Sabarimala Temple : मोदींच्या भेटीसाठी निघालेल्या तृप्ती देसाई पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 07:32 AM2018-10-19T07:32:54+5:302018-10-19T07:54:51+5:30

मोदींना भेटण्यासाठी शिर्डीला निघाल्या असताना पोलिसांची कारवाई

Sabrimala Temple issue Activist Trupti Desai detained by police in pune when she was on the way to meet pm narendra modi | Sabarimala Temple : मोदींच्या भेटीसाठी निघालेल्या तृप्ती देसाई पोलिसांच्या ताब्यात

Sabarimala Temple : मोदींच्या भेटीसाठी निघालेल्या तृप्ती देसाई पोलिसांच्या ताब्यात

Next

पुणे: सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. केरळमधील शबरीमाला मंदिर प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी तृप्ती देसाई शिर्डीला निघाल्या होत्या. पंतप्रधान मोदी आज साईबाबा समाधी शताब्दी उत्सवासाठी शिर्डीला येणार आहेत. मोदींच्या शिर्डी दौऱ्यादरम्यान त्यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारण्यासाठी देसाई पुण्यातील त्यांच्या घरातून निघाल्या होत्या. मात्र पोलिसांनी त्यांना घराजवळूनच ताब्यात घेतलं. पोलिसांची ही कारवाई म्हणजे आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप देसाई यांनी केला आहे.




आज पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीला येणार आहेत. ते साईबाबा समाधी शताब्दी उत्सवात सहभागी होण्यासाठी शिर्डीला येत आहेत. त्यावेळी त्यांची भेट घेऊन शबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाबद्दल जाब विचारण्यासाठी तृप्ती देसाई शिर्डीला निघाल्या होत्या. यासाठी त्यांनी काल अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकांना पत्र दिलं होतं. याबद्दलची माहिती अहमदनगरमधील पोलिसांनी पुणे पोलिसांना दिली. यानंतर तृप्ती देसाई यांना घराजवळूनच ताब्यात घेण्यात आलं. मोदींची भेट घेऊ न दिल्यास त्यांचा ताफा अडवण्याचा इशारा देसाई यांनी दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली. 




शिर्डीकडे निघालेल्या तृप्ती देसाई यांना त्यांच्या पुण्यातील घराजवळच ताब्यात घेण्यात आलं. यानंतर देसाई यांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली. पोलिसांची कारवाई म्हणजे आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. 'आंदोलन करणं, निषेध नोंदवणं हा संविधानानं दिलेला हक्क आहे. मात्र सरकारकडून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे,' असं देसाई म्हणाल्या. शबरीमाला मंदिरात प्रवेश करु पाहणाऱ्या महिलांना मारहाण केली जाते. तिथे हिंसा घडवणाऱ्या, महिलांवर हात उचलणाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मोदी शिर्डीत येऊन साईबाबांचं दर्शन घेणार आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही महिला शबरीमाला मंदिरात का जाऊ शकत नाहीत? याबद्दल मोदी गप्प का? महिलांचे अच्छे दिन कधी येणार?, असे प्रश्न देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विचारले. 

Web Title: Sabrimala Temple issue Activist Trupti Desai detained by police in pune when she was on the way to meet pm narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.