सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : विद्यार्थ्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्या, विद्यार्थ्यांचे उपोषण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 03:27 AM2018-01-31T03:27:09+5:302018-01-31T03:27:25+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रातील दुरावस्थेविरोधात आंदोलन करणाºया अभविपच्या ४ विद्यार्थ्यांविरूध्द विद्यापीठ प्रशासनाने खोटे गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे मागे घ्यावेत यासह आरोग्य केंद्रातील दुरावस्था दूर कराव्यात आदी मागण्यांसाठी अभविपकडून मंगळवारपासून उपोषण सुरू करण्यात आले आहे.

 Savitribai Phule Pune University: Take back the false cases against the students, continue the students' fasting | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : विद्यार्थ्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्या, विद्यार्थ्यांचे उपोषण सुरू

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : विद्यार्थ्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्या, विद्यार्थ्यांचे उपोषण सुरू

Next

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रातील दुरावस्थेविरोधात आंदोलन करणाºया अभविपच्या ४ विद्यार्थ्यांविरूध्द विद्यापीठ प्रशासनाने खोटे गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे मागे घ्यावेत यासह आरोग्य केंद्रातील दुरावस्था दूर कराव्यात आदी मागण्यांसाठी अभविपकडून मंगळवारपासून उपोषण सुरू करण्यात आले आहे.
आरोग्य केंद्रातील दुरावस्था दूर व्हावी यासाठी गेल्या ६ महिन्यांपासून पाठपुरावा केला जात आहे. यापार्श्वभुमीवर आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. शशिकांत दुधगावकर यांनी मुददमहून विद्यार्थ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. याविरोधात अभविपचे श्रीराम कंधारे, विनायक राजगुरू, हनमंत रंगा, ऐश्वर्या भणग, शशिकांत टिंगरे, सचिन लांबुरे, प्रियंका रणदिवे या ७ विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केले आहे.
आरोग्य केंद्रांची दुरावस्थेविरोधात बोलल्याने विद्यार्थ्यांवर जाणीवपूर्वक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे आयुष्य पणाला लागले आहे. तरी विद्यार्थ्यांवरील हे खोटे गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, आरोग्य केंद्रांची सुविधा २४ तास उपलब्ध असावी, आरोग्य केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना अ‍ॅडमिट करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी आदी मागण्यांसाठी विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत.
चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात श्रीराम कंधारे, राजू रंगा, विनायक राजगुरू व एक महिला यांच्याविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांवर लावलेले कलमच चुकीचे

महाराष्ट्र लोक आयुक्त आणि उप लोकआयुक्त आधिनियम ,१९७१ चे कलम २(के) मध्ये दिलेल्या लोकसेवाकाच्या व्याख्येनुसार विद्यापीठातील कुलगुरू व अधिकारी हे लोकसेवक ठरत नाहीत. त्यामुळे लोकसेवकास धाक दाखविला असे विद्यार्थ्यांवर लावण्यात आलेले कलम चुकीचे असल्याचे डॉ. अभिषेक हरिदास, कल्पेश यादव यांनी सांगितले. प्रश्न मांडणाºया विद्यार्थ्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रकार चुकीचा असल्याचे विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ते दिलीपसिंग विश्वकर्मा यांनी सांगितले.

आरोग्य केंद्राच्या दुरावस्थेचे प्रश्न जैसे थे
विद्यार्थ्यांकडून गेल्या ६ महिन्यांपासून आरोग्य केंद्राच्या दुरावस्थेविरोधात आंदोलन केले जात आहे. कुलगुरूंनी घेतलेल्या मागील व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत आरोग्य केंद्रात अधिकचे डॉक्टर व कर्मचारी पुरविणे, अ‍ॅम्बुलन्स उपलब्ध करून देणे आदी निर्णय घेतले होते.
मात्र प्रत्यक्षात त्या निर्णयांची कार्यवाहीच झालेली नाही. आरोग्य केंद्राचे प्रश्न सुटले असते तर विद्यार्थ्यांना वारंवार आंदोलन करण्याची व गुन्हे दाखल करून घेण्याची वेळच आली नसती अशी भावना त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.

खोटे गुन्हे मागे घेतल्या शिवाय चर्चा नाही
कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी मंगळवारी उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र जोपर्यंत विद्यार्थ्यांवरील खोटे गुन्हे मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत प्रशासनाशी कोणतीही चर्चा केली जाणार नाही अशी उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भुमिका असल्याचे अभविपचे पुणे विद्यापीठ अध्यक्ष श्रीराम कंधारे यांनी सांगितले.

कलमे मागे घेण्याची कार्यवाही करू

विद्यापीठ प्रशासनाने चतु:श्रृंगी पोलिसांकडे केवळ तक्रार दिली होती. त्यानुसार कलमे लावण्याचे काम पोलिसांनी केले आहे. तरी विद्यार्थ्यांवर लावण्यात आलेली गंभीर कलमे मागे घेण्याची कार्यवाही करू.
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

विद्यार्थ्यांवर लावलेली कलमे
दंगा करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, लोकसेवकास धाक दाखविणे आदी स्वरूपाची गंभीर कलमे आंदोलक विद्यार्थ्यांवर लावण्यात आली आहेत.

Web Title:  Savitribai Phule Pune University: Take back the false cases against the students, continue the students' fasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.