पुणे : नवोदित लेखकांच्या साहित्याला प्रकाशनाची वाट सापडणे अवघड होऊन जाते. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी धडपडावे लागते. यासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून मिळालेल्या अनुदानामुळे १८ हस्तलिखितांना पुस्तकांचे स्वरूप प्राप्त होणार आहे.
आजवर एकही पुस्तक प्रकाशित झाले नाही, अशा लेखकांना अनुदान दिले जाते. यामध्ये कथा, कादंबरी, ललितगद्य, काव्य, नाटक (एकांकिका), बालवाङ्मय आदी साहित्याचा समावेश असतो. यंदा मंडळाकडे या योजनेसाठी ४८ हस्तलिखिते प्राप्त झाली होती. निवडीसाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली होती. त्यानुसार १८ लेखकांची निवड झाली असून प्रकाशनासाठी पुण्यातील गमभन प्रकाशन आणि प्रियांका पटवर्धन या दोन प्रकाशकांची निवड झाली आहे.
यंदाच्या अनुदान योजनेंतर्गत ६ काव्य, १ कथा, २ एकांकिका, ५ कादंबऱ्या, २ ललितगद्य आणि २ बालवाङमयांचा समावेश आहे. पृष्ठसंख्येप्रमाणे या योजनेंतर्गत ३५ हजार ते ५० हजार रुपयांच्या दरम्यान अनुदान दिले जाते. हे अनुदान प्रकाशकांकडे सुपूर्द केले जाते. अनुदानाची रक्कम वाढवण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे, अशी माहितीही भांड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

मराठी साहित्य विश्वात नव्याने कार्य करू पाहणाऱ्या, धडपडणाऱ्या नवीन प्रतिभेला मार्गदर्शन व व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत अनुदान दिले जाते. त्याचबरोबर मार्गदर्शनासाठी कार्यशाळाही घेतल्या जातात. अनुदानाची रक्कम वाढवण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
- बाबा भांड, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.