पुणे : सिंहगड रस्ता पोलिसांनी तीन सराईत वाहनचोरांना गजाआड केले असून, त्यांच्याकडून चोरीची पाच वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. गेल्या तीन दिवसांत सिंहगड रस्ता पोलिसांनी एकूण अकरा दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
विजय विलास चव्हाण (वय २३ रा. हनुमान चाळ, अप्पर इंदिरानगर), दीपक सुरेश चोचांडे (वय २३, रा. सध्या रा. मोहननगर, मूळ रा. येरोळ, ता. शिरुर अनंतपाळ, जि. लातूर) आणि किरण हनुमंत जगतकर (वय २५, राजश्री अपार्टमेंट, अजिंक्यनगर, सिंहगड रस्ता) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलीस गस्त घालीत होते. त्यावेळी एका दुचाकीच्या नंबरप्लेटबाबत पोलिसांना शंका आली.
त्यांनी संशयिताकडे चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला ताब्यात घेऊन तपास केला असता त्याने पाच दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. आरोपी विजय एका प्युरीफायर कंपनीत नोकरीला असून, त्याच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. उदरनिर्वाहासाठी तो दुचाकी चोऱ्या करीत होता. (प्रतिनिधी)