- प्रज्ञा केळकर-सिंग 
पुणे : सकाळी दहाची वेळ... बालगंधर्व कलादालनात चित्रप्रदर्शनाची लगबग... चिमुरडीच्या कलाकृतींचे कौैतुक करण्यासाठी अनेक कलाप्रेमींनी लावलेली हजेरी... चिमुरडीचे डोळे मात्र दरवाजाकडे लागून राहिलेले... आजवरच्या प्रत्येक चित्रप्रदर्शनाला आवर्जून उपस्थित राहणाºया ‘तेंडुलकर’ सरांना शोधण्यासाठी तिची नजर भिरभिरत होती; पण ते आलेच नाहीत... हिरमुसल्या भावनेतून ती भानावर आली आणि आपल्याच चित्रांकडे पाणावलेल्या डोळयांनी पाहू लागली!
हुजूरपागा प्रशालेत आठवी इयत्तेत शिकणाºया पूर्वा गवळी हिच्या चित्रांचे १२वे प्रदर्शन नुकतेच बालगंधर्व कलादालनात आयोजित करण्यात आले होते. पूर्वाच्या आजवरच्या प्रत्येक चित्रप्रदर्शनाला ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर आवर्जून उपस्थित राहायचे, तिला मार्गदर्शन करायचे. जुलैै महिन्यात तेंडुलकर सरांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी पूर्वा उपस्थित राहिली होती. ते गेल्यानंतरचे पूर्वाचे हे पहिलेच चित्रप्रदर्शन होते. त्यांच्या आठवणीने तिला गहिवरून आले होते. त्यांच्याकडून मिळणाºया शाबासकीच्या थापेची उणीव तिला प्रकर्षाने जाणवली.
तेंडुलकर यांच्या प्रेमाची, आपुलकीची एक आगळीवेगळी झलक पूर्वा गवळीला अनुभवता आली. तेंडुलकर यांनी पूर्वाला जून महिन्यात स्वत: वापरलेले ब्रश आणि रंगसाहित्य भेट दिले होते. ‘मी आजवर हे साहित्य माझ्या पद्धतीने वापरले. हे रंग वापरून तू तुझ्या शैलीतील चित्रे रेखाट,’ असा मौलिक सल्ला देत तिला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. पूर्वा पहिलीत असताना तिच्या चित्रांचे पहिलेवहिले प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात भरविण्यात आले होते. त्याची वृत्तपत्रातील जाहिरात पाहून मंगेश तेंडुलकर आणि त्यांच्या पत्नीने तिच्या प्रदर्शनाला आवर्जून भेट दिली होती. तेव्हापासून पूर्वाची आणि तेंडुलकरांची मैत्री अधिक घट्ट होत गेली. पूर्वाच्या चित्रांची आतापर्यंत ११ प्रदर्शने झाली आहेत. त्यांना तेंडुलकरांनी आवर्जून हजेरी लावली.

मंगेश तेंडुलकर सरांनी मला वॉटर आणि आॅईल कलर, ब्रश, स्केचपेन, ड्रॉइंग बोर्ड असे स्वत:चे साहित्य दिले होते. मी हे सर्व साहित्य कायम संग्रही ठेवणार आहे. सध्या मी अ‍ॅक्रेलिक आणि पेन्सिल कलर वापरून चित्रे काढते. वॉटर कलरमध्ये चित्रे काढायला शिकेन, तेव्हा सरांचेच कलर वापरेन. त्यांनी दिलेले साहित्य वापरून काढलेल्या चित्रांचे वेगळे प्रदर्शन भरवण्याची कल्पनाही मी आई-बाबांना सांगितली आहे. मला व्यंगचित्रे काढायलाही शिकायचे आहे. चित्रकलेमध्येच करिअर करणार असून शाळेकडूनही सतत प्रोत्साहन मिळत असते.
- पूर्वा गवळी

सर माझ्या प्रत्येक प्रदर्शनाच्या उद्घाटनाला यायचे. एखाद्या वेळी आम्ही बोलवायला विसरलो, तरी त्यांना कधीच विसर पडलाा नाही. ते कायम मार्गदर्शन करीत राहायचे. या प्रदर्शनाच्या वेळी त्यांची खूप आठवण झाली. सरांच्या पत्नी स्रेहलता तेंडुलकर मात्र आवर्जून चित्रप्रदर्शन पाहायला आल्या होत्या. ‘तू कायम अशीच चित्रे काढ, सर हयात नसले तरी मी तुझ्यासाठी कायम येत राहीन,’ असा विश्वास त्यांनी मला दिला, अशा भावना पूर्वाने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.