांचा वापर करत खेळाचा आनंद घेत आहेत. परंतु अशा वेळी काही दुखापत झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे लहान मुलांची खेळणी व ओपन जिम असलेल्या भागासाठी स्वंतत्र अशा विद्युत दिव्यांची सोय करावी. तसेच ओपन जिमचे काम चालू असून महिला व नागरिक याचा उपयोग करत असून व्यायाम प्रशिक्षकाची गरज असल्याचे नागरिक सांगतात.

अस्वच्छ स्वच्छतागृह...
उद्यानात असणारे स्वच्छतागृह अस्वच्छ आहे. तसेच शौचालयातील पाण्याचे नळ तुटल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. महिला व पुरुष असा दिशादर्शक फलक नसल्याने कोणत्या बाजूस जावे लक्षात येत नाही. शौचालयाच्या वर असणाºया पाण्याच्या टाक्या या कमी क्षमतेच्या असल्याने त्यातील पाणी कमी वेळातच संपते तर टाकी भरुन गेल्यावर पाण्याचा अपव्यय या ठिकाणी होत आहे. अस्वच्छ व विद्युत दिवे फुटलेले असल्याने अंधार असलेल्या शौचालयात नागरिकांना जाणे कठीण झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी विद्युत दिवे लावावेत व स्वच्छतागृहे वेळच्या वेळी स्वच्छ करावीत, अशी येथे येणाºया नागरिकांची मागणी आहे.

वायफाय आहे, पण सीसीटीव्ही नाहीत..
स्मार्ट सिटीकडे वाटचाल होत असताना उद्यानात मोफत वायफायची व्यवस्था असली तरी एवढ्या प्रशस्त उद्यानात एकही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने एखादी घटना घडल्यास त्याचा छडा लावणे कठीण जाईल. उद्यानात सीसीटीव्ही नसल्याने टवाळखोर मुलांवर व चोरट्यांवर वचक राहत नाही. त्यामुळे उद्यानात सीसीटीव्ही असणे गरजेचे असून, त्याची व्यवस्था करण्यात यावी.

निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, वर्क आँर्डरनंतर ठेकेदाराकडून उद्यानातील अपूर्ण कामांची पूर्तता करण्यास सुरुवात होईल. तसेच स्वच्छतेकडे व नागरिकांच्या सोयी सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. उद्यानातील पुरेशा प्रकाशासाठी क्षेत्रीय कार्यालयातील विद्युत विभागाशी संपर्क करुन जास्तीच्या विद्युत दिव्यांची सोय करण्यात येईल.
- बाळासाहेब चव्हाण, उद्यान निरीक्षक, वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय

टेंडर संपले की उद्यानात दुरवस्था होण्यास सुरुवात होते तसेच शौचालयातील तुटलेल्या नळांमुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याअगोदरच उद्यानात सोई सुविधांकडे लक्ष दिले पाहिजे. - सुनील वाळुंज, स्थानिक नागरिक

Web Title: Shivarkar garden toys disappear in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे