मैत्रीच्या नात्याला नवा आयाम देणारा वैशिष्टयपूर्ण‘सॅटर्डे क्लब ’ 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 03:20 PM2018-10-01T15:20:48+5:302018-10-01T17:52:32+5:30

या क्लबला म्हटलं तर तसा इतिहास आहे, जवळपास ३५-४० वर्षांपूर्वी त्यावेळच्या युवक काँग्रेसमध्ये काम करणारे तरुण एखादे दिवशी एकत्र जमत गप्पाटप्पा, भेळ म्हणा किंवा भजीपाव असा बेत. तसा तो नियमित नसे, पण त्याला नाव मात्र होतं ‘सॅटर्डे क्लब.’

'Saturday Club' in Pune a new dimension of friendship | मैत्रीच्या नात्याला नवा आयाम देणारा वैशिष्टयपूर्ण‘सॅटर्डे क्लब ’ 

मैत्रीच्या नात्याला नवा आयाम देणारा वैशिष्टयपूर्ण‘सॅटर्डे क्लब ’ 

Next
ठळक मुद्देदर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी सर्व क्षेत्रांतील जवळपास १०० प्रमुख एकत्रसर्वच पक्षांचे प्रमुख, सरकारी अधिकारी, सांस्कृतिक, वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, निवृत्त अधिकारी अशा अनेकांचा समावेश

पुणे :  क्लब म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर नेहमी नावं येतात ती लायन्स, रोटरी, जायंट्स असे जागतिक पातळीवर काम करणारे उच्चभ्रू लोकांचे क्लब, पण पुणे शहरात गेली १५ वर्षे दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी सर्व क्षेत्रांतील जवळपास १०० प्रमुख एकत्र जमतात, त्यात आजपर्यंत एकही शनिवार खंड पडला नाही, अशा या क्लबचे नाव आहे ‘सॅटर्डे क्लब.’ 
या क्लबला म्हटलं तर तसा इतिहास आहे, जवळपास ३५-४० वर्षांपूर्वी त्यावेळच्या युवक काँग्रेसमध्ये काम करणारे तरुण एखादे दिवशी एकत्र जमत गप्पाटप्पा, भेळ म्हणा किंवा भजीपाव असा बेत. तसा तो नियमित नसे, पण त्याला नाव मात्र होतं ‘सॅटर्डे क्लब.’ उल्हास पवार, सुरेश कलमाडी, श्रीकांत शिरोळे, मोहन जोशी, सतीश देसाई, धनंजय थोरात, विजय नालम, मोहन जाधव, श्रीधर माडगुळकर, मी असे काँग्रेस विचाराचेच तरुण एकत्र येत. पुढे १९७७ मध्ये काँग्रेस फूट, तसेच जनता पक्ष यामुळे काही तरुण वेगवेगळ्या पक्षात गेले आणि पुढे तो क्लब बंद पडला आणि आम्हा तरुण मित्रांचं एकत्र येणं बंद पडलं. 
पुढे १५ वर्षांपूर्वी मीच एकेदिवशी काही मित्रांना एकत्र येण्याचं निमंत्रण दिलं. सुधीर गाडगीळच्या घरी पार्टीसाठी या असं निमंत्रण दिलं. (सुधीरला मात्र याची काहीच कल्पना दिली नाही, नाहीतर पार्टी द्यावी लागेल म्हणून तो गायब झाला असता.) अभय छाजेड, मोहन जोशी, वीरेंद्र किराड, शांतिलाल सुरतवाला, श्रीकांत शिरोळे, युवराज शहा, मी आणि सुधीर जमलो होतो, त्यावेळी पुन्हा आपण एकत्र जमू या, असं सर्वांचं ठरलं आणि त्यासाठी वार ठरला दर महिन्याचा शेवटचा शनिवार! त्यात कधीही बदल करायचा नाही हे सुरुवातीसच मी पक्कं करून घेतलं आणि सुरतवाला यांनी आणलेला पाव-भाजी-पुलाव खाऊन आम्ही बाहेर पडलो. 
त्यानंतरच्या महिन्यात असंच कुणाच्या तरी घरी आम्ही शनिवारी जमलो. १०-१५ जण होतो, त्यात वाढ करावी, तसेच यजमान असेल त्याने त्याचे २-४ मित्र बोलवावेत, असे ठरले. अर्थात ते त्या महिन्यापुरतेच. रात्री २-३ तास मनसोक्त गप्पा, टिंगलटवाळी, जुन्या आठवणींना उजाळा मिळू लागला, असं हे रोपटं पुन्हा बाळसं धरू लागलं. मग तो काँग्रेस किंवा राजकारणापुरता मर्यादित न ठेवता इतरांनाही सामावून घेण्याचं एकमतानं ठरलं आणि पहिले काँग्रेस विचाराबाहेरचे श्री. गिरीश बापट यांचं त्यात पदार्पण झालं. पुढे सांस्कृतिक, सामाजिक, सरकारी, अधिकारी, व्यावसायिक अशा अनेकांचे पदार्पण झाल्यामुळे ही संख्या वाढत गेली. संयोजकाने बोलाविलेले मित्र आम्हाला दरवेळी बोलवा, असा आग्रह धरू लागले. अशी ही संख्या आजमितीस १००-११० च्या घरात आहे, अनेक नामवंत प्रवेशासाठी आग्रह धरतात, पण ही संख्या वाढवू नये, असा निर्णयच झाला आहे. आता यामध्ये सर्वच पक्षांचे प्रमुख, सरकारी अधिकारी, सांस्कृतिक, वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, निवृत्त अधिकारी, सर्व व्यवसायातील अनेक प्रमुख अशी मंडळी आठवणीने शेवटचा शनिवार लक्षात ठेवतात. या क्लबमध्ये कुणीही अध्यक्ष नाही की पदाधिकारी नाही. संयोजकाचे निमंत्रण, त्याचे वैयक्तिक निमंत्रण, जमण्याचे ठिकाण कुठेही संयोजकाचे घर, हॉटेल, मंगल कार्यालय, लॉन असे, मद्यपान अजिबात नाही. दोन्ही प्रकारचे जेवण हा नियम ठरलेला. प्रसंगानुरुप कोणीतरी मान्यवरांचे सद्य:स्थितीवर मार्गदर्शन, पण तेही हलकं-फुलकं उगाच फार बौद्धिक नसावं, कारण सगळे जण एन्जॉय मूडमध्ये असतात. आजपर्यंत या क्लबमध्ये भेट दिलेल्यांची यादी फार मोठी होईल, पण काही ठळक नावं घेतलीच पाहिजेत. श्री. शरद पवार, श्री. राम नाईक, डी. वाय. पाटील, देवेंद्र फडणवीस, गोपीनाथ मुंढे, सुशीलकुमार शिंदे, पतंगराव कदम, प्रकाश जावडेकर, नितीन गडकरी, संजय राऊत, अजित पवार, विजय दर्डा, एस. एस. विर्क, अजित पारसनीस अशी अनेक मान्यवर मंडळी सहभागी झाली होती. श्रीनिवास पाटील तर नियमित येणारे त्यांनी राज्यपाल असताना ४ दिवस सिक्कीमला सर्वांना निमंत्रण दिले. जवळपास ८० जण तेथे होतो. त्यात शरदरावही सहभागी झाले होते. प्रकाश जावडेकर हे पुण्यात असतील तेव्हा जरुर उपस्थिती लावतात. त्यांनी आम्हाला दिल्लीला निमंत्रण दिले. आम्ही गेलो तर तेथे १ दिवस जावडेकर, १ दिवस शरदराव, १ दिवस पतंगराव कदम या मान्यवरांचा पाहुणचार अवर्णनीय होता. विशेष म्हणजे यांनी आमच्याबरोबर गप्पांमध्ये ३ तास व्यतित केले. या दिल्ली दौऱ्यात सौ. वंदना चव्हाण, संजय राऊत, हिरामण बारणे, अ‍ॅड. प्रमोद आडकर, आनंद रेखी यांनीदेखील आम्हाला त्यांच्या निवासस्थानी भोजनाचा स्वाद दिला. गिरीश बापट नियमित सभासद त्यांनी मुंबईला त्यांच्या बंगल्यावर १ शनिवार आयोजन केले. मुख्यमंत्री, अजित पवार, बाळा नांदगावकर यांच्याबरोबर इतरही त्यात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे त्यावेळी देवेंद्रजींनी एक गाणंदेखील म्हटलं होतं. दिलीप वळसे-पाटील यांनी मंचर येथे आयोजन केलं. संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम मग जाता जाता गोवर्धन डेअरी पाहण्याची संधी, प्रकाश देवळे यांच्या श्री साईबाबा मंदिर येथे भेट, क्लबनं २५ वर्षे पूर्ण झाली, म्हणून छोटासा सांस्कृतिक कार्यक्रम केला. ५० वा क्लब आगळ्या पद्धतीने साजरा केला. १०० वा १५० शनिवारदेखील विविध कार्यक्रमांनी साजरा केला गेला. यामध्ये आम्हालाही बोलवत जा, अशी बहुतेकांच्या घरातून मागणी येते. पण आम्हाला ते रुचत नाही. तरी दरवर्षी १ शनिवार सपत्नीक त्याचं आयोजन करतात. अनिस सोमजी आणि अशोक कामदार. सामाजिक बांधिलकीदेखील जपली जाते. दुष्काळ किंवा तत्सम वेळी मदत केली जाते. 
गिरीश बापट मंत्री असूनही कधीही शनिवार चुकवत नाहीत. श्रीनिवास पाटील, उल्हास पवार, मोहन जोशी, सुधीर गाडगीळ, डॉ. सतीश देसाई, प्रकाश पायगुडे, युवराज शहा, श्रीकांत शिरोळे, विनायक निम्हण, प्रकाश देवळे, बाळासाहेब गांजवे आदी मंडळी आपल्या जुन्या आठवणी, किस्से सांगून रंगत आणतात. प्रत्येक महिन्यात १ संयोजक असतो. एकदा त्याचे नियोजन झाल्यानंतर ८ वर्षे त्याचा पुन्हा नंबर येत नाही. हेमंत ठोंबरे, गणेशमूर्ती, तसेच रघुनाथ तावरे हे निशीगंधाची फुले देऊन स्वागत करीत असतात. नेहमी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे, वेळप्रसंगी हमरी-तुमरीवर येणारे राजकारणी येथे दोन-अडीच तास मनसोक्त गप्पा मारत असताना हे बाहेर जे करतात ते नाटक असतं की काय, असा प्रश्न उपस्थितांच्या मनात आल्याशिवाय राहत नाही. 
                                                                                                                                                                                                                                                                                                                    अंकुश काकडे 
                                                                                                (लेखक प्रसिद्ध राजकीय-सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

Web Title: 'Saturday Club' in Pune a new dimension of friendship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.