विद्यापीठांमधून ग्रामीण, आदिवासी, दलित अभ्यासक्रम बंद व्हावेत : राजन खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 03:44 PM2017-12-25T15:44:39+5:302017-12-25T15:55:15+5:30

जर गरज संपली असेल तर ग्रामीण, दलित, आदिवासी असे जातीयतेला अधिकाधिक खतपाणी घालणारे विद्यापीठातील अभ्यासक्रम बंद झाले पाहिजेत, अशा परखड विचारांतून ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांनी जातीयवादाच्या मर्मावरच बोट ठेवले.

Rural, Tribal and Dalit courses should be closed from universities: Rajan Khan | विद्यापीठांमधून ग्रामीण, आदिवासी, दलित अभ्यासक्रम बंद व्हावेत : राजन खान

विद्यापीठांमधून ग्रामीण, आदिवासी, दलित अभ्यासक्रम बंद व्हावेत : राजन खान

Next
ठळक मुद्देसाहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच्या वतीने 'साहित्यिक कलावंत संमेलन'‘सामाजिक परिवर्तन आणि मराठी साहित्य’ या विषयावर परिसंवाद

पुणे : जर गरज संपली असेल तर ग्रामीण, दलित, आदिवासी असे जातीयतेला अधिकाधिक खतपाणी घालणारे विद्यापीठातील अभ्यासक्रम बंद झाले पाहिजेत. कारण विद्यापीठात जाऊन विद्यार्थी तिथे जातच शिकतात आणि हे बाहेर पडणारे शिक्षित येडे पुन्हा समाजात जातवादच करीत राहतात, हा जो विरोधाभास आहे तोच खरा संघर्षाचा काळ आहे, अशा परखड विचारांतून ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांनी जातीयवादाच्या मर्मावरच बोट ठेवले.
साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच्या वतीने १७व्या साहित्यिक कलावंत संमेलनात ‘सामाजिक परिवर्तन आणि मराठी साहित्य’ याविषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी उत्तम कांबळे होते. ज्येष्ठ लेखिका इंदुमती जोंधळे यांनी सहभाग घेतला.
साहित्य मग ते कुठल्याही कालखंडातील असो ते आजही वाचले जाते. एकही असा मराठी माणूस सापडणार नाही त्याच्याकडे तुकाराम गाथा आणि ज्ञानेश्वरी सापडणार नाही. मात्र किती लोकांनी ती वाचली हा खरा प्रश्न आहे? शासनाने महात्मा फुले यांचे समग्र ग्रंथ काही वर्षांपूर्वी १० रूपये किंमतीत विकले, ते घेण्यासाठी लोक अक्षरश: तुटून पडले. एवढे खंड जर विकले गेले असतील मग समाजात क्रांतीच व्हायला काय हरकत होती. आज शाहू-फुले आंबेडकर ही समाजात केवळ एक म्हण ठरली असून, त्याचा तुळीसारखा वापर होतो आहे असे सांगून ते पुढे म्हणाले १९८०च्या दशकानंतरच्या साहित्याचा आढावा घेतला तर त्या काळातील साहित्य हे फदफदे होते. साहित्यामध्ये फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार आणि मूल्यवस्थेचा प्रभाव पाहायला मिळतो. मात्र व्याख्यानांमधून ही नावे उच्चारताना चोखंदळपणे विचार केला जातो. त्याकाळात या चळवळी एकीकडे स्वत: चा आवाज पोहोचविण्याचा प्रयत्न करीत होत्या तर दुसऱ्या बाजूला जात आणि धर्म अशी टोकाची कर्मठताही आली. साहित्य हे अशा जातीपातीत विभागले जाणे हीच दुर्दैवाची गोष्ट आहे. आज अशी स्थिती आहे की विद्यापीठं, पुरस्कार सोहळे, सत्कार समारंभ हे जातीयतेत बाटले गेले आहेत. कोणत्या जातीच्या उमेदवाराला किती मते पडतील हे जाहीरपणे लिहिले जात आहे. यातच सध्या मुस्लीम साहित्याची स्थिती पाहिली तर त्यांच्या साहित्यामध्ये मूल्यव्यवस्थेवर केलेले भाष्य वाचायला मिळत नाही. देशात अन्याय होणारी ही एकच जात आहे जी एका विचित्र कोंडीत सापडली आहे. केवळ धर्माच्या गोडगोष्टी ते साहित्यातून मांडत आहेत, याकडे लक्ष वेधण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
इंदुमती जोंधळे म्हणाल्या, की साहित्य परिवर्तनाची व्याप्ती बहुआयामी आहे. अर्थपूर्ण छटा साहित्यामधून प्रतिबिंबित होत आहेत. लेखक हा संवेदनशील आणि विश्लेषक असावा लागतो. अर्थकारण, राजकारण, कृषी अभ्यासपूर्ण मांडणारी कलाकृती साहित्यात निर्माण झाली नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात बोलताना समाजाचे प्रतिबिंब साहित्यात दिसते, समाजाला साहित्यातून दूर केले तर असे साहित्य समाजात सरपटणारे झुरळ होईल, ज्याचा समाजाला काही उपयोग होणार नाही, असे उत्तम कांबळे यांनी सांगितले.

Web Title: Rural, Tribal and Dalit courses should be closed from universities: Rajan Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे