दरोडेखोरांच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू, पत्नीची मृत्यूशी झुंज सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 11:43 AM2018-09-18T11:43:37+5:302018-09-18T11:47:41+5:30

प्रतिकार करणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्यावर दरोडेखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू झाला असून त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. 

robbery in pune one dead and one injured | दरोडेखोरांच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू, पत्नीची मृत्यूशी झुंज सुरू 

दरोडेखोरांच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू, पत्नीची मृत्यूशी झुंज सुरू 

Next

पुणे : लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोंगरागावमध्ये मध्यरात्री दीड वाजता दरोडेखोरांनी गडदे वस्तीतील एका घरातून शिरुन लुटमार केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये प्रतिकार करणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्यावर दरोडेखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू झाला असून त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. 

केरबा भिवा गडदे (70) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव असून मुक्ताबाई केरबा गडदे (62) या गंभीर जखमी झाल्या आहेत. मुक्ताबाईंना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरोडेखोरांनी याआधी दोन ठिकाणी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. गेले दोन दिवस दरोडेखोर भिक्षेकरी म्हणून गावात फिरत होते. त्यांनी आदल्या दिवशी सकाळी साडेअकरा वाजता गडदे यांच्या घरी चहा प्यायले होते अशी माहिती समोर आली आहे. तसेच दोन दिवस ते गावात फिरत होते असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेरण फाट्यापासून 5 किमी आतमध्ये डोंगरागाव असून त्यात गडदे वस्ती आहे. या वस्तीपासून काही अंतरावर केरबा गडदे यांचे छोटे घर आहे. गडदे हे आपल्या पत्नीसह घरात झोपले होते. तर दुसऱ्या खोलीत त्यांची सून आपल्या छोट्या मुलासह झोपली होती. मध्यरात्री तीन चोरट्यांनी अचानक गडदे यांच्या घरात शिरुन हल्ला केला. त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र  केरबा यांनी त्यांना विरोध केल्याने कुऱ्हाडीने  त्यांनी केरबा यांच्या डोक्यात वार केले. यामध्ये केरबा यांचा जागीच मृत्यू झाला तर मुक्ताबाई गंभीर जखमी झाल्या आहेत.

मुक्ताबाई यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व नाकातील नथ असा 60 हजार रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी हिसकावून पळ काढला. घरामध्ये सुरू असलेल्या गोंधळाने दुसऱ्या खोलीत झोपलेल्या निर्मला गडदे या जाग्या झाल्या. मात्र दरोडेखोरांनी त्यांच्या खोलीला बाहेरुन कडी लावली होती. त्यांनी वस्तीतील लोकांना फोन करुन बोलावले. त्याचदरम्यान लोक येत असल्याचं दिसताच चोरटे पळून गेले. घटनेची माहिती मिळताच विभागीय अधिकारी विलास गरुड यांनी घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस अधीक्षक संदीप पाटील घटनास्थळी रवाना झाले आहेत. 


 
 
 

Web Title: robbery in pune one dead and one injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.