पाणीसंवर्धनासाठी आमीर खानचे कामकौतुकास्पद : शरद पवारांनी केले कौतुक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 09:03 PM2018-05-17T21:03:52+5:302018-05-17T21:03:52+5:30

पवार यांनी आमीर यांच्या कामाचे कौतुक केले असून स्वतःहून त्याला मदत करण्याची तयारीही दाखवली आहे. इतकेच नव्हे तर पवार यांनी त्याला काम वाढवण्याच्या दृष्टीने मदत करण्यासाठी काही पर्यायही सुचवले आहेत. 

Sharad Pawar appreciated Aamir Khan's work for water conservation | पाणीसंवर्धनासाठी आमीर खानचे कामकौतुकास्पद : शरद पवारांनी केले कौतुक 

पाणीसंवर्धनासाठी आमीर खानचे कामकौतुकास्पद : शरद पवारांनी केले कौतुक 

googlenewsNext
ठळक मुद्देपाणी फाऊंडेशनच्या कामासाठी अभिनेता आमिर खानने घेतली शरद पवारांची भेट  पाणी फाऊंडेशनच्या केली  खासदार निधीतून  केली मदत 

पुणे : पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून अभिनेता आमिर खान याने सुरु केलेल्या चळवळीला व्यापक स्वरूप येत आहे. केवळ सेलिब्रिटीच नाही तर सर्वसामान्य व्यक्तीही या कामात सहभागी होत आहेत. याच निमित्ताने आमीरने गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ उपस्थित होते. पवार यांनी स्वतः या भेटीची माहिती फेसबुकच्या माध्यमातून दिली आहे.त्यात त्यांनी आमीर यांच्या कामाचे कौतुक केले असून स्वतःहून त्याला मदत करण्याची तयारीही दाखवली आहे. इतकेच नव्हे तर पवार यांनी त्याला काम वाढवण्याच्या दृष्टीने मदत करण्यासाठी काही पर्यायही सुचवले आहेत. 

   या संदर्भात फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमध्ये पवार म्हणाले आहेत  की आमीर खान  यांनी राज्यात सुरू केलेले पाणलोटाचे कार्य आज एक सर्वसामान्यांची चळवळ बनले आहे. त्यांच्या या कामाविषयी माहिती देण्यासाठी त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आज भेट दिली.आपल्या देशात ऋतूमान अनियमित असल्याने पाणी साठवण्याची योजना राबवणे अत्यावश्यक आहे. सर्वसामान्यांचा सहभाग घेऊन त्यांना पाणीसंवर्धनाच्या कामासाठी उद्युक्त करण्याचे कौतुकास्पद काम आमिर खान यांची टीम करत आहे. केवळ पिण्यासाठी पाणीसंवर्धन नाही तर ६० टक्के शेतीवर अवंलबून असलेल्या  देशात शेतीसाठी पाण्याचा योग्यप्रकारे वापर करण्याचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. याबाबत इस्त्राईलचे उदाहरण समोर ठेवायला हवे. पाण्याच्या अत्यल्प उपलब्धतेतही त्यांनी थेंब थेंब वाचवून शेतीचे नंदनवन फुलवले आहे. आपल्या एॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टमध्ये कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त पीक कसे घेता येईल यासाठी अनेक प्रयोग केले जातात. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्येही भरपूर पाणी लागणाऱ्या ऊसाबाबत प्रयोग केले आहेत. पाटातून सोडण्यात आलेलं पाणी बरचसं वाया जातं, शिवाय त्यामुळे बिनकामाचे तण सुद्धा माजतात. त्याऐवजी ऊसाच्या केवळ मुळांना मुबलक पाणी उपलब्ध होईल अशी योजना केल्यास फायदेशीर ठरते. मी आमिर खान आणि त्यांच्या टीमला एॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टला भेट देण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यावेळी मी स्वतः उपस्थित राहून त्यांना इथले काम दाखवेन असेही त्यांनी म्हटले 

पाणी फाऊंडेशनच्या कार्यातील लोकसहभाग वाखाणण्याजोगा आहे. मला आठवतं, १९७२ साली जेव्हा दुष्काळ पडला होता, तेव्हा अमेरिकेतील एक संस्था 'फूड फॉर हंगर' असा कार्यक्रम राबवण्यासाठी इथे आली होती. मी त्यांना विरोध केला. त्यांना सांगितले की अशाप्रकारे धान्य वाटण्याऐवजी तुम्ही लोकांचा पाणी साठवण्याच्या कार्यात सहभाग घ्या. त्यांच्या श्रमदानाच्या मोबदल्यात त्यांना धान्य द्या. त्यांना ही गोष्ट पटली व त्यांनी 'फूड फॉर वर्क' असा कार्यक्रम सुरू केला. आज आमिर खान यांनाही मी असं सुचवलं आहे की रयत शिक्षण संस्थेसारख्या असंख्य शैक्षणिक संस्था आपल्या राज्यात आहेत, तिथल्या विद्यार्थ्यांचा या कार्यात सहभाग करून घ्यावा. जेणेकरून त्यांना पाणी संवर्धनाबाबत रूची निर्माण होईल, तसेच त्यांचे याबाबत शिक्षण होईल. यापूर्वीही पाणी फाऊंडेशनच्या या कामासाठी मी माझ्या खासदार निधीतून तसेच राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून काही आर्थिक मदत केली आहे आणि यापुढेही कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास ती करायची माझी तयारी आहे. पाणी फाऊंडेशच्या सर्व सदस्यांना या पाणी संवर्धनाच्या या कामासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा' असा शेवट त्यांनी केला आहे. 

Web Title: Sharad Pawar appreciated Aamir Khan's work for water conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.